अलिबाग तालुक्यातील रेवदंडा शहरापासून जवळच असलेल्या चौल बागमळा येथील छोट्या टेकडीवर श्री महालक्ष्मीचे मंदिर आहे. हे जागृत देवस्थान म्हणून प्रचलित आहे. गोल घुमटाच्या आकाराचे, दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराला सुमारे सातशे वर्षांचा इतिहास आहे. हे मंदिर आणि रायगडमधील इतिहासप्रसिद्ध आंग्रे घराणे यांचे घट्ट नाते आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, पाचशे वर्षांपासून आजतागायत येथे जल्लोषात साजरा होणारा नवरात्र उत्सव. या उत्सवासाठी परिसरातील हजारो भाविक येथे उपस्थित असतात.
कुलाबा जिल्हा गॅझेटियरमधील उल्लेखानुसार, श्री महालक्ष्मी चंडिका देवी ही आंग्रे घराण्याची कुलस्वामिनी आहे. १७६६ साली राजश्री गोविंदशेठ वरूद देवदास सावकार व गुजर यांचे वास्तव्य राघोजी आंग्रे यांच्या जंजिरा कुलाबा किल्ल्यात असताना मंदिराच्या सभामंडपाचा जीर्णोद्धार झाला, तसेच धर्मसभेच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले, अशी एक नोंद आढळते. या वेळी पिढ्यानपिढ्या सेवा बजावणाऱ्या पिटकर घराण्याकडे उपाध्ये म्हणून अधिकृतपणे पुन्हा सनद सुपूर्द करण्यात आली.
चौल हे शहर प्राचीन काळी ‘चेंमुल’, ‘सैमूर’ किंवा ‘चिविल’ या नावाने प्रसिद्ध होते. शिलालेखानुसार येथे शिलाहार राजांच्या काळात अनेक मंदिरांची निर्मिती झाली होती, कारण हे राजे शक्ती उपासक होते. फिरंगी यांच्या राजवटीत १६८७ ते १७६५ या कालावधीत मंदिरात घट बसविण्यास व हवन करण्यास बंदी घालण्यात आली होती. तेव्हा देवीची पूजा-अर्चा, घट व हवन प्रत्यक्ष मंदिरात न होता चौल येथील मूळ उपाध्ये पिटकर यांच्या घरी होत असे. ३१ मे १७७३ रोजी राजश्री गोविंदशेठ देवदास यांच्या समवेत सरखेल राघोजी आंग्रे यांनी श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात श्री सहस्त्रचंडी अनुष्ठान केले होते. १७९६ साली भाद्रपद शुद्ध तृतीयेला जयसिंगराव आंग्रे व नागोजी आंग्रे हे दोघे बागमळ्यात महालक्ष्मीचे दर्शन घेऊन दोन हजार माणसांसह अलिबागकडे गेले, अशाही नोंदी इतिहासात आहेत.
चौल बागमळ्याच्या मुख्य रस्त्यालगतच्या लहान टेकडीवरील या मंदिराकडे जाण्यासाठी १०३ पायऱ्या आहेत. मुख्य रस्त्यावरील प्रवेशद्वारापासून साधारण एक किलोमीटर अंतर पार केल्यावर डोंगराच्या पायथ्याशी दुसरी एक कमान लागते आणि तिथूनच वर जाण्यासाठी दगडी पायऱ्यांची सुरुवात होते.
हेमाडपंती स्थापत्यरचना असलेले हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या बाह्य भागात दोन घुमट असून त्यातील पहिला घुमट सभामंडपावर तर दुसरा गर्भगृहावर स्थित आहे. या घुमटांच्या खालील कोनाड्यांमधील विशिष्ट भौमितीय नक्षी तत्कालीन मराठा आणि काही प्रमाणात इस्लामी वास्तुकलेचा प्रभाव दर्शवते. मंदिराच्या एका बाजूस मोठी दीपमाळ आहे. दुसऱ्या बाजूला सुशोभित तुळशी वृंदावन आहे. दीपमाळेच्या मध्यभागी हनुमंताची कोरीव मूर्ती व एक छोटे शिल्प आहे. या मूर्तीचे दर्शन घेतल्याशिवाय देवीचे दर्शन पूर्ण होत नाही, अशी भाविकांची समजूत आहे. प्रांगणातून सात ते आठ पायऱ्या चढून उंच जगतीवर असलेल्या मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. नक्षीदार महिरपींनी सजलेल्या येथील सभामंडपात १५० हून अधिक घंटा बांधलेल्या आहेत. मंदिराचे मूळ गर्भगृह विटा व चुन्याचा वापर करून बांधलेले आहे.
गर्भगृहात प्रदक्षिणेच्या वाटेवर प्रत्येक दिशेला दोन-दोन अशा आठ कोनाड्यासारख्या खिडक्या आहेत. त्यामुळे प्रदक्षिणा मार्ग प्रकाशमान होतो. मंदिरातील महालक्ष्मीची मूर्ती शेंदूरचर्चित पाषाणाची असून तिचे स्वरूप कोल्हापूरच्या अंबाबाईशी साधर्म्य दर्शवणारे आहे.
मंदिराच्या पूर्वेस पाच सतीच्या शिळा आहेत. नारो शंकर महाजन यांची पत्नी (१७७३), आंग्रेंचे दिवाण गोविंदशेठ देवदास यांच्या दोन पत्नी (फेब्रुवारी, १७८२) (सती प्रथा १८२९ मध्ये बंद झाल्याने मजकुरातील १८८२ ऐवजी १७८२ ही साल सुसंगत आहे), बाबूराव श्रीधर दिवाण यांची पत्नी (मे, १८२६), दामोदर भट राईलकर यांची पत्नी (नोव्हेंबर, १८०३) अशा पाच जणी येथे सती गेल्या होत्या. त्यांच्या या शिळा असल्याचे सांगण्यात येते.
मार्गशीर्ष महिन्यात या मंदिरात सुहासिनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. नवरात्र उत्सवाच्या काळात मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते आणि या दिवसांमध्ये देवीला सोन्या-चांदीचे दागिने तसेच विविध प्रकारची वस्त्रभूषणे परिधान केली जातात. उत्सवाच्या दिवशी श्री महालक्ष्मी देवीस पितळी धातूचा मुखवटा, सोन्याची माळ आणि मणीहार घातला जातो. मंदिरात दररोज सायंकाळी सात वाजता महालक्ष्मीची मुख्य आरती आणि त्यानंतर गणपतीची आरती करण्याची परंपरा पाळली जाते. दसऱ्याच्या दिवशी मंदिरात सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो आणि देवीच्या मुखवट्याची पालखी बागमळा गावातून फिरवली जाते. मंगळवार आणि शुक्रवार हे देवीचे वार मानले जात असल्याने या दिवशी भाविकांची संख्या अधिक असते. तसेच दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात येणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेला येथे मोठी जत्रा भरते. त्यावेळी जिल्ह्यातील अनेक भागांतून भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. सोरटी सोमनाथवरून महाराष्ट्रात आलेल्या रेवदंड्यातील भट घराण्याकडे या मंदिराच्या पूजेचा आणि मालकीचा मान आहे. भाविकांना दररोज सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दर्शनासाठी मंदिर खुले असते.