रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात सडवे येथे असलेले श्री लक्ष्मीकेशवाचे मंदिर कोकणातील अतिप्राचीन मंदिरांपैकी एक आहे. काहीशा आडवाटेवर असलेले हे मंदिर गर्द हिरवाईतून वाहणाऱ्या ओढ्याजवळ स्थित आहे. येथील मूर्तीच्या पादपीठावर कोरलेला संस्कृत भाषेतील शिलालेख हे येथील वैशिष्ट्य आहे. पादपीठावर असा स्पष्ट कालोल्लेख असलेली मूर्ती अन्यत्र कुठे नसावी म्हणून हे ठिकाण विशेष ठरते. या शिलालेखानुसार ही मूर्ती सुमारे ८०० वर्षांपूर्वीची म्हणजेच तेराव्या शतकात घडविलेली आहे.
दापोली–सडवली–कोळबांद्रे मार्गावर सडवे फाट्यावरून ग्रामपंचायतीच्या शेजारी असलेल्या शाळेजवळून एक तीव्र उताराचा रस्ता खाली ओढ्यापर्यंत जातो. या ओढ्याच्या काठावर काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धारित केलेले तटबंदीयुक्त मंदिर नजरेस पडते. तटबंदीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर प्रथम सहा टप्प्यांची जांभ्या दगडांची दीपमाळ दिसते. येथील मंदिर जमिनीपासून एक ते दीड फूट उंचीच्या जोत्यावर आहे. दुमजली सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी बाहेरून डाव्या बाजूने पायऱ्या आहेत. तेथून मंदिराचा कळस जवळून पाहता येतो. येथील सभामंडप हा अर्धमंडप स्वरूपाचा आहे. सभामंडपाच्या बाह्य भिंती या दोन फूट उंचीच्या असून त्यावर भाविकांना बसण्याची सुविधा आहे.
गर्भगृहात श्रीलक्ष्मीकेशवाची सुमारे चार फूट उंचीची मूर्ती आहे. मूर्तीला जवळून न्याहाळले असता त्यावर वैशिष्ट्यपूर्ण कोरीवकाम दिसते. मूर्तीच्या खालील देवपीठावर एक शिलालेख आहे. ‘स्वस्ती श्री शके संवत ११२७. तिस्क सोमदिने रोहिणी नक्षत्रे इय स्थापितेन सुवर्णकार कामदेवेन घटितं’ या संस्कृत शिलालेखावरून विष्णूची मूर्ती उत्तर शिलाहार राजा द्वितीय केशीराज याचा मांडलिक जैत्र सामंत याचा प्रधान देवूगीनायक याने शके ११२७ म्हणजे इ.स. १२०५ मध्ये सोमवारी रोहिणी नक्षत्रावर स्थापन केली, असे स्पष्ट होते. स्थानिक मंडळी याला लक्ष्मीनारायण मंदिर म्हणत असले, तरी येथील मूर्तीच्या हातातील आयुधांचा क्रम (प–श–च–ग) लक्षात घेता ती केशवविष्णूची असल्याचे लक्षात येते. या मूर्तीच्या खालच्या उजव्या हातात कमळ (पद्म), वरच्या उजव्या हातात शंख, वरच्या डाव्या हातात चक्र आणि खालच्या डाव्या हातात गदा अशी आयुधे आहेत. मूर्तीच्या डाव्या पायाजवळ छोटी लक्ष्मीमूर्ती असल्याने ही मूर्ती लक्ष्मीकेशवाची आहे.
ही विष्णूची मूर्ती दोन्ही पायांवर समान भार देऊन उभी आहे. मस्तकावर अतिशय नाजूक कलाकुसर असणारा उभट आकाराचा करंडक मुकुट आहे. मूर्तीचे डोळे आणि भुवया उठावदार आहेत. कानामध्ये भरीव जाड ताटके (वर्तुळाकार कर्णभूषणे) आहेत. त्रिवलयी गळ्यात प्रथम मोठ्या मण्यांची साखळी, त्यानंतर लहान मण्यांचा दुहेरी गोफ, त्याखाली अनेक साखळ्यांचा फलकहार, त्यानंतर तीन मोठे हार, असे अलंकार आहेत. पायांत साखळ्या व तोडे, घोट्यापर्यंत आलेला प्रलंबहार, कमरेला साखळ्यांची मेखला आणि पोटावर उरुबंध आहे. सर्व बोटांमध्ये अंगठ्या, मनगटांमध्ये मनगट्या (कंकणे आणि साखळ्या), दंडांत केयूर (बाजूबंद), खांद्यांवर स्कंदपत्रे अशी आभूषणे अतिशय नाजूकपणे कोरलेली आहेत. मूर्तीच्या मागे असलेल्या दगडी प्रभावळीत डावीकडे कूर्म, वराह, वामन, परशुराम व बुद्ध, तर उजवीकडे कल्की, बलराम (कृष्ण नाही), राम, नृसिंह, मत्स्य असे दशावतार कोरलेले आहेत. विष्णुमूर्तीच्या मुकुटाच्यावर व प्रभावळीच्या मध्यभागी कीर्तिमुख आहे.
मूर्तीच्या उजव्या पायाजवळ गणेशमूर्ती आणि डाव्या बाजूला एक फूट उंचीची गरुडमूर्ती आहे. या गरुडमूर्तीच्या मस्तकावर निमुळता होत गेलेला कलाकुसरयुक्त मुकुट आहे. धारदार नाक आणि त्याची मान किंचित तिरकी आहे. कानात ताटके, मनगटांमध्ये जाड तिहेरी कंकणे, दंडांत केयूर, खांद्यांवर स्कंदपत्रे, त्रिवलयी गळ्यात दोन–तीन साखळ्या आणि एक फलकहार व कमरपट्ट्याला मण्यांच्या अनेक माळा आहेत. गरुडाच्या डाव्या हाताच्या कोपराखाली एका सापाची आकृती आहे.
मंदिराच्या गर्भगृहावर असणाऱ्या उंच शिखरावर अतिशय बारकाईने कोरीवकाम केलेले दिसते. आवारात मंदिराच्या मागच्या बाजूला एक लहानसे कुंड आहे. त्यात अनेक कमळपुष्पे असून बाराही महिने त्यात पाणी असते. मंदिरासमोरून झुळझुळ वाहणारा बारमाही झरा, निसर्गसमृद्ध परिसर आणि सोबतीला कानावर पडणारे विविध पक्ष्यांचे कुजन येथे अनुभवता येते. या मंदिरासोबतच कोकणात शेडवई, बिवली, शीर, धामणी, कोळिसरे, दिवेआगर आदी ठिकाणी शिलाहारकालीन विष्णुशिल्पे आहेत. सुमारे ८०० ते १००० वर्षांपूर्वीची ही शिल्पे कोकणातील प्राचीन वारशाची प्रतिके ठरली आहेत.