भारतीय समाजव्यवस्थेमधील परिवर्तनात नाथ संप्रदायाचा मोठा वाटा आहे. कर्मकांड व वर्णव्यवस्था नाकारून तळागाळातील लोकांना समान हक्क आणि आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी नवनाथांनी संपूर्ण भारतात भ्रमण केले. त्यामुळे नाथ संप्रदायातील मठ आणि समाधी मंदिरे गावोगावी आढळतात. बीड जिल्ह्यातील गर्भगिरीच्या डोंगररांगांमध्ये नवनाथांची समाधीस्थळे आहेत. नाथपंथाचे संस्थापक मच्छिंद्रनाथ यांचे समाधी मंदिर आष्टी तालुक्यातील मायंबा येथील डोंगराच्या माथ्यावर विराजमान आहे. येथे आजही मच्छिंद्रनाथांचे अस्तित्व जाणवते, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे.
धार्मिक इतिहासानुसार, आंध्र प्रदेशातील श्रीशैल-कर्दलीबन ही नाथ संप्रदायाची उदयभूमी मानली जाते. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र ही या संप्रदायाची प्रमुख लीलास्थळे आहेत. हा संप्रदाय नाथ संप्रदाय, सिद्धपंथ, अवधूत मत, कानफाटा संप्रदाय, गुरुमार्ग अशा नावांनी उल्लेखिला जातो. या संप्रदायाचे पहिले ऐतिहासिक पुरुष मत्स्येंद्रनाथ (मच्छिंद्रनाथ) हे होत. त्यांच्या मूलस्थानाविषयी विविध मते आहेत. त्यांचा काळ दहाव्या शतकाचा उत्तरार्ध असल्याचे प्रतिपादन थोर इतिहास संशोधक रा. चिं. ढेरे यांनी मांडले आहे. मत्स्येंद्रनाथांच्या नावावर कौलज्ञाननिर्णय, श्रीकामाख्यागुह्यसिद्धी, अकुलागमतंत्र, कुलार्णवतंत्र, कौलोपनिषद्, कौलावलिनिर्णय आदी प्रसिद्ध ग्रंथ आहेत. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये ‘योगाब्धिनिसरोवर’ आणि ‘विषयविध्वंसैकवीर’ या विशेषणांनी ज्यांचा गौरव केला, ते गोरक्षनाथ (काळ इ.स. १०५० ते ११५०) हे मत्स्येंद्रनाथांचे शिष्य होते.
नवनाथ भक्तिसार ग्रंथानुसार, प्रत्यक्ष नारायणाने मत्स्यरूपात जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ नाव धारण केले. आदिनाथ म्हणजेच महादेवाकडून त्यांना दैवी शक्ती प्राप्त झाल्या होत्या. त्यांनी कौलज्ञान व योगज्ञानाद्वारे भक्तीमार्गाचा प्रचार व प्रसार केला. सर्व प्राणिमात्रांचा सर्व प्रकारच्या ज्ञानावर समान हक्क आहे, हे तत्त्व त्यांनी जनसामान्यांना समजावून सांगितले. पुढे गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ अशा नाथपंथीय गुरु-शिष्य परंपरेने ही ज्ञानगंगा वारकरी संप्रदायाच्या रूपाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. आपले अवतारकार्य साध्य झाल्यावर मच्छिंद्रनाथांनी या ठिकाणी संजीवन समाधी घेतली.
हे समाधी मंदिर गावापासून जवळ असलेल्या डोंगराच्या माथ्यावर आहे. डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंदिराची पहिली स्वागतकमान आहे. रस्त्याच्या दुतर्फा दोन चौकोनी स्तंभ आणि त्यावर आडवी तुळई, असे या स्वागतकमानीचे स्वरूप आहे. आडव्या तुळईवर मच्छिंद्रनाथांचे प्रतीक म्हणून माशांची शिल्पे कोरलेली आहेत. डोंगरावर जाण्यासाठी सुमारे तीनशे पायऱ्या असलेल्या पायरी मार्गाचा वापर करून आपण मंदिरापर्यंत पोहोचू शकतो. हा पायरी मार्ग थेट महाद्वारापर्यंत पोहोचतो.
अलीकडील काळात डोंगरमाथ्यावर पोहोचणारा पक्का डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याचा वापर करून खाजगी वाहने थेट मंदिरासमोरील वाहनतळापर्यंत पोहोचू शकतात. वाहनतळापासून मंदिरापर्यंतच्या पेव्हर ब्लॉक बसवलेल्या पायवाटेवर दोन्ही बाजूला पूजा साहित्य, खाद्यपदार्थ, खेळणी, कपडे आदी विविध वस्तूंची दुकाने आहेत. मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात सर्वप्रथम नवनाथ मंदिर लागते. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे.
अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी पाच स्तंभांच्या चार रांगा आहेत. सभामंडपाच्या वितानावर चक्राकार नक्षी आहे. या सभामंडपात भाविकांकडून नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण सुरू असते. पुढे गर्भगृहाचे मुक्तद्वार स्वरूपाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहात मोठ्या वज्रपीठावर मध्यभागी मच्छिंद्रनाथ व त्यांच्या दोन्ही बाजूस इतर आठ नाथांच्या मूर्ती आहेत. सर्व नाथ ध्यानमुद्रेत व योग्यांच्या वेशात आहेत. मच्छिंद्रनाथांच्या मूर्तीच्या मागील बाजूला भिंतीवर श्री दत्तात्रेयांचे शिल्प आहे. तसेच गर्भगृहाच्या छतावर घुमटाकार शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी आमलक व कळस आहे. नवनाथ मंदिराच्या बाजूला सभागृहाची प्रशस्त इमारत आहे.
येथे देवस्थानचे सर्व कार्यक्रम व महाअन्नदान आयोजित करण्यात येते. बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना राहण्यासाठी येथे खोल्या देखील बांधण्यात आलेल्या आहेत.
येथून पुढे मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर रांगमंडप उभारण्यात आला आहे. या रांगमंडपाच्या लोखंडी स्तंभांवर गजपृष्ठ आकाराचे छत आहे. येथील समाधी मंदिर अर्धखुल्या स्वरूपाचे आहे. या मंदिरात चारही बाजूने एकूण बारा नक्षीदार स्तंभ आहेत. सर्व स्तंभ एकमेकांना महिरप कमानीने व लोखंडी जाळ्या लावून जोडलेले आहेत. येथील छतावर पद्मनक्षी कोरलेली आहे. मंदिरात मध्यभागी समाधीचा चौथरा आहे. या समाधीवर भगवे वस्त्र पांघरले जाते. समाधी चौथऱ्याच्या चारही बाजूंना शंख, चक्र, त्रिशूल आदी शुभ चिन्हे कोरलेली आहेत. समाधीवरील छत्र छताला टांगलेले आहे. मंदिराच्या छतावर गोलाकार उंच व निमुळते शिखर असून त्यावर स्तंभनक्षी आहे. शिखराच्या शीर्षभागी आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे. हे समाधी मंदिर वर्षातून एकदाच फक्त चैत्र पाडव्याच्या दिवशी दर्शनासाठी उघडले जाते. इतर दिवशी मात्र बाहेरूनच दर्शन घ्यावे लागते.
मंदिराच्या प्रांगणात महंतांच्या समाध्या, पुजारी व सेवेकऱ्यांची निवासस्थाने, देवस्थानचे कार्यालय व इतर वास्तू आहेत. संपूर्ण मंदिर परिसराला लोखंडी जाळ्या लावून सुरक्षित तटबंदी करण्यात आली आहे. भाविक या जाळ्यांना पवित्र धागा बांधून नवस करतात. याच डोंगरात समाधी मंदिरापासून काही अंतरावर अमृतेश्वर महादेव मंदिर आहे. डोंगराच्या कुशीत सुमारे दोनशे ते तीनशे फूट खाली उतरून अमृतेश्वर महादेव मंदिराकडे जाता येते. या मंदिराजवळ असलेल्या गोमुखातून पाण्याचा झरा निरंतर वाहत असतो.
चैत्र पाडवा हा मच्छिंद्रनाथ समाधी मंदिरातील मुख्य वार्षिक जत्रोत्सव आहे. हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. फाल्गुन अमावस्येला भाविक विविध नद्यांचे पाणी आणून मच्छिंद्रनाथांच्या समाधीस अभिषेक करतात. या निमित्ताने हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. वर्षभरातील अनेक सण व उत्सव येथे साजरे केले जातात.