महागणपती (ढोल्या) मंदिर

वाई, ता. वाई, जि. सातारा

महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणामुळे सातारा जिल्हा प्रसिद्ध आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यापासून मराठा साम्राज्याच्या राजधानीचे ते शहर होते. धार्मिक ग्रंथांमध्येविराटनगरीअसा उल्लेख आहे, ती नगरी म्हणजे आताचे वाई हे निसर्गसमृद्ध शहर होय. येथील कृष्णा नदीवरील गणपती घाटावर असलेले महागणपती म्हणजेच ढोल्या गणपतीचे मंदिर हे वाईकरांचे ग्रामदैवत लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

वाई शहरातील हे महागणपतीचे मंदिर पेशव्यांचे सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी १७६२ मध्ये बांधले. पेशवे बाळाजी बाजीराव यांचे सरदार रास्ते हे सासरे होत. या मंदिरासाठी त्यांना त्यावेळी दीड लाख रुपये खर्च आला होता, असा उल्लेख आढळतो. कृष्णाकाठाला लागून असलेल्या या मंदिराची एक वैशिष्ट्यपूर्ण रचना अशी की या मंदिराची मागील बाजू ही त्रिकोणी म्हणजेच बोटीच्या आकाराची आहे. यामागचे कारण असे सांगितले जाते की अशा आकारामुळे कृष्णा नदीला पूर आल्यानंतर नदीचे पाणी विभागले जाईल पाण्याचा दाब कमी होऊन मंदिराचे संरक्षण होईल.

महागणपती मंदिरातील भव्य गणेशमूर्ती ही एकाच दगडातून कोरण्यात आलेली आहे. असे सांगितले जाते की या मूर्तीसाठी वापरण्यात आलेला विशेष काळा पाषाण हा कर्नाटकातून आणण्यात आला होता. या प्रशस्त मंदिराची रचना सभामंडप गर्भगृह अशी आहे. येथील गर्भगृह ३० फूट लांब आणि ३० फूट रुंदीचा आहे. त्यात एका मोठ्या चौथऱ्यावर अखंड पाषाणातून घडविलेली सहा फूट उंच सात फूट रुंदीची गणेशमूर्ती आहे. या भव्य मूर्तीमुळे या गणपतीला ढोल्या गणपती, असे म्हटले जाते.

महागणपती मूर्तीची प्रसन्न मुद्रा त्यावरील तेज विलोभनीय आहे. ही मूर्ती बैठी असून तिचे डोळे तेजस्वी भासतात. महागणपतीच्या मूर्तीला जानवे, गळ्यात हार, बाजुबंद, पायात तोडे परिधान केलेले आहेत. संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी, गणेश जयंती यांसारख्या दिवसांमध्ये या मूर्तीला अनेक अलंकारांनी मढविले जाते. मूर्तीच्या मागील बाजूस अर्धचंद्राकृती प्रभावळ आहे. वाई शहर परिसरात असलेल्या सर्व मंदिरांमध्ये ढोल्या गणपती मंदिराचे शिखर हे सर्वात उंच असून त्याची उंची पायथ्यापासून २४ मीटर आहे. येथील ग्रामस्थ प्रत्येक कार्याची सुरुवात करताना या महागणपतीची आराधना करतात. महागणपती जागृत असून भाविकांच्या नवसाला तो पावतो, अशी ख्याती असल्यामुळे येथे दररोज हजारो भाविक दर्शनाला येतात. उत्सवांच्या दिवसांत तर ही संख्या ५०,००० ते ७५,००० इतकी असते. भाविकांसोबतच महाबळेश्वर पाचगणीला येणारे पर्यटकही आवर्जून महागणपतीच्या दर्शनाला येत असतात. दररोज सकाळी .३० पासून रात्री .३० पर्यंत भाविकांना महागणपतीचे दर्शन घेता येते. वैशाख शुद्ध त्रयोदशीला महागणपतीच्या प्रतिष्ठापनेचा वर्धापनदिन सोहळा येथे उत्साहात साजरा होतो. त्रिपुरारी पौर्णिमेला या मंदिरासह नदीच्या घाटावर करण्यात येणारा दीपोत्सव प्रसिद्ध असून त्यावेळी हा परिसर हजारो मिणमिणत्या दिव्यांनी उजळून निघतो.

महागणपती मंदिराच्या शेजारी कृष्णामाई मंदिर आहे. या मंदिर परिसरासह कृष्णा नदीच्या सात घाटांवर साजरा होणारा येथील कृष्णामाई उत्सव सर्वश्रुत आहे. माघ शुद्ध प्रतिपदेपासून साधारणतः दीड महिना हा उत्सव चालतो. असे सांगितले जाते की नदीचा उत्सव साजरा होणारे वाई हे राज्यातील एकमेव ठिकाण आहे. काही अभ्यासकांच्या मते स्वतः शिवाजी महाराजांनी हा उत्सव सुरू केला होता.

ऐतिहासिक नोंदींनुसार, शिवाजी महाराजांना मारण्याच्या उद्देशाने आलेल्या अफझल खानाची छावणी अनेक दिवस वाईत डेरेदाखल होती. या काळात मुघल सैन्याने येथे दहशत माजविलेली होती, त्यामुळे वाईकर ग्रामस्थ त्रस्त होते. प्रतापगडाच्या पायथ्याशी होणाऱ्या शिवाजी महाराज अफजल खान भेटीत महाराजांना यश येवो, असे साकडे त्यावेळी वाईतील ग्रामस्थांनी कृष्णामातेला घातले होते. शिवाजी महाराजांना यश मिळाल्याचे अफझल खान मारला गेल्याचे समजताच वाईतील हजारो ग्रामस्थांनी तेव्हा कृष्णामाईची पूजा केली होती. तेव्हापासून हा उत्सव अखंडित सुरू आहे. यावेळी ढोलताशांच्या गजरात कृष्णामाईच्या मंदिरातून पालखीची मिरवणूक निघते. संपूर्ण पालखी मार्ग हा रांगोळ्यांनी विविध फुलांनी सजविला जातो. वाईतील जवळपास प्रत्येक घरातून या देवीला खणानारळाची ओटी वाहिली जाते. हा महोत्सव पाहण्यासाठी या काळात दररोज हजारो भाविक पर्यटक वाईमध्ये येत असतात. याशिवाय नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले वाईकर आवर्जून या काळात देवीच्या दर्शनाला येतात.

उपयुक्त माहिती:

  • सातारा शहरापासून ३२ किमी अंतरावर 
  • वाई बसस्थानकापासून पायी १० मिनिटांवर (६०० मीटर)
  • खासगी वाहने महागणपती मंदिराच्या 
  • वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home