लक्ष्मीनारायण मंदिर

भराडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी

राजापूर तालुक्यातील वाडा भराडे मोगरे गावांच्या वेशीवर, वैष्णवी नदीच्या तीरावर, सुमारे ४०० वर्षांपूर्वीचे लक्ष्मीनारायणाचे प्रसिद्ध मंदिर आहे. निसर्गसमृद्ध परिसरात वसलेले हे देवस्थान परांजपे, देव आणि मंडलिक कुटुंबीयांचे श्रद्धास्थान कुलदैवत आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार, सवाई माधवराव पेशवे यांच्या जन्मदिवसानिमित्त मंदिराच्या सभामंडपाच्या बांधकामासाठी १०० झाप काही देणगी देण्यात आली होती. श्री देव लक्ष्मीनारायण सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण करतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मुख्य रस्त्यापासून काहीशा खोलवर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या उतरून जावे लागते. मंदिराभोवताली चारही बाजूने जांभ्या दगडाची भक्कम तटबंदी आहे. तटबंदीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. भाविकांच्या सोयीसाठी या प्रांगणात पत्र्याची शेड उभारण्यात आली आहे. मुख्य मंदिरासमोरील बाजूस २५ ते ३० फूट उंचीची दगडी दीपमाळ मोठे तुळशी वृंदावन आहे. या पूर्वाभिमुख मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी आहे. मंदिराच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर लाकडांचा वापर करण्यात आला असून मंदिरावर कौलारू छप्पर आहे. २०११ साली मंदिराला ४०० वर्षें पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मंदिराचे सभामंडप गर्भगृहाचे नूतनीकरण करण्यात आले. मंदिराच्या आवारात एक मोठी जुनी विहीर आहे.

सभामंडप खुल्या प्रकारातील आहे. अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ श्रीगणपती श्रीदत्त यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात एका दगडी चौथऱ्यावर शाळीग्राम शिळेमध्ये घडविलेली लक्ष्मीनारायणाची दोन फूट उंचीची मूर्ती आहे. गरुडाच्या मस्तकावर डावी मांडी दुमडून नारायण बसलेले आहेत त्यांच्या डाव्या मांडीवर लक्ष्मी बसलेली आहे. मूर्तीच्या खालील बाजूस द्वारपाल आहेत. नारायणाची मूर्ती चार हातांची असून उजवीकडील वरच्या हातात चक्र खालच्या हातात शंख आहे, तर डावीकडील वरच्या हातात गदा अशी आयुधे खालील हातात पद्म आहे. मूर्तीच्या मस्तकावर पंचमुखी नागाचा फणा, तर मागे सुबक नक्षीदार प्रभावळ आहे. या मंदिरात भाविकांना पूजा, अभिषेक, महानैवेद्य किंवा इतर धार्मिक विधी करता येतात. त्यासाठी मनिऑर्डर पाठवल्यास धार्मिक विधी संपन्न करून प्रसाद अंगारा पाठविला जातो. (संपर्क : श्री देव लक्ष्मीनारायण मंदिर : विनायक परांजपे, अध्यक्ष : ९८२१२६०३९३, अविनाश कामत, उपाध्यक्ष : ७५८८३६९८८२)

श्रावण महिन्यात कृष्णजन्म म्हणजेच गोकुळाष्टमीचा सोहळा येथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. श्रावण कृष्ण सप्तमी अष्टमी म्हणजेच श्रीकृष्ण जयंती गोपाळकाला हे दोन दिवस हा उत्सव चालतो. या उत्सवासाठी महाराष्ट्रासोबतच गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, तसेच विदेशातूनही परांजपे कुटुंबीय उपस्थित असतात. सप्तमीच्या दिवशी या मंदिरापासून सात किमी अंतरावर असलेल्या आडिवरे येथील देवी महाकाली मंदिरात या कुटुंबीयांकडून महाकालीची खणानारळाने ओटी भरली जाते. परंपरेनुसार सर्वांचे क्षेमकुशल व्हावे, यासाठी तिला सामूहिक गाऱ्हाणे घातले जाते. त्यानंतर सर्वजण भराडे येथील लक्ष्मीनारायण मंदिरात येऊन सामूहिक आरती होते उत्सवाला सुरुवात होते. अत्यंत दुर्गम भागात असलेले हे मंदिर यावेळी विविध फुलांनी, तसेच विद्युत रोषणाईने सजविले जाते.

दुसऱ्या दिवशी म्हणजे श्रावण कृष्ण अष्टमीच्या दिवशी सकाळी सामूहिक विष्णुसहस्त्रनामावलीचे पठण केले जाते. त्यानंतर कीर्तन होते ते संपल्यानंतर श्रीकृष्णाच्या पाळण्याभोवती उपस्थित भाविक फेर धरून नाचतात. मंदिराजवळ असलेल्या ओढ्यात श्रीकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालून त्याची विधिवत पूजा आरती करून सर्व भाविक पुन्हा मंदिरात परततात. परंपरेनुसार त्यानंतर येथील पुजारी सामूहिक गाऱ्हाणे घालतात, त्यानंतर देवाला महानैवेद्य दाखविला जातो. याशिवाय येथे कार्तिकी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. आश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या कालावधीत हा उत्सव पार पडतो. यावेळी दररोज दीपोत्सव, दीपमाळ प्रज्वलित करणे, हरिजागर काकडा हे कार्यक्रम असतात. कार्तिक शुद्ध दशमीला रात्री दहा वाजता पालखी निघते. दत्त जयंतीच्या दिवशी येथील ग्रामस्थांच्यावतीने सत्यनारायणाची महापूजा आणि महाप्रसाद असा कार्यक्रम होतो.

लक्ष्मीनारायण मंदिरात बाहेरगावाहून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी यासाठी मंदिर समितीतर्फे भक्त निवास भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. आधी कल्पना दिल्यास नाममात्र शुल्क भरून भाविकांची राहण्याची सोय होते. (संपर्क : ०२३५३ २२६४७७)

उपयुक्त माहिती:

  • राजापूरपासून २६ किमी, तर रत्नागिरीपासून ४४ किमी अंतरावर
  • येथे येण्यासाठी एसटीची सुविधा नाही
  • आडिवरे येथून रिक्षा वा खासगी वाहनांनी येजा करता येते
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
Back To Home