महाकाली माता मंदिर

कारगिल नगर, विरार, ता. वसई जि. पालघर

पालघर जिल्ह्यातील विरार येथील जीवदानी देवीप्रमाणेच प्रसिद्ध असलेल्या जगतजननी कालिका मातेचे मंदिर शहरातील कारगिल नगरमध्ये आहे. या मंदिरात अखंड दगडात घडविलेली साडेबारा फुटांची काळ्या पाषाणातील कालिका मातेची रौद्ररूपी मूर्ती आहे. कालिका मातेची ही देशातील सर्वात उंच मूर्ती असल्याचा दावा केला जातो. या देवीची मनोभावे सेवा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे पालघरसह मुंबई, ठाण्यातूनही अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. नवरात्रोत्सवादरम्यान दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भक्तांमुळे या परिसराला यात्रेचे स्वरूप येते.

विरार येथील कारगिल नगरमध्ये मनीष राऊत यांच्या मालकीच्या जागेतील मंदिरात पूर्वी देवीची छोटी मूर्ती होती. या देवीची अशी आख्यायिका आहे की २००८ मध्ये देवीने राऊत यांना स्वप्नदृष्टांत देऊन आपल्या मोठ्या आकाराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर राऊत यांनी जयपूरमधून ही मूर्ती घडवून आणली. मूर्ती आणण्यापूर्वी मंदिराला नवे स्वरूप देण्यात आले. मात्र, मूर्तीचा आकार मोठा असल्याने तिला आत आणता येत नव्हते. तीन दिवस मूर्ती मंदिराबाहेरच उभी होती. तिसऱ्या दिवशी मंदिराच्या उजव्या बाजूचा काही भाग पाडून क्रेनच्या साह्याने मूर्ती मंदिरात ठेवण्यात आल्यानंतर देवीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. असे सांगितले जाते की त्यावेळी १०८ बकऱ्यांचा बळी देण्यात आला होता.

विरार रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या कारगिल नगरमध्ये हे मंदिर आहे. मंदिरावर आकर्षक शिखर आहे व शिखराच्या समोरील बाजूस मध्यभागी हनुमानाची मूर्ती आहे. त्याशेजारी ध्यानस्थ ऋषींची शिल्पे आहेत. त्याखाली मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाजूस असलेल्या देवकोष्टकांमध्ये एकवीरा देवी, वज्राई देवी, रेणुका देवी, तुळजा भवानी, महाकाली यांच्यासह १८ प्रमुख देवींच्या मूर्ती आहेत. येथे भाविकांना देशातील जवळपास सर्व शक्तिपीठांतील मूर्तींचे दर्शन होते. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील भिंतीवरील खालील बाजूंना असलेल्या देवकोष्टकांत डावीकडे गणेशाची तर उजवीकडे कालभैरवाची मूर्ती आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजवीकडे देवीचे शिल्प आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना असलेल्या दोन गजराजांनी आपल्या डोक्यावर या मंदिराचा भार पेलला असल्याचे दर्शवण्यात आले आहे.

गर्भगृहाच्या सुरुवातीलाच कासवाची मूर्ती आहे. गर्भगृहात मध्यभागी दशभुजा असलेल्या देवीच्या रौद्ररूपाचे दर्शन होते. अखंड काळ्या पाषाणातील या मूर्तीची उंची साडेबारा फूट व वजन ७,५०० किलो आहे. मूर्तीच्या शिरावर मुकुट व हातांमध्ये त्रिशूल, तलवार, खडग, ढाल, खप्पर, धनुष्य, चक्र आदी आयुधे आहेत. तसेच एका हातात रक्तबीज राक्षसाचे शिर आहे. देवीने जीभ बाहेर काढली आहे. तिच्या गळ्यात तसेच कमरेभोवती राक्षसांची मुंडमाला आहे. तिच्या पायाखाली निद्रिस्त शंकर आहेत. मूर्तीमागील प्रभावळीवर आकर्षक कलाकुसर तसेच देवदेवतांच्या मूर्ती आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूंना देवीचे महाअवतार कोरलेले आहेत. मंदिरातील भिंतींवर देवीने दैत्यांच्या केलेल्या संहाराची, काली चालिसामध्ये देवीच्या असलेल्या वर्णनाची तसेच महाकालिका मातेच्या रूपांची ७० हून अधिक शिल्पे कोरलेली आहेत.

कालिका मातेच्या हातात रक्तबीज राक्षसाचे शिर आहे. याबाबतची पौराणिक कथा अशी की रक्तबीज नावाच्या दैत्याने घोर तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले होते. ज्या ज्या ठिकाणी माझे रक्त सांडेल, त्या त्या ठिकाणी माझ्यासारखेच शक्तिशाली दैत्य उत्पन्न होतील, असा वर त्याने मागून घेतला होता. हा वर मिळाल्यावर मातलेल्या रक्तबीज राक्षसाने तिन्ही लोकांमध्ये धुमाकूळ घातला. अनेक देव-देवतांनी त्याला पराभूत करण्याचा प्रयत्न केला. मात्र शंकराकडून मिळालेल्या वरामुळे ते शक्य होत नव्हते. या दैत्याने इंद्रदेवालाही पराभूत केले. त्याच्या कृत्यांपुढे हतबल झालेल्या सर्व देव-देवतांनी त्याचा अंत करण्यासाठी दुर्गामातेला साकडे घातले.

सर्व देवांच्या विनंतीवरून दुर्गादेवीने रक्तबीज दैत्याशी युद्ध केले. मात्र देवीने आपल्या शस्त्रांनी त्याच्यावर वार केल्यानंतर जमिनीवर सांडलेल्या त्याच्या रक्तातून त्याच्यासारखेच असुर उत्पन्न होत होते. अनेक दिवस युद्ध केल्यानंतर त्याचा वध होत नसल्याने दुर्गादेवीने पार्वतीची मदत मागितली. दुर्गादेवी पार्वती मातेला म्हणाली की मी वार केल्यानंतर रक्तबीज दैत्याचे रक्त अशा प्रकारे प्यावेस की त्या रक्ताचा एकही थेंब भूमीवर पडू नये. त्याचा अंत करण्यासाठी हा एकमेव उपाय आहे. दुर्गादेवीच्या सांगण्यानुसार पार्वती कालिका मातेचा अवतार घेऊन तिच्यासोबत युद्धभूमीवर निघाली. दुर्गामातेने रक्तबीज दैत्यावर वार करताच बाहेर पडणारे त्याचे रक्त ती प्राशन करू लागली. त्यामुळे हळूहळू रक्तबीज दैत्य अशक्त होऊ लागला. हीच संधी साधून दुर्गामातेने त्याचा शिरच्छेद केला. त्यानंतर दुर्गादेवीने त्याचे शिर कालिका मातेला समर्पित केले.

रक्तबीज राक्षसाचा वध झाल्यानंतरही कालिका माता शांत होत नव्हती. तिला आणखी राक्षसांचा संहार करून त्यांचे रक्त प्राशन करायचे होते. तिला समजावण्याचे अनेक प्रयत्न फोल ठरले. त्यामुळे चिंताग्रस्त झालेले देव महादेवाकडे गेले. महादेव देवीचा क्रोध शांत करण्यासाठी गेले. मात्र त्यांचेही प्रयत्न अपयशी ठरले. तिचे डोळे लाल झाले होते. रस्त्यात दिसेल त्या दैत्याचा वध करून त्यांचे रक्त ती प्राशन करत होती. अखेर तिला शांत करण्यासाठी महादेव ती जात असलेल्या मार्गावर झोपले. त्याचवेळी देवीचा पाय त्यांच्या शरीरावर पडला. साक्षात महादेव आपल्या पायाखाली असल्याचे दिसल्यावर तिची जीभ बाहेर आली. त्यामुळेच या मंदिरात देवीच्या हातात रक्तबीज दैत्याचे शिर व तिच्या पायाखाली निद्रिस्त महादेव आहेत.

दररोज पहाटे ५ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत या मंदिरातील कालिका मातेचे भाविकांना दर्शन घेता येते. येथे शारदीय नवरात्रोत्सव आणि काली चौदस (नरक चतुर्दशी) हे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. नवरात्रोत्सवादरम्यान मंदिरासमोरील जागेत देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. मंदिराच्या परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात येते. परिसरात फुले-प्रसादाची विक्री करणारी दुकाने लागतात. नऊ दिवस येथे पूजाविधींसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सप्तमी, अष्टमी तसेच नवमीला तीन दिवस होम होतात. नवमीच्या दिवशी रात्री १२ वाजल्यानंतर येथे बळी देण्याची प्रथा आहे. या वेळी सुमारे ५० बकऱ्यांचा बळी दिला जातो. दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता होणाऱ्या आरतीनंतर महाप्रसादाच्या वेळी भाविकांना या बकऱ्यांचे मटन प्रसाद म्हणून देण्यात येते. नवरात्रोत्सवादरम्यान दहा हजारांहून अधिक भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. या उत्सवादरम्यान येथे रात्री गरब्याचेही आयोजन होते. काली चौदसच्या उत्सवादरम्यानही होम, बळीदान आदी विधी होतात. या उत्सवादरम्यानही महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

उपयुक्त माहिती

  • विरार रेल्वे स्थानकापासून २.५ किमी अंतरावर
  • विरारपासून शहर परिवहन बस व रिक्षांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : कृष्णगिरी महाराज, पुजारी, मो. ९७९४६८९३१०
Back To Home