कोटेश्वर महादेव मंदिर

नरवेल, ता. मलकापूर, जि. बुलडाणा

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील पयोष्णी आणि नळगंगा नद्यांच्या पवित्र संगमावर वसलेले नरवेल येथील कोटेश्वर महादेव मंदिर हे श्रीरामांच्या वास्तव्याने पुनीत झालेले एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या स्थळी श्रीरामांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शिवशंकर प्रकटले होते. या प्राचीन मंदिराच्या वैभवात भर घालण्याचे कार्य अठराव्या शतकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या क्षेत्राचा जीर्णोद्धार करून केले. मंदिरातील वैशिष्ट्यपूर्ण बारादरी, श्रीरामांच्या पादुका आणि दशनामी संप्रदायातील गिरी व भारती पंथाच्या साधूंची तपश्चर्या यांमुळे हे स्थान एक जागृत तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.

नळगंगा नदीच्या काठावर वसलेले मलकापूर हे शहर ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे व्यापारी आणि लष्करी केंद्र राहिले आहे. मलकापूरचा इतिहास १३व्या आणि १४व्या शतकातील मुस्लिम राजवटींशी जोडलेला आहे. खानदेशातील फारुकी राजवंशाचा राजपुत्र मोहम्मद मलिक खान याने सुमारे १४व्या शतकात या शहराची स्थापना केली आणि त्याचे नाव आपली मुलगी राजकुमारी मल्लिका हिच्या नावावरून मलकापूर असे ठेवले. हे शहर प्राचीन काळापासून दक्खनच्या पठारावरून उत्तर भारताकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गावरील एक महत्त्वाचा थांबा होते. हजीरा-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग मलकापूरमधून जातो. या दळणवळणाच्या सोयीमुळेच नरवेलसारख्या ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्राला शतकानुशतके राजाश्रय आणि लोकाश्रय मिळत गेला.

या मंदिराची आख्यायिका अशी की त्रेतायुगात वनवासादरम्यान श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण यांनी या दंडकारण्य क्षेत्रात वास्तव्य करून चातुर्मास व्रताचे पालन केले होते. हिंदू धर्मात साधू-संतांनी पावसाळ्याच्या चार महिन्यांत एकाच ठिकाणी वास्तव्य करण्याची प्रथा आहे ज्याला ‘चातुर्मास’ असे म्हणतात. पावसाळ्यात सूक्ष्म जीवांची हिंसा होऊ नये आणि प्रवासात अडथळे येऊ नयेत म्हणून हा नियम पाळला जातो. त्यामुळेच नरवेल येथील हे स्थान श्रीरामांनी त्यांच्या चातुर्मासासाठी निवडले होते. शिवभक्त असलेल्या श्रीरामांनी आपल्या येथील वास्तव्यात दररोज पार्थिव शिवलिंगांची निर्मिती करून त्यांची मनोभावे पूजा केली. पाहता पाहता या शिवलिंगांची संख्या एक कोटींवर पोहोचली आणि त्यांतून प्रत्यक्ष शिवशंकर प्रकट झाले, ज्यामुळे या स्थळाला कोटेश्वर हे नाव प्राप्त झाले. जनकल्याणासाठी महादेवांनी येथेच लिंगस्वरूपात स्थित व्हावे, अशी विनंती श्रीरामांनी केली. कलियुगात या शिवलिंगाची स्थापना कोणी केली हे भाविकांना कळावे म्हणून श्रीरामांनी आपल्या पादुका येथे ठेवल्या. या पादुकांचे दर्शन आजही मंदिराच्या मागील बारादारीमध्ये घडते. [‘बारा’ आणि ‘दर’ (दरवाजे/कमानी) या फारसी शब्दांपासून ‘बारादरी’ हा शब्द तयार झाला आहे. ही प्रामुख्याने मुघल किंवा इस्लामिक वास्तुकलेतील एक खुली मंडप रचना असते ज्यामध्ये हवेच्या खेळत्या प्रवाहासाठी १२ कमानी असतात.]

या प्राचीन मंदिराचे महत्त्व ओळखून पुढे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी याचा जीर्णोद्धार केला. या पवित्र भूमीत जुना आखाड्याचे ब्रह्मगिरी महाराज, काशीगिरी महाराज, सेवागिरी महाराज, विष्णुभारती महाराज, रामेश्वरभारती महाराज आणि शुक्रगिरी महाराज यांसारख्या थोर संतांनी शिवशंकरांची अखंड सेवा केली आहे. भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या या स्थानाचा गौरव राज्य सरकारने ‘ब’ दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून केला आहे. पूर्वी या मंदिराबाहेर मोठी धर्मशाळा होती, जी आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे, असा उल्लेख ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स – अकोला डिस्ट्रिक्ट, व्हॉल्यूम ए’ (१९१०) मध्ये आहे. या मंदिरासमोर एक विहीरही होती. मात्र आता ती बुजवण्यात आली आहे. अलीकडेच या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार करण्यात आला.

मलकापूरच्या उत्तरेस काही अंतरावर नरवेल हे गाव आहे. या गावात ‘नळेश्वर’, ‘भूपेश्वर’, ‘माणकेश्वर’ अशी महादेवाची अन्य जुनी मंदिरेही आहेत. या गावात पूर्वी उत्तम प्रतीचा तंबाखू पिकवला जात असे. नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. वि. भि. कोलते यांचे हे जन्मगाव असल्याचा उल्लेखही सरकारी गॅझेटियरमध्ये आहे.

पयोष्णी आणि नळगंगा नद्यांच्या काठावर वसलेल्या या मंदिराच्या परिसरात अनेक वृक्ष आहेत. मंदिरासमोर मोठे प्रांगण आहे आणि परिसरात बेलाचीही झाडे आहेत. या मंदिराच्या प्रांगणात महाराष्ट्रात दुर्मिळ असणारे रुद्राक्षाचेही झाड आहे. मंदिरासमोर मोठा मंडप आहे. या मंडपात, गर्भगृहाच्या पूर्व दिशेला असलेल्या प्रवेशद्वारासमोर नंदीची दगडी मूर्ती आहे. अष्टकोनी गर्भगृहाच्या पश्चिम दिशेला असलेल्या प्रवेशद्वारासमोरही नंदीची छोटी मूर्ती आहे. पूर्व दिशेकडील मुख्य प्रवेशद्वाराच्या भिंतीच्या दोन्ही बाजूंना लहान आकाराची देवकोष्ठके आहेत. प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूंना द्वारपाल आहेत. कमानीच्या आकाराच्या या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी असलेल्या ललाटबिंबावर गणेशाचे स्थान आहे. गर्भगृहात मोठ्या शाळुंकेमध्ये कोटेश्वर महादेवाचे शिवलिंग आहे व त्यावर कोरीव काम असलेले चांदीचे आवरण आहे. गर्भगृहातील देवकोष्ठकांमध्ये गणेश तसेच दत्तात्रेयांच्या मूर्ती आहेत. छताच्या खालील भागातही काही मूर्ती कोरलेल्या आहेत. गर्भगृहावर असलेल्या शिखरांमधील देवकोष्ठकांमध्ये विविध देव-देवतांच्या मूर्ती आहेत.

गर्भगृहासमोरील मंडपात हनुमानाची मूर्ती आहे. येथे दत्तात्रेयांच्या पादुकांचेही दर्शन घडते. मंदिराच्या मागील बाजूस बारा खांबांची बारादरी आहे. अलीकडेच या बारादारीचाही जीर्णोद्धार करण्यात आला. येथे श्रीरामांच्या पादुका तसेच दत्तात्रेयांच्या मूर्तीचे दर्शन होते. मंदिर परिसरात येथे सेवा करणाऱ्या महापुरुषांच्या समाधी आहेत.

महाशिवरात्र हा येथील सर्वात मोठा उत्सव असतो. या उत्सवानिमित्त येथे भागवत सप्ताहाचेही आयोजन करण्यात येते. महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता करण्यात येते. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारीही येथे भाविकांची अलोट गर्दी असते. यावेळी अनेक शिवभक्त नळगंगा किंवा पूर्णेचे पाणी कावडीतून आणून कोटेश्वर महादेवाला अभिषेक करतात.

उपयुक्त माहिती:

  • मलकापूर येथून २१ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ६५ किमी अंतरावर
  • मलकापूर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा नाही

कोटेश्वर महादेव मंदिर

नारवेल, ताल। मलकापुर, जिला. बुलढाणा

Back To Home