रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जामगे येथील कोटेश्वरी–मानाई देवी मंदिर कोकणातील प्रसिद्ध व प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. नवसाला पावणाऱ्या व भक्तांच्या हाकेला धावून जाणाऱ्या, अशी या देवींची ख्याती आहे. येथे होणारा नवरात्रोत्सव हा सर्वात मोठा उत्सव असून या काळात हजारो भाविक कोटेश्वरी–मानाई देवीच्या दर्शनाला येतात. शिवकाळाला उजाळा देण्यासाठी या मंदिर परिसरात उभारण्यात आलेली भव्य शिवसृष्टी हे येथील वैशिष्ट्य आहे.
मंदिराची आख्यायिका अशी की आता जेथे मंदिर आहे तेथून काही अंतरावर पालगड किल्ला आहे. गिरीदुर्ग प्रकारातील हा किल्ला शिवकाळात स्वराज्याशी जोडला गेला होता. या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले पालगड हे साने गुरुजींचे जन्मगाव. येथे त्यांचे स्मारकही आहे. या किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते देवींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. तेव्हा प्रतापजी कदम नावाच्या सरदारावर किल्ल्याची जबाबदारी होती. काही काळानंतर मुस्लिम आक्रमणादरम्यान किल्ल्याचे बांधकाम ढासळल्याने कदम यांनी जामगे येथे गाव हलवले. ते स्वतःही येथे वास्तव्यास आले. १६६० मध्ये देवीचे स्थानही येथे आणले गेले. तेव्हापासून हे देवस्थान येथे आहे. १३ मे २००२ रोजी जीर्णोद्धार केल्यानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
जामगे गाव हे निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. गावातील रस्त्यावर असलेल्या जांभ्याच्या कमानीतून मंदिरापर्यंत जाता येते. येथून पुढे आल्यावर काही अंतरावर असलेल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर डाव्या बाजूला तोफा चालवणाऱ्या मावळ्यांची आकर्षक शिल्पे लक्ष वेधून घेतात. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना हत्तींचे मोठे पुतळे आहेत. या हत्तींवर अंबारी असून माहुत त्यांचे सारथ्य करत आहेत. येथून काही अंतरावर येताच दोन्ही बाजूला सशस्त्र व घोड्यावर स्वार असलेल्या मावळ्यांचे पुतळे दिसतात. येथील राजवाड्याची रचना असलेल्या वास्तूत शिवरायांचा सिंहासनाधिष्टीत वैशिष्ट्यपूर्ण पुतळा आहे. शेजारी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या जिजाऊ आहेत.
मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला सोंड उंचावलेल्या गजराजांचे मोठे पुतळे आहेत. मंदिराभोवती जांभ्या दगडांची मोठी तटबंदी आहे. या तटबंदीतील प्रवेशद्वाच्या कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. आतील बाजूस मंदिरासमोर दोन्ही बाजूला नव्याने बांधलेले मोठे दीपस्तंभ आहेत. दुमजली मंदिराच्या सभामंडपातील खांबांवर नक्षीकाम आणि रंगकाम करण्यात आलेले आहे. सभामंडपाच्या एका बाजूला अखंड दगडातील नंदीची मूर्ती आहे. त्यासमोर असलेल्या खुल्या गर्भगृहात शिवपिंडी आहे. या गर्भगृहाबाहेर डावीकडे गणपती, तर उजवीकडे हनुमान यांच्या मूर्ती आहेत. येथील दुसऱ्या गर्भगृहात कोटेश्वरी–मानाई देवी विराजमान आहेत. या मूर्तींच्या मागे सूर्यप्रतिमा व दोन्ही बाजूंना सिंह आहेत. मंदिरात सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, बृहस्पती, शुक्र, राहू, केतू आणि शनि या नवग्रहांच्या पाषाणी मूर्तीही आहेत.
नवरात्रोत्सव हा येथील प्रमुख उत्सव आहे. नवसाला पावणारे अशी या देवस्थानाची ख्याती असल्याने कोकणासह राज्यातील अनेक जिल्ह्यांतून हजारो भाविक या उत्सवादरम्यान येथे येतात. या काळात देवीला नवस केले तसेच फेडलेही जातात. उत्सवादरम्यान मंदिरात कीर्तन, भजन, जाखडी नृत्य, गरबा असे कार्यक्रम होतात. दरवर्षी १३ मे हा दिवस मंदिराचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. तीन दिवस चालणाऱ्या सोहळ्यात चंडिका यज्ञ केला जातो. येथील शिमगोत्सवही प्रसिद्ध आहे. होलिकादहनाच्या दुसऱ्या दिवशी देवीची पालखी पालगड किल्ल्यावर जाते. असे सांगितले जाते की किल्ल्यावर पालखी जाताना ती जड लागते. मात्र किल्ला परिसरात गेल्यावर ती फुलासारखी हलकी होते.
मंदिर परिसरातील कृत्रिम तलावाजवळ अनेक आकर्षक शिल्पे आहेत. या तलावाच्या मध्यभागी एका चौथऱ्यावर नंदीचे मोठे शिल्प असून समोरच्या बाजूस महादेवाची आकर्षक व मोठी मूर्ती आहे. नंदीच्या शिल्पाजवळ जलपरींचीही शिल्पे आहेत. तलावाच्या सभोवती गजराजांची शिल्पे आहेत. या मंदिरापासून काही अंतरावरच गर्द वनराईतील धबधबा येथे येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण आहे. वर्षा सहलीसाठी येथे अनेक पर्यटक येतात.
प्रत्येक तीन वर्षांनी येथून जवळच असलेल्या आंबये गावी यात्रा असते, त्यामध्ये कोटेश्वरी–मानाई देवींचा मान पहिला असतो. त्यानंतरच तेथे लाट फिरवण्याचा कार्यक्रम सुरू होतो.