कोटेश्वर मंदिर,

लिंब-गोवे, ता. सातारा, जि. सातारा

साताऱ्याजवळ लिंब हे गाव येथील बारा मोटा असलेल्या विहिरीमुळे प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर या गावातील कृष्णा नदीच्या पात्रातील खडकावर असलेले कोटेश्वर महादेवाचे मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नदी पात्रात मध्यभागी असलेले हे मंदिर पाहण्यासाठी पर्यटकही येथे मोठ्या प्रमाणावर येतात. या गावचे वैशिष्ट्य असे की शाहू महाराजांनी देशभरातील विविध जातींच्या आंब्यांची या गावात आमराई तयार केली होती. आजही या परिसरात सर्वत्र विविध जातींच्या आंब्यांची झाडे पाहायला मिळतात.

या मंदिराबाबत अशी आख्यायिका आहे की कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वरपासून होतो आणि तेथून लिंब गावापर्यंत कृष्णाकाठावर असलेल्या सर्व शिवलिंगांची संख्या एक कोटी आहे. सर्वात शेवटचे मंदिर लिंब या गावातील असल्यामुळे या मंदिराला कोटेश्वर हे नाव पडले. त्यामुळे महाबळेश्वर येथील श्री क्षेत्र महाबळेश्वर पंचगंगा नदी मंदिराइतके महत्त्व या मंदिराचे असल्याचे मानले जाते. कृष्णा नदीचा खळाळता प्रवाह, सभोवताली असलेला निसर्गसमृद्ध परिसर, आजूबाजूची वनराई पक्ष्यांचा किलबिलाट अशा रम्य वातावरणात असलेले हे प्राचीन मंदिर जागृत देवस्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

पेशव्यांचे सरदार नारो आप्पाजी खिरे (तुळशीबागवाले) हे लिंब या गावचे. त्यांनी पुण्यातील तुळशीबाग आणि त्यातील राम मंदिर उभारले. येथेही त्यांनी कोटेश्वर शिवमंदिराची बांधणी केली. कृष्णा नदीवर असलेल्या पुलाजवळून नदी पात्रातील कोटेश्वर मंदिराजवळ जाता येते. पावसाळ्याच्या वेळेत जेव्हा नदी दुथडी भरून वाहते, तेव्हा मात्र या मंदिरात जाता येत नाही. मंदिर परिसरात फरसबंदी करण्यात आल्यामुळे हा परिसर सुंदर स्वच्छ भासतो. मुख्य मंदिराच्या आधी डाव्या हाताला एका देवळीत श्रीगणेशाची मूर्ती आहे. थोडे पुढे गेल्यावर पत्रे घातलेल्या उघड्या सभागृहात एका वडाच्या झाडाला गोलाकार पार बांधलेला आहे. या पाराच्या खालच्या खोबणीत वेगवेगळ्या मूर्ती आहेत. पाराच्या पूर्वेकडे नदीपात्रातून मंदिर परिसरात येण्यासाठी तटबंदीत मुख्य प्रवेशद्वाराची कमान आहे. या प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या समोरील बाजूस दोन कुंड असून त्यापैकी एकामध्ये नंदी शिवपिंडी आहे. तेथून काही पायऱ्या चढून मंदिर परिसरात प्रवेश होतो.

पाराच्या पश्चिमेकडे कोटेश्वर महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या दर्शन मंडपात नंदीची मूर्ती आहे. अखंड पाषाणातील या नंदीवर दागिन्यांची वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर आहे. गर्भगृहात काळ्या पाषाणातील आकाराने मोठी अशी शिवपिंडी आहे. मंदिरासमोरील कुंडात स्नान करून कोटेश्वराचे दर्शन घेतले तर त्वचा रोगांपासून मुक्ती मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. संपत्ती आणि वाहन खरेदीसाठीही या देवाला भाविकांकडून साकडे घातले जाते. महाशिवरात्री त्रिपुरारी पौर्णिमा हे उत्सव या मंदिरात मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. यावेळी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. दर श्रावणी सोमवारी येथे यात्रा भरते. माघ शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत साधारणतः दीड महिना वाई येथे कृष्णामाई महोत्सव चालतो. असे सांगितले जाते की स्वतः शिवाजी महाराजांनी हा उत्सव तेथे सुरू केला होता. याच कालावधीत लिंब गावातही मोठ्या प्रमाणात कृष्णामाईचा उत्सव साजरा केला जातो.

कोटेश्वर मंदिराशिवाय या गावातील बारा मोटा असलेली विहीर ही ऐतिहासिक आणि पाणी नियोजनाचा एक उत्तम नमुना यासाठी प्रसिद्ध आहे. सातारापुणे मार्गावर लिंब गावापासून तीन किमी अंतरावर ही विहीर आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या पत्नी राणी वीरूबाईसाहेब यांनी ही सुंदर विहीर बांधली होती. या विहिरीत उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. या पायऱ्यांवरून खाली जाताच एखाद्या किल्ल्याप्रमाणे भासणारी कमान दिसते. विहिरीत एक पूल असून त्यातून विहिरीच्या दुसऱ्या बाजूला जाता येते. येथील दगडी खांबावर गणेश, हनुमान, हत्ती, तसेच राणी वीरूबाईसाहेब यांची शिल्पे कोरलेली आहेत. त्याचबरोबर फुले पक्षी यांचे कोरीव काम आहे. बारा मोटेची विहीर या नावाने जरी ही विहीर प्रसिद्ध असली तरी प्रत्यक्षात येथे १५ मोटा होत्या, हे येथील रचनेवरून जाणवते.

येथील पाणी वाहून नेण्याची व्यवस्था वैशिष्ट्यपूर्ण आहे. आजूबाजूच्या शेतीला पाणी पुरवण्यासाठी असलेल्या १५ मोटांच्या खुणा अजूनही येथे दिसतात. या विहिरीवरील शिलालेखातश्रीमंत सौभाग्यवती वीरूबाईसाहेबअसे कोरलेले आहे. छत्रपती शाहू महाराजांनी देशभरातील विविध जातींच्या आंब्यांची रोपे मागवून लिंब गावात खास आंब्यांच्या बागा तयार केल्या होत्या. त्या झाडांनाही या विहिरीचे पाणी मिळत असे. शाहू महाराज लिंब गावात अनेकदा वास्तव्यास येत असत, असे सांगितले जाते.

उपयुक्त माहिती:

  • सातारा शहरापासून किमी, तर महाबळेश्वरपासून २५ किमी अंतरावर
  • सातारा शहरापासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home