लोटेश्वर मंदिर

डुगवे, ता. रत्नागिरी, जि. रत्नागिरी

मंदिर म्हटले की मोठे प्रांगण, कळस, दीपमाळ, सभामंडप, गाभारा असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील डुगवे येथील स्वयंभू लोटेश्वर मंदिर यास अपवाद आहे. हे मंदिर चक्क एका ओढ्यातील मोठ्या जांभ्या दगडावर उभे आहे. केवळ एका दगडावर उभे असलेले हे आगळेवेगळे दुर्मिळ मंदिर पाहण्यासाठी दररोज येथे शेकडो भाविक येत असतात. २०० ते २५० वर्षे प्राचीन असलेल्या या मंदिरातील लोटेश्वर जागृत असून तो मनोकामना पूर्ण करतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मंदिराची अख्यायिका अशी की येथील एक गुराखी गावातील ब्राह्मणाच्या गायी दररोज या भागात चरायला आणत असे. त्यातील एक गाय गुराख्याची नजर चुकवून कळपातून बाजूला जाऊन आज जेथे मंदिर आहे त्या पाषाणाजवळ येत असे. ओढ्याच्या मध्यभागी असलेल्या पाषाणाभोवती भरपूर वेलींचा जाळ जमा झाला होता. त्याच्या आधाराने पाषाणावर चढून ती गाय त्यावर आपला पान्हा सोडी आणि पुन्हा येऊन कळपात मिसळत असे. घरी आल्यावर गाय दूध देत नसल्याने ब्राह्मणाने गुराख्यावर संशय घेतला. गुराख्याने गायीवर पाळत ठेवल्यावर त्याला हा प्रकार समजला त्याने ब्राह्मणाला याबाबत सांगितले. हे ऐकून क्रोधित झालेल्या ब्राह्मणाने कोयत्याने या पाषाणावरील वेलींवर घाव घातला असता वेलींचा जाळ तुटून त्याखाली असलेले शिवलिंग दिसले. घडलेला प्रकार समजल्यानंतर सर्व गावकरी येथे जमा झाले आणि ते शिवलिंगासमोर नतमस्तक झाले. या शिवलिंगाचे दर्शन झाले तो दिवस पौष महिन्यातील सोमवार होता. कोयत्याच्या आघाताने या पाषाणावरील शिवलिंगाला छेद गेला, तो आजही दिसतो.

त्यानंतर ग्रामस्थांनी येथील जंगल साफ करून या ओढ्यावरील पाषाणावर केंबळीचे (गवताचे) मंदिर बांधले. भाविकांना या मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेता यावे, यासाठी कळकाच्या (बांबूचा प्रकार) साह्याने पाषाणापर्यंत निसण (शिडी) तयार करण्यात आली. १९६० मध्ये झालेल्या मोठ्या वादळात या प्राचीन मंदिराचे नुकसान झाल्यानंतर ग्रामस्थांनी तेथे कौलारू मंदिर बांधले. त्यानंतर वेळोवेळी या मंदिराचा कायापालट होत गेला२०१८ मध्ये करवीर पिठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते मंदिराचा कलशारोहण आणि जीर्णोद्धार सोहळा पार पडला त्यानंतर कौलारू मंदिराचे घुमटाकार मंदिरात रूपांतर होऊन मंदिराला सध्याचे स्वरूप आले.

रत्नागिरीकुरतडे मार्गावरील डुगवे गावातील कमानीपासून, जांभ्याच्या पाखाडीवरून, काही पायऱ्या उतरून, मंदिरापर्यंत जाता येते. पाषाणावर उभ्या असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. ओढ्यातून एक लोखंडी शिडी लावण्यात आलेली आहे. तेथून सुमारे २० पायऱ्या चढून मंदिरात पोचता येते; परंतु पावसाळ्यात ही शिडी पाण्याखाली जात असल्याने त्यावरून मंदिरात जाता येत नाही. याशिवाय किनाऱ्यावरून मंदिरापर्यंत एक लहानसा पूल तयार करण्यात आला आहे. तेथून केव्हाही मंदिरात दर्शनासाठी जाता येते. खाली जेवढ्या आकाराचा दगड आहे, त्याच आकाराचे मंदिर त्यावर बांधलेले आहे. मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे जांभ्या दगडातील असून त्यावर घुमट आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर बाह्यभिंतींवर कलाकुसर करण्यात आलेली आहे. प्रवेशद्वारासमोर बाहेरील बाजूला नंदीचे स्थान आहे. मंदिरातील भव्य शिवपिंडी ही खाली असलेल्या अखंड पाषाणाचाच एक भाग असून जांभ्या दगडातील दुर्मिळ स्वयंभू शिवपिंडी येथे पाहता येते. या शिवलिंगावरील शाळुंकेच्या मध्यभागी बाण असून नागाचे स्थान हे बाणाच्या शेजारी आहे, हे येथील वेगळेपण आहे. शंकराच्या मंदिराला वा गाभाऱ्याला पूर्ण प्रदक्षिणा घातली जात नसल्याने या चौकोनी मंदिराच्या बाहेरील तीन बाजूंनी प्रदक्षिणा मार्ग बनविण्यात आलेला आहे.

ज्यावर हे मंदिर उभे आहे ते उंच भव्य पाषाण वर्षानुवर्षे कोणत्याही आधाराविना ओढ्यात उभे आहे. पावसाळ्यात हा ओढा दुथडी भरून वाहत असतो. त्याचा किंचितही परिणाम या पाषाणावर झालेला नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. स्वयंभू लोटेश्वर पौष महिन्यात प्रकट झाले आणि गुराख्याला त्याचे प्रथम दर्शन झाले. तेव्हापासून पौष महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी मंदिरात गुराख्यांचे जेवण म्हणून देवाचा नैवेद्य केला जातो. यावेळी आलेल्या भाविकांना महाप्रसाद देण्यात येतो. हा नैवेद्य सर्व भाविक मंदिरासमोर असलेल्या झाडाच्या पानावर खातात. त्यालाचांद्याचे पानअसे म्हणतात. महाशिवरात्रीला मंदिर परिसरात मोठा उत्सव असतो. याशिवाय श्रावणी सोमवारीही लोटेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. सकाळी ते सायंकाळी वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात जाऊन दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • रत्नागिरीपासून २२ कि.मी. अंतरावर 
  • रत्नागिरीपासून एसटीची सुविधा
  • मंदिराच्या पाखाडीपर्यंत खासगी वाहने येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : मारुती अंतू गोविलकर
  • अध्यक्ष, मो. ८७८८९८११३७
  • नीलेश शिवराम भुवड, उपाध्यक्ष, मो. ९३०९९६०२२५
Back To Home