कुमारेश्वर / यज्ञेश्वर मंदिर

लोणार, ता. लोणार, जि. बुलडाणा

अशनिपातामुळे निर्माण झालेल्या लोणार सरोवराच्या काठावर वसलेल्या लहान-मोठ्या प्राचीन सोळा मंदिरांमध्ये कुमारेश्वर मंदिर हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. वनवासादरम्यान प्रभू रामचंद्र, सीतामाता व लक्ष्मण यांनी या मंदिरात येऊन कुमारेश्वराचे दर्शन घेतल्याचे सांगितले जाते. या मंदिरासमोरच सीतामातेने स्नान केलेली ‘सीतान्हाणी’ आहे. राष्ट्रकूट राजवंशाच्या राजवटीत उभारण्यात आलेल्या या मंदिरास पुढे यादवकालीन राजांनी तटबंदी बांधली होती. या मंदिराची रचना बाहेरून पिरॅमिडसारखी भासते, हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.

लोणार येथील सच्चिदानंद स्वामी यांनी १८८२ मध्ये लिहिलेल्या ‘उमारण्य माहात्म्य’ या पोथीत कुमारेश्वर नावाची कथा आहे. त्यानुसार, विंध्य पर्वताची उंची कमी करण्यासाठी अगस्ती ऋषी उमारण्यात कायम वास्तव्याला आले होते. त्याचवेळी या परिसरात अतापी व वातापी या दोन राक्षसांनी हाहाकार माजवला होता. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अगस्ती ऋषींनी शिवशंकराची आराधना केली. शिवशंकर प्रसन्न झाल्यावर ऋषींनी त्यांना या दोन राक्षसांशी युद्ध करण्याची विनंती केली. तेव्हा शिवशंकर स्वतः बटू म्हणजे कुमाराचे रूप घेऊन युद्धात सामील झाले व त्यांनी या राक्षसांना मारले. या युद्धानंतर अगस्ती ऋषींनी शिवशंकरांना येथेच विराजमान होण्याची विनंती केली. त्यानुसार शंकरांनी येथे लिंगरूपात राहण्याचे मान्य केले. त्या घटनेचे स्मरण म्हणून येथील शिवलिंगाला ‘कुमारेश्वर’ हे नाव देण्यात आले.

गोमुख धार मंदिर संकुलापासून काही अंतरावर हे मंदिर स्थित आहे. धारतीर्थापासून काही पायऱ्या उतरून या मंदिराकडे येता येते. या मंदिरासमोरील प्रवेशद्वार कालौघात भग्न झाले आहे. दोन-चार दगडी पायऱ्या चढून प्रवेशद्वारापाशी यावे लागते. येथील स्तंभांवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे आणि येथे काही मूर्तीही कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वारातून आत आल्यावर लहानशा प्रांगणात प्रवेश होतो. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला काळ्या पाषाणात घडवलेली नंदीची भव्य मूर्ती नजरेस पडते. या मूर्तीशेजारी एक भग्नावस्थेतील मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला शेंदूरचर्चित गणेशाची मूर्ती आहे. नजीकच भग्नावस्थेतील नंदीचे शिल्प आहे. मोठमोठी आयताकृती दगडे एकमेकांवर रचून एखाद्या पिरॅमिडप्रमाणे हे मंदिर उभारण्यात आले आहे.

सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. या पूर्वाभिमुख मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या द्वारपट्टीच्या मध्यभागी गणेशाचे द्वारशिल्प आहे. बंदिस्त स्वरूपाच्या येथील सभामंडपात पश्चिम, उत्तर व दक्षिण दिशेला दरवाजे आहेत. सभामंडपात आठ दगडी स्तंभांच्या मध्ये चौकोनी रंगशिळा आहे, जिचा वापर प्राचीन काळी नृत्य-गायनासाठी केला जात असे. सभामंडपातील सर्व स्तंभ दगडी स्तंभपादावर उभे आहेत. या सभामंडपात प्राचीन काळातील दगडी दिवा आहे. सभामंडपातील भिंतींवर देवकोष्टके व वितानावर नक्षीकाम आहे. अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर गंगा-यमुना व द्वारपाल शिल्पे आहेत. ललाटबिंबावर गणेशाचे शिल्प आहे. गर्भगृहात जमिनीवर कुमारेश्वराची मोठी पिंडी आहे. असे सांगितले जाते की मंदिर परिसरात वाहणाऱ्या गुप्त जलधारेमुळे ही पिंडी नेहमी ओली असते.

या मंदिरासमोरच सीतान्हाणी आहे. वनवासादरम्यान प्रभू रामचंद्र, सीतामाता व बंधू लक्ष्मणासह येथे आले होते. या मंदिरापासून काही अंतरावर यज्ञेश्वर मंदिर आहे. सध्या काहीशा भग्नावस्थेत असलेल्या या मंदिराचे सौंदर्य तत्कालीन काळात अजोड होते. या मंदिराला ‘दैत्यगुरु शुक्राचार्यांची वेधशाळा’ असेही संबोधले जात असे. येथून तारे व ग्रहांचा अभ्यास केला जात असे. साचेबद्ध पद्धतीने दगडी खांबांवर उभारण्यात आलेल्या या मंदिराच्या सभामंडपाच्या छतावर विशिष्ट पद्धतीचे घुमट होते. या घुमटाला चारही बाजूंनी छिद्रे होती. सभामंडपातून घुमटाद्वारे अवकाशातील तारे व ग्रहांचा अभ्यास करून पावसाचा अंदाज बांधला जात असे.

प्राचीन काळी या मंदिरात होमहवन केले जात असे. तसेच येथे आयुर्वेदाचा अभ्यासही केला जात असे. यज्ञेश्वर हे आयुर्वेदाचे तज्ज्ञ होते. त्यांनी परिसरातील वनस्पतींचा अभ्यास करून विविध रोगांवर औषधे शोधून काढली. चालुक्य राजवटीदरम्यान दुसरा विक्रमादित्य याने हे मंदिर बांधल्याचे म्हटले जाते. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ, गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. या मंदिरावर अनेक शिल्पे कोरलेली आहेत. त्यात मैथुनशिल्पांचाही समावेश आहे. या मंदिर परिसरात चुंबकीय आकर्षण असलेले काही दगड आहेत. या दगडांवर दुसरा दगड आपटल्यास लोखंडासारखा आवाज येतो.

महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यात शेकडो भाविक ‘हर हर महादेव’च्या जयघोषात कुमारेश्वर मंदिरात महादेवाला बेलपत्र अर्पण करून अभिषेक करण्यासाठी येतात. या मंदिरात साजरा करण्यात येणारा मुख्य उत्सव महाशिवरात्र हा आहे. यावेळी येथील महादेवाच्या पिंडीला अभिषेक आणि रुद्राभिषेक केला जातो. यावेळी भजन-कीर्तन आणि आरतीही होते. त्यात अनेक भक्त सहभागी होतात. श्रावण महिन्यातही अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात.

उपयुक्त माहिती:

  • लोणार बस स्थानकापासून ६०० मीटर अंतरावर
  • बुलडाणा येथून ९२ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून लोणारसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने धार तीर्थाच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात. तेथून पायरी मार्गाने मंदिरापर्यंत यावे लागते
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय

कुमारेश्वर/यज्ञेश्वर मंदिर

लोनार, ताल. लोनार, जिला. बुलढाणा

Back To Home