विष्णूचा चौथा अवतार असलेल्या नृसिंहाची राज्यात जवळपास ३२ प्रसिद्ध मंदिरे आहेत. कोकणात संगमेश्वर तालुक्यातील मावळंगे येथील लक्ष्मीनृसिंहाचे मंदिर त्यापैकीच एक आहे. चहूबाजूंनी गर्द झाडीने वेढलेल्या एका उतारावरील भागात असलेल्या प्राचीन मंदिरातील मूर्ती ही सुमारे १८०० वर्षांपूर्वीची असल्याचे सांगितले जाते. या मूर्तीचे वेगळेपण असे की येथे नेहमीप्रमाणे मांडी घालून बसलेली चतुर्भुज मूर्ती नाही. येथे नृसिंहाच्या डाव्या मांडीवर लक्ष्मी बसलेली आहे. त्यामुळे हे मंदिर लक्ष्मीनृसिंहाचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.
मंदिराची अख्यायिका अशी की मूळचे गोदातीरी राहणारे नृसिंहभट्ट सत्यवादी हे ब्राह्मण लक्ष्मीनृसिंहाचे निस्सीम भक्त होते. ११ व्या शतकाच्या अखेरीस कोकणातील धामपुरीनजीकच्या मावळंगे येथे ते सहकुटुंब आले होते. लक्ष्मीनृसिंहाने दिलेल्या दृष्टांतानंतर त्यांनी येथेच स्थायिक होण्याचे ठरविले. त्यावेळी त्यांना एका झाडाखाली लक्ष्मीनृसिंहाची मूर्ती सापडली. तेथेच त्यांनी एक झोपडीवजा मंदिर बांधून त्यात या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. कालांतराने त्यांचे पुत्र दुसरे नृसिंहभट्ट यांनी कोल्हापूरचे शिलाहार वंशी राजा विजयार्क यांच्याकडून संगमेश्वर हे गाव इनाम म्हणून मिळवले. पुढे त्यांचे पुत्र कृष्णाजी यांनी विजयार्काचा पुत्र भोजराजा याच्या पदरी पराक्रम गाजवून संगमेश्वराची रचना केली व मावळंगे गाव इनाम मिळवत येथे मोठे मंदिर बांधले.
इ. स. १६३७ मध्ये कृष्णाजींचा वंशज असलेल्या केशवनायक यांनी या मंदिरावर दगडी घुमट, लाकडी सभामंडप व आवाराचे बांधकाम केले. इ. स. १९१० मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यावेळी देवळावर मंगलोरी कौलांचे छप्पर उभारण्यात आले. १९३८ मध्ये अहमदाबाद येथील गणेश मावळणकर यांनी रत्नागिरीतील कंत्राटदार रावसाहेब सीताराम नाना सुर्वे यांच्या मदतीने मंदिराची पुनर्निर्मिती केली. त्यासाठी ४५०० रुपयांचा खर्च आल्याची नोंद आहे. २२ नोव्हेंबर १९३८ मध्ये येथे एक संमेलन भरवून मंदिराचे उद्घाटन करण्यात आले होते.
मुंबई–गोवा महामार्गावर संगमेश्वरनजीकच्या तुरळ आणि गोळवली गावांमधून मावळंगे येथे जाता येते. गर्द झाडीने वेढलेल्या या रस्त्यावर एका उतारावरील जांभ्या दगडाची पाखाडी उतरल्यावर मंदिर परिसरात प्रवेश होतो. दुमजली सभामंडप, अंतराळ व कौलारू गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. दोन फूट उंचीच्या जोत्यावर हे मंदिर आहे. सभामंडप हा अर्धमंडप स्वरूपाचा असून बाजूने कक्षासने (बसण्यासाठीची दगडी आसने) आहेत. सभामंडपाच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी मंदिराच्या डाव्या बाजूने जिना आहे. हा सभामंडप मंदिरासमोर नंतरच्या काळात बांधला असावा. अंतराळाच्या द्वारपट्टीवर कोरीव काम असून ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. मंदिरात असलेल्या मोठमोठ्या खांबांवरील तुळयांवर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर केलेली आहे. अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला गणेशमूर्ती व डाव्या बाजूला शिवपिंडी आहे.
गर्भगृहात अखंड काळ्या पाषाणातील, आकर्षक घडणावळीची सुंदर लक्ष्मीनृसिंहाची मूर्ती आहे. मूर्तीच्या शिरावर नाजूक, सुबक कोरीव काम केलेला किरीट पद्धतीचा मुकुट आहे. मुकुटाच्या मध्यभागी कीर्तिमुख आहे. उग्र डोळे, मुखाबाहेर आलेले दोन सुळे, गळ्यात वैजयंतीमाला आहे. दोन्ही मनगटे, दंड तसेच पायात शिंदेशाही तोडे आहेत. मूर्तीच्या उजवीकडील खालचा हात गुडघ्यावर टेकविलेला आहे व वरच्या हातात चक्र आहे. डावीकडील वरच्या हातात शंख व खालचा डावा हात डाव्या मांडीवर बसलेल्या लक्ष्मीला आधार देत आहे. ही मूर्ती शेषनागावर विराजमान आहे. मूर्तीच्या पायांजवळ शेषनागाचे शेपूट आहे. मागे उभे राहून शेषनागाने मूर्तीवर छत्र धरले आहे. नेहमीप्रमाणे मूर्तीच्या शीर्षावर शिवलिंग कोरलेले दिसते.
मूर्तीमागील प्रभावळीवर डावीकडून उजवीकडे अशा रचनेत दशावतार कोरलेले आहेत. मत्स्य अवतारात अर्धे मस्त्यरूप व अर्धे विष्णू रूप दाखवण्यात आलेले आहे. वामनावतारात हातात दंड व कमंडलू आहे. कृष्णाची मूर्ती चतुर्भुज असून त्यात शंख, चक्र, गदा व पद्म आहेत. बुद्धावतार ध्यानधारी आहे. कल्की अवतार हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वार होऊन युद्धावर निघालेला आहे. भक्त प्रल्हादाची मूर्ती मुकुटधारी असून ती नमस्कार मुद्रेत आहे. त्यापैकी मत्स्य व कूर्म अवतार हे मनुष्य रूपात आहेत. संपूर्ण मूर्ती योगचक्रावर बसलेली आहे. नृसिंहांच्या मांडीवर नऊवारी नेसलेली लक्ष्मी असून तिची केशरचना खास महाराष्ट्रीय खोपा पद्धतीची आहे. तिने केसात केतकी व केवड्याचे पान खोचले आहे. तिची आभूषणे मराठी शैलीतील आहेत. बिंदी, नाकात नथ, कानात कुड्या, गळ्यात वज्रटीक, दोन वाट्यांचे मंगळसूत्र, तसेच ६४ पुतळ्यांची माळ तिने परिधान केलेली आहे. या योगसालंकृत लक्ष्मीचा उजवा हात ‘धनदेवता’ असून तिने डाव्या हातात कमळपुष्प धऱलेले आहे.
मावळंगे येथील लक्ष्मीनृसिंह हा परिसरातील बारा गावांचा देव आहे. देवाची दररोजची पूजा करणे, नंदादीप लावणे, मंदिराची साफसफाई अन् स्वच्छता ठेवणे अशी जबाबदारी येथील बारा गावांकडे वाटून देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे अधिक मासाचीही व्यवस्था लावण्यात आलेली आहे. मंदिरात वैशाख महिन्यात नृसिंह जयंतीचा उत्सव होतो. उत्सवादरम्यान मंदिरात पूजा, त्रिकाल एकादष्णी, नैवेद्य, लळित, कीर्तन व भजन असे कार्यक्रम असतात. आषाढ शुद्ध एकादशीला येथे अखंड नामसंकीर्तन व त्रिपुरी पौर्णिमेला दीपोत्सव असतो. भक्तांच्या हाकेला धावून जाणारा, अशी ख्याती असलेला हा देव येथील मावळणकर, सरदेसाई, देसाई, गोविलकर, लळीत, देशमुख, सप्रे या कुटुंबांचा कुलस्वामी आहे.
मावळंगे हे स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष दादासाहेब मावळणकरांचे, तसेच मराठ्यांच्या इतिहासाची सविस्तर मांडणी करणारे रियासतकार गो. स. सरदेसाई यांचे गाव आहे.