कृष्णा नदीवर बांधलेल्या धरणामुळे वाई तालुक्यातील धोम हे गाव प्रसिद्ध आहे. त्याहीपेक्षा प्राचीन काळापासून या गावाची ओळख आहे ती येथील वैशिष्ट्यपूर्ण श्रीलक्ष्मी–नृसिंहाच्या मंदिरामुळे! या मंदिरासमोर १६ पाकळ्या असणारे, काळ्या पाषाणात घडविलेले कमळाचे जे शिल्प आहे, ते अतिशय दुर्मिळ समजले जाते. या कमळ शिल्पाच्या हौदात एका भल्यामोठ्या दगडी कासवाच्या पाठीवर अष्टकोनी नंदीमंडप असून त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण कोरीव नंदी आहे. या हौदाच्या एका बाजूला लक्ष्मी नृसिंह मंदिर, तर समोर सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर आहे.
पूर्वीच्या काळात ‘विराटनगरी’ म्हणून ओळखले जाणारे वाई हे मंदिरांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. इतिहास आणि स्थापत्यकला यांचा सुंदर मिलाफ असलेले नृसिंह मंदिर वाईपासून जवळच असलेल्या वाळकी आणि कृष्णा या दोन नद्यांच्या संगमावर धोम या गावी आहे. या मंदिराचा प्रवेशद्वार एखाद्या किल्ल्याप्रमाणे भासतो. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला भव्य दगडी बुरूज असून येथील लाकडी दरवाजा प्राचीनत्वाची साक्ष देतो. या प्रवेशद्वारातून अरुंद वाटेने पुढे गेल्यावर श्रीलक्ष्मी नृसिंह मंदिराकडे जाता येते. या आगळ्यावेगळ्या मंदिराचे बांधकाम उंच व गोल असून मध्यभागी श्रीलक्ष्मी–नृसिंह देवस्थान व त्याच्या बाजूने गोलाकार सज्जा काढून प्रदक्षिणा मार्ग बनविण्यात आला आहे.
श्रीलक्ष्मी नृसिंहाचे हे स्थान एका मोठ्या लाकडी खांबावर असून तेथे जाण्यासाठी अरुंद पायरी मार्ग आहे. या संपूर्ण बांधकामात सागवानी लाकडाचा वापर करण्यात आला आहे. पूर्व–पश्चिम असणाऱ्या या मंदिरात एका बाजूला हिरण्यकश्यपू राक्षसाचा वध करतानाची नृसिंहाची रौद्र रूपातील मूर्ती आहे, तर दुसऱ्या बाजूला सौम्य रूपातील चतुर्भुज व सिहासनारूढ मूर्ती आहे. या मूर्तीत नृसिंहाच्या मांडीवर लक्ष्मी बसलेली आहे. या मंदिरासमोरच्या एका देवळीत प्रल्हादाची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की नारायणराव पेशव्यांनी थोरल्या माधवरावांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी या ठिकाणी डिसेंबर १७६९ मध्ये ब्राह्मणांना अनुष्ठानास बसवले होते. वैशाख शुद्ध दशमीला येथे नृसिंह जयंतीचा उत्सव असतो.
लक्ष्मी नृसिंह मंदिराच्या आवारात सिद्धेश्वर महादेवाचे प्राचीन दगडी बांधकामाचे मंदिर आहे. या मंदिरासमोरच स्थापत्यशैलीची अनोखी रचना असणारा हौद व त्यावरील अष्टकोनी मंदिरात नंदीची मूर्ती आहे. सुबक काळ्या पाषाणात कमळपुष्पाच्या आकारात हौद करण्यात आला असून त्यामध्ये मध्यभागी दोन मीटर लांबीचे दगडी कासव बसविले आहे. या कासवाच्या पाठीवर अष्टकोनी मंदिर असून त्यात नंदी विराजमान आहे. या हौदात पाणी भरल्यानंतर पाठीवर मेघडंबरीसदृश्य मंदिर घेऊन कासव पाण्यात तरंगत आहे असे दृश्य दिसते. हे दुर्मिळ मंदिर व त्यावरील कलाकुसर आवर्जून पाहण्यासारखी आहे.
या हौदाच्या समोर सिद्धेश्वर मंदिर आहे. असे सांगितले जाते की हे मंदिर धौम्य ऋषींनी स्थापन केले आहे. त्यांच्या नावावरून या गावाला धोम हे नाव पडले. या मंदिरावर व येथील खांबांवरील कोरीव काम वैशिष्ट्यपूर्ण आहे. अखंड काळ्या पाषाणात इतक्या बारकाईने केलेली कलाकुसर इतरत्र क्वचितच पाहायला मिळते. या मंदिराच्या गाभाऱ्यातही कोरीव काम केलेले आहे. गाभाऱ्यामध्ये अखंड पाषाणात सहा थर असलेली सुंदर शिवपिंडी आहे. मंदिराच्या आतील भागात कळसाकडे फुलांची शिल्पे कोरलेली आहेत.
सिद्धेश्वर मंदिर हे शिवपंचायतन स्वरूपातील आहे. मंदिराच्या चार दिशांना श्रीविष्णू, श्रीगणेश, देवी पार्वती व सूर्यदेव ही मंदिरे आहेत. यातील पार्वती मंदिरामध्ये श्रीगणेश व कार्तिक स्वामी यांच्यासह पार्वती अशी एकत्रित मूर्ती आहे. सूर्यदेव मंदिरातील श्रीसूर्यदेवांची मूर्ती सात घोड्यांच्या रथावर आरुढ आहे. याशिवाय महादेव मंदिराच्या पायामध्ये धौम्य ऋर्षीची समाधी आहे. या समाधीकडे जाण्यासाठी भुयारात उतरून जावे लागते.
या मंदिराच्या उत्तरेकडील दरवाजासमोर लहानसे गणेश मंदिर आहे. या मंदिरासमोर पंचमुखी शिवखांब असून त्याची चारी तोंडे चार दिशेला व पाचवे तोंड आकाशाकडे आहे. या खांबावरील कोरीवकामही वैशिष्ट्यपूर्ण आहे. हा खांब संपूर्ण मंदिराचे ऊर्जास्थान मानले जाते. मंदिराच्या आवारात एक विहीर आहे, तिला अंधार विहीर असे म्हटले जाते. ही विहीर बंदिस्त असून तिचे पाणी कधीच आटत नाही. विहिरीत उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. पूर्वीपासून या विहिरीचेच पाणी मंदिरासाठी वापरले जाते. वैशाख पौर्णिमेला सिद्धेश्वर मंदिराची यात्रा भरते.
येथील नोंदींनुसार, पुणे येथील सावकार शिवराम यांनी पेशवाईच्या काळात १७८० साली या मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता. संभाजी महाराज, शाहू महाराज यांच्यासह अनेकांनी वेळोवेळी या मंदिरासाठी सनद दिल्या आहेत.