लक्ष्मीकेशव मंदिर

कोळीसरे, ता. रत्नागिरी, जि. रत्नागिरी

समुद्रसपाटीपासून १५०० फूट उंचीवर, हिरव्यागार डोंगराच्या कुशीत, शास्त्री नदीच्या काठावर वसलेले रत्नागिरीतील कोळीसरे येथील लक्ष्मीकेशवाचे प्राचीन मंदिर हे जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. केसराज या नावानेही ते ओळखले जाते. येथील देवाच्या पायाखालून बारमाही वाहणारा, औषधी गुण असलेला झरा, हे येथील वैशिष्ट्य आहे. असे सांगितले जाते की हे पाणी काचेच्या बाटलीत भरून कितीही वर्षे ठेवले तरी ते खराब होत नाही. येथील काणे कुटुंबांसह इतरही अनेक कुटुंबांचे लक्ष्मीकेशव हे कुलदैवत आहे.

मंदिराची अख्यायिका अशी की .. ७५० ते ९७३ या कालावधीत राष्ट्रकुट घराण्यातील विष्णुभक्त राजांनी महाराष्ट्रात अनेक मंदिरे उभारली होती. पुढे हा भाग यादवांच्या अमलाखाली आला. काही वर्षांनी जुलमी मूर्तीभंजक मुघल राजवटीदरम्यान अनेक मंदिरांतील मूर्तींचे संरक्षण करण्यासाठी त्या गुप्त ठिकाणी हलवण्यात आल्या. त्यापैकी लक्ष्मीकेशवाची मूर्ती कोल्हापूरच्या रंकाळा तलावात दडवून ठेवण्यात आली होती. काही वर्षांनी वऱ्हवडे गावातील काणे, जोशी विचारे या घराण्यांतील तीन पुरुषांना एकाच वेळी ही मूर्ती रंकाळा तलावात असल्याचा दृष्टांत झाला. त्यानंतर त्यांनी कोल्हापूरला जाऊन मूर्ती तलावातून बाहेर काढली. त्यांनी या मूर्तीची प्रतिष्ठापना येथून जवळच असलेल्या रीळ या गावात करण्याचे ठरविले होते.

एका लाकडी पेटीतून ही मूर्ती कोल्हापूर येथून आणत असताना रात्रीच्या मुक्कामासाठी ते कोळीसरे येथे थांबले होते. सकाळी पुन्हा प्रवासाला निघाले असता मूर्ती असलेली पेटी प्रचंड जड झाल्याचे त्यांना जाणवले. मजुरांनाही ती पेटी उचलता येत नव्हती. अखेर देवाला येथेच मुक्काम करायचे असल्याचे त्यांच्या ध्यानात आले. त्याच सुमारास अंजनवेलच्या गोपाळगडाचे किल्लेदार असलेल्या भानूप्रभू तेरेदेसाई यांना देवाने दृष्टांत देऊन कोळीसरे येथे माझी प्रतिष्ठापना कर, असे सांगितले. त्यानुसार तेरेदेसाई यांनी १५१० मध्ये हे मंदिर उभारले होते. नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे.

जयगडवरून चाफेकडे येताना डावीकडे कोळीसरे फाटा लागतो. तेथून कोळीसरे गावातील मंदिराच्या पाखाडीपर्यंत (पायरी वाट) जाता येते. ४० ते ५० पायऱ्यांची ही पाखाडी उतरत असताना दुरूनच मंदिराच्या कळसाचे दर्शन होते. मंदिर परिसर गर्द झाडीने वेढलेला आहे. मंदिराला खालच्या बाजूला बारमाही वाहणारा झरा आहे. हे मंदिर उभारण्यासाठी खणायला सुरुवात केल्यानंतर एके ठिकाणी पाण्याची धार लागली. त्यामुळे देवाच्या पायाखाली हा झरा लागल्याची मान्यता आहे. असे सांगितले जाते की पावस येथील स्वामी स्वरूपानंद समाधी घेण्यापूर्वी त्यांचा एक भक्त या झऱ्यातून त्यांच्यासाठी रोज ४० लिटर पाणी घेऊन जात असे.

कौलारू असणाऱ्या लक्ष्मीकेशव मंदिराच्या बांधकामात लाकूड जांभ्या दगडाचा वापर करण्यात आलेला आहे. खुला सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी त्याची रचना आहे. सभामंडपात कोरीव लाकडी खांब असून येथे भाविकांना बसण्यासाठी कक्षासने (दगडी बाके) आहेत. सभामंडपात अंतराळाच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूंना दोन हत्तींच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात नेपाळमधील गंडकी नदीतील काळसर तांबूस रंगाच्या शाळिग्राम शिळेत घडवलेली लक्ष्मीकेशवाची मूर्ती आहे. सुमारे साडेपाच फूट उंच आणि सव्वादोन फूट रुंदीच्या या प्राचीन मूर्तीमधील सर्व आयुधे बारकाईने कोरलेली दिसतात. मूर्तीची नितळ झिलई (पॉलिश) सुंदर पद्धतीची आहे.

विष्णूची ही सहपरिवार मूर्ती एका रथवाहिकेवर समभार (दोन्ही पायांवर सारखाच भार देऊन) उभी आहे. डोक्यावर करंडक (उभट आकाराचा) मुकुट, मुकुटापासून मोत्यांच्या माळा बाहेर आलेल्या, खांद्यावर स्कंदपत्रे, दंडामध्ये केयूर (बाजूबंद), मनगटांवर कंगणे बोटांमध्ये अंगठ्या आहेत. विष्णू मूर्तीच्या डाव्या हाताखाली लक्ष्मी, तर उजव्या हाताखाली गरुड आहे. पाठशिळेच्या स्तंभावर करंडमुकुटाच्या वर कीर्तिमुखासह मकरतोरण कोरलेले आहे. मूर्तीमागील प्रभावळीवर डाव्या उजव्या बाजूस प्रत्येकी पाच अशा रीतीने विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. या मूर्तीच्या डावीकडे गणेशमूर्ती आहे.

कार्तिक शुद्ध दशमी ते पौर्णिमा या कालावधीत मंदिराचा वार्षिकोत्सव होतो. या वेळी अभिषेक, महापूजा, मंत्रपुष्पांजली, आरत्या, भोवत्या (पारंपरिक नाच) कीर्तन, नाट्यप्रवेश, महाप्रसाद आदी कार्यक्रम होतात. श्रावणात भजनाचा विशेष कार्यक्रमही होतो. हा उत्सव १८५० सालापासून येथे साजरा केला जातो. याशिवाय देवस्थान ट्रस्टला आगाऊ कल्पना दिल्यास भाविकांना येथे लक्ष्मीकेशवाचा अभिषेक करता येतो. (संपर्क : उमाजी विचारे, अध्यक्ष, लक्ष्मीकेशव देवस्थान ट्रस्ट, मो. ९४०४३३५४१३). भाविकांच्या सोयीसाठी मंदिर ट्रस्टतर्फे येथे सुसज्ज भक्त निवास आहे. यामध्ये वातानुकूलित खोल्यांचाही समावेश आहे.

उपयुक्त माहिती:

  • रत्नागिरीपासून ४० किमी अंतरावर
  • रत्नागिरीहून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • भक्त निवासाव्यतिरिक्त परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : देवस्थान ट्रस्ट : मो. ७४९९३६६६४६, मो. ९१५८०३३०२०
Back To Home