देशातील एकवीस स्वयंभू गणेश क्षेत्रांपैकी सतरावे क्षेत्र असलेले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील लक्षविनायक मंदिर प्रसिद्ध आहे. जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वराच्या मंदिरापासून जवळ असलेले हे पुरातन मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैलीत उभारण्यात आलेले आहे. घृष्णेश्वराचे दर्शन घेण्याआधी लक्षविनायकाचे दर्शन घ्यावे, अशी प्रथा आहे. दोष हरण करणारे, लक्षपूर्ती करणारे, नवसाला तत्काळ पावणारे दैवत, अशी या गणेशाची ख्याती आहे. त्यामुळे देशभरातून अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात.
धर्मरक्षणासाठी व वाईट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी देवादिकांच्या तसेच भक्तांच्या प्रार्थनेवरून गणेशाने विविध युगांमध्ये अनेक अवतार घेतले. त्याने या सर्वांच्या प्रार्थनेवरून त्या त्या क्षेत्री वास केला. अशी जगभरात अनेक गणेशाची क्षेत्रे असून त्यात भारतातील एकवीस स्वयंभू गणेश क्षेत्रे महत्त्वाची मानली जातात. यामधील आठ क्षेत्रे महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी मराठवाड्यात असलेल्या तीन क्षेत्रांपैकी स्कंदस्थापित (कार्तिकस्वामी) लक्षविनायक क्षेत्र प्रसिद्ध आहे. या क्षेत्राबाबतची आख्यायिका अशी की सृष्टीच्या आरंभकाळी स्वानंदप्रभूंना लक्ष नावाचा पुत्र होता. त्याला लक्ष भुजा होत्या. एके दिवशी त्याला आज जेथे गणेशमंदिर आहे, त्या जागेवर जोतिर्मय अवस्थेत गणेशाचे दर्शन झाले होते. त्यानंतर त्याने एक हजार वर्षे तपश्चर्या करून गणेशाला प्रसन्न करून घेतले होते. त्यावेळी गणपतीने त्याला आशीर्वाद दिला, तसेच कालांतराने तुझ्या नावाने माझे नाव घेतले जाईल, असा वर दिला.
पुढे त्रेतायुगात तारकासुर नावाच्या महाबलाढ्य दैत्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले. त्यानंतर ब्रह्मदेवाने तारकासुराला त्याच्या इच्छेनुरूप सर्व प्रकारचे वरसामर्थ्य तसेच सर्व देवादिकांपासूनही अभय दिले. त्याचवेळी शिव–पार्वतीच्या पुत्राच्या हातून तुझा मृत्यू होईल, असेही सांगितले. ब्रह्मदेवाकडून वर मिळालेला तारकासुर सर्वांना त्रास देऊ लागला. त्याने तिन्ही लोकांवर आक्रमण केले व देवादिकांवरही विजय मिळविला. तो त्रैलोक्याचा राजा झाला आणि स्वत:ची पूजा–अर्चा करवून घेऊ लागला. त्यामुळे सर्व देवांनी शंकराकडे धाव घेत तारकासुरापासून सुटका करण्याची प्रार्थना केली. त्यानंतर शंकराने आपला पुत्र स्कंद (कार्तिकेय) याला तारकासुराशी युद्ध करण्यास पाठवले. मात्र युद्धात यश मिळत नसल्याने शंकराच्या आज्ञेने कार्तिकेयाने या दंडकारण्यात दर दिवशी ‘ॐ गं गणपते नमो नमः’ या मंत्राचा एक लाख वेळा जप, एक लाख दुर्वाचन, एक लाख मोदकांचा नैवेद्य दाखवून गणेशाला प्रसन्न करून घेतले. गणेशाने आशीर्वाद देऊन त्याला पाश व अंकुश ही आयुधे दिली. त्यानंतर कार्तिकेय मयुरावर आरूढ होऊन पुन्हा तारकासुराशी लढण्यासाठी गेला. गणेशाने दिलेल्या शस्त्रांच्या साह्याने त्याने तारकासुराचा वध केला. पुढे कार्तिकेयाने येथे गणेशाची प्रतिष्ठापना केली. कार्तिक स्वामींचे लक्ष पूर्ण करणारे दैवत म्हणून या गणेशाचे नाव लक्षविनायक असे पडले. शिवपुराण, गणेशपुराण, स्कंदपुराणात लक्षविनायकाचा उल्लेख आहे.
वेरूळमधील तळाची वाडी येथे लक्षविनायक मंदिर आहे. इ. स. १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आहे. एल नदीच्या काठावर, शांत व निसर्गसमृद्ध परिसरात हे मंदिर स्थित आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातून फरसबंदी असलेल्या प्रांगणात प्रवेश करताच समोर एका पाषाणावर गणेशाचे वाहन असलेल्या मूषकाची मूर्ती दिसते. या शेंदूरचर्चित मूषकाच्या हातात मोदक आहे. मूषकाच्या मूर्तीनजीकच यज्ञकुंड आहे. लक्षविनायक मंदिराचे स्वरूप हे दर्शनमंडप, सभामंडप आणि गर्भगृह असे आहे. या मंदिराचे शिखर घुमटाकार आहे. भक्कम बांधणी असलेल्या या मंदिराच्या सभामंडपातील भिंतींवर अनेक सत्पुरुषांच्या प्रतिमा आहेत. येथे देशभरातील २१ गणेश पीठांची माहिती असलेले फलकही आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. त्यावरच्या बाजूसही गणेशमूर्ती आहे.
गर्भगृहात गणेशाची बैठक घातलेली उत्तराभिमुख मूर्ती आहे. संपूर्ण मातीची असलेली ही मूर्ती शेंदूरचर्चित आहे. साडेतीन फूट उंच असलेल्या या मूर्तीला चार हात आहेत. डाव्या सोंडेच्या मूर्तीचा एक हात मांडीवर असून दुसऱ्या हातात मोदक व वरच्या दोन हातांत आयुधे आहेत. मूर्तीच्या कपाळावर चांदीचे दुहेरी पट्टे आहेत. पूजा, अभिषेक तसेच उत्सवासाठी या मूर्तीच्या उजव्या बाजूस गणेशाची पंचधातूची मूर्ती ठेवण्यात आली आहे. या गर्भगृहात पुरुषांना कमरेच्यावरील सर्व कपडे काढून उघड्या अंगाने प्रवेश करावा लागतो. असे सांगितले जाते की उघड्या अंगाने देवाचे दर्शन घेतल्यास शरीरावर देवाचे तेज पडते व पवित्र ऊर्जा प्राप्त होते.
मंदिराच्या आवारात श्वेतार्क गणेश मंदिरही आहे. लक्षविनायकाला दररोज खडीसाखर आणि गुळाचा, तर संकष्टी चतुर्थीला मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. येथे सहस्त्र आवर्तन व गणेशयाग आदी वर्षभर सुरू असतात. कार्तिक शुक्ल षष्ठीला येथे मोठा उत्सव होतो. त्यावेळी मंत्रोच्चाराच्या जयघोषात गणेशाची पूजा केली जाते, तसेच गणेशाला आवडणाऱ्या सर्व पक्वानांचा नैवेद्य अर्पण केला जातो. येथे गणेशोत्सवही मोठ्या उत्साहात साजरा होतो. दररोज सकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत भाविकांना या मंदिरात जाऊन लक्षविनायकाचे दर्शन घेता येते.
पूर्वी या परिसरात एल नावाचा राजा होता. तो गार्ग्य महर्षींचा शिष्य व गणेशाचा भक्त होता. त्याचे या परिसरातच राजधानीचे ठिकाण असल्याने हे क्षेत्र पूर्वीपासून एलापूर नावाने प्रसिद्ध होते. पुढे वेरूळ या नावाने ते ओळखले जाऊ लागले. ऐतिहासिक माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराव भोसले हे येथील पाटील होते.