श्रीकृष्ण म्हटल्यावर साधारणतः आपल्यासमोर उभी राहते ती बासरी वाजवणारा, डोक्यात मोरपीस खोचलेल्या देवाची प्रतिमा; परंतु चिपळूण तालुक्यातील वीर येथील कृष्णाचे रूप हे पूर्णपणे वेगळे आहे. येथील कृष्ण हा राक्षसांचे निर्दालन करणारा आहे, म्हणून त्याला मल्लमर्दन असे नाव पडले. ग्रंथांमधील वर्णनानुसार, कंसाने कृष्णाला मारण्यासाठी जे आठ मल्ल पाठवले होते. त्या सगळ्यांना एका वेळी मारणारा, असा हा श्रीकृष्ण येथे आहे. अभ्यासकांच्या मते, ही मूर्ती बाराव्या वा तेराव्या शतकातील म्हणजे शिलाहार काळातील असावी.
या मूर्तीची अख्यायिका अशी की लक्ष्मीमल्लमर्दनाने देवपाटकर घराण्यातील एका पुरुषाला स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले की मी वीर येथील खाडीत आहे, तेथून मला बाहेर काढ व मंदिर बांध. या दृष्टांतानुसार शोध घेतला असता खाडीत मूर्ती सापडली. त्यानंतर ग्रामस्थांनी तिची गावाजवळ असलेल्या एका डोंगरावर स्थापना करून त्या जागेवर लहानसे मंदिर बांधले. त्यानंतर काही वर्षांनी ग्रामस्थांपैकी काही जणांना देवाने दृष्टांत दिला की या मंदिरावर दरड कोसळणार आहे, त्यामुळे मला इथून हलवा. त्याप्रमाणे ग्रामस्थांनी तेथून मूर्ती काढली व सध्याचे जे मंदिर आहे तेथे आणली. येथून मूर्ती पुढे हलेना म्हणून याच जागेवर ग्रामस्थांनी एक लहान मंदिर बांधून त्यात या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. स्वप्नदृष्टांत देऊन देवाने सांगितल्याप्रमाणे काही दिवसांतच जुन्या मंदिरावर दरड कोसळून ते मंदिर गाडले गेले. सध्याच्या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार झालेला आहे.
दुसऱ्या अख्यायिकेनुसार, लक्ष्मीमल्लमर्दनाची मूर्ती ही पूर्वी पांढऱ्या रंगाची होती. या देवाला कोणताही भ्रष्टाचार चालत नसे. भ्रष्टाचार झाल्यास हा देव स्वतःला जाळून घेई. अशा प्रकारे देवाने दोन ते तीन वेळा जाळून घेतल्याने ही मूर्ती विटकरी रंगाची झाली आहे, तर काहींच्या मते अनेक वर्षे पाण्यात राहिल्यामुळे तिला सध्याचा रंग आला आहे. असे सांगितले जाते की येथे कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाल्यास येथील कुंडाचे पाणी आटते. त्यानंतर सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन देवाची क्षमा मागतात, कुंडात पंचगव्य (गायीचे दूध, दही, गोमूत्र, तूप व शेण) टाकतात. त्यानंतर पुन्हा कुंड पाण्याने भरून जातो.
चिपळूण–सावर्डे–वहाळ–शिरंबे या मार्गाने वीर गावातील लक्ष्मीमल्लमर्दन मंदिरात जाता येते. मंदिर निसर्गसमृद्ध परिसरात डोंगरांच्या मध्यभागी आहे. पावसाळ्याच्या दिवसांत चारही बाजूंनी मंदिरापर्यंत वाहत येणारे पाण्याचे ओहोळ, मंदिराजवळून खळाळत वाहणारा प्रवाह, यामुळे परिसर सुंदर भासतो. मुख्य रस्त्यापासून काहीशा खालच्या भागात मंदिर आहे. कौलारू, दुमजली खुला सभामंडप आणि उंच गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. गर्भगृहात एका चौथऱ्यावर सुमारे सहा फूट उंचीचा व सहा फूट रुंदीचा असा मोठा दगड आहे. त्यावर मध्यभागी श्रीकृष्ण व त्याच्या सभोवती गोलाकार रचनेत आठ मल्ल, अशी ही दुर्मिळ मूर्ती येथे आहे. कंसवधाच्या आधी श्रीकृष्णाने अनेक मल्लांना मारले म्हणून तो मल्लमर्दन झाला. हे आठही मल्ल श्रीकृष्णाभोवती फेर धरल्यासारखे पाहायला मिळतात.
श्रीकृष्णाच्या मूर्तीला चार हात आहेत. त्यातील तीन हातांमध्ये गदा, शंख व चक्र आहे, तर एका हाताने मल्लाला पकडले आहे. मूर्तीच्या खालील भागात डावीकडे गरुड व उजवीकडे हातात नांगर धरलेला बलराम, असे शिल्पांकन या मूर्तीत दिसते. मूर्तीच्या मागे एक प्रभावळ असून त्याच्या माथ्यावर मकरतोरण आहे. त्या तोरणात विष्णू व लक्ष्मीची मूर्ती आहे. लक्ष्मीचे शिल्पांकन असल्यामुळे या देवाला लक्ष्मीमल्लमर्दन असे नाव पडले. सर्व मूर्तींना वज्रलेप केल्यामुळे त्यांचे सौंदर्य आणखी वाढले आहे.
कार्तिक शुद्ध एकादशी ते त्रयोदशी हा येथील मुख्य उत्सव असतो. गोकुळाष्टमीचा उत्सवही येथे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. पेशवाईपासून या मंदिराला २५ रुपये वर्षासन आहे व त्याबद्दलची एक सनदही आहे. येथील वीरकर व भोळे कुटुंबीयांचे लक्ष्मीमल्लमर्दन हे कुलदैवत आहे. मंदिराशिवाय येथे रत्नेश्वर, केदार, वाघजाई, नवलाई, सोमेश्वर, वरदान मानाई ही मंदिरे आहेत. वरदान देवीच्या मंदिराजवळच एक पाषाण असून याला चंद्रराव मोरे यांचा ‘वस’ म्हणतात. येथील मोरे यांना आदिलशाहीच्या काळात इनामात जावळीचा परिसर व चंद्रराव हा किताब मिळाला होता. त्यांची स्मृती म्हणून येथे हा पाषाण बसविलेला आहे.