रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात कोळथरे येथील श्री कोळेश्वराचे मंदिर हे जिल्ह्यातील प्राचीन शिवमंदिरांपैकी एक आहे. ‘कोळ्यांचा देव’ म्हणून या देवाला कोळेश्वर असे नाव पडल्याचे सांगितले जाते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही तिन्ही तत्त्वे असलेल्या कोळेश्वर या त्रिगुणात्मक देवाचे हे मंदिर येथील अनेक कोकणस्थ ब्राह्मणांचे कुलदैवत आहे. या मंदिरातील तीर्थ प्राशन केल्याने जुने आजार बरे होतात, अशी श्रद्धा असल्याने दररोज अनेक भाविक दर्शनासाठी येतात.
मंदिराची आख्यायिका अशी की भातासाठी शेत नांगरत असताना एका कोळ्याला शेतातून रक्त येत असल्याचे दिसले. तसेच नांगराच्या फाळालाही रक्त लागल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याच रात्री शंकराने कोळ्याला स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले की आपण येथे प्रगट झालो आहोत. त्यानुसार तो कोळी दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांना घेऊन शेतात गेला असता त्याजागी त्यांना स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन झाले. त्यानंतर ग्रामस्थांनी त्या जागी छोटे मंदिर उभारले. मंदिराच्या पुस्तिकेतील नोंदींनुसार, बुरोंडीजवळील पंचनदी गावातील जोशी आडनावाच्या कोळेश्वराच्या भक्ताने १८३७ मध्ये हे मंदिर बांधले. कालांतराने लाटे आडनावाच्या व्यक्तीने मंदिराचा पुढील भाग बांधला. फाल्गुन महिन्यात या कोळी घराण्यातील व्यक्ती बुरोंडी गावातून बळी घेऊन येतात आणि ग्रामस्थ त्या व्यक्तीचा येथे सन्मान करतात. असे सांगितले जाते की या परिसरात पांडवांचे वास्तव्य होते. येथील डोंगरावरील कातळावर उमटलेले ठसे हे पाच पांडवांच्या पावलांचे आहेत, अशी मान्यता आहे.
दापोली–दाभोळ या मुख्य रस्त्यापासून काहीसे आत कोळथरे गाव आहे. या रस्त्यावरील मंदिराच्या कमानीतून ओढ्याच्या एका बाजूने मंदिरापर्यंत जाण्यासाठी मार्ग आहे. या मार्गावर दोन्ही बाजूंना नारळी–पोफळींच्या बागा आहेत. रस्त्यालगत असलेल्या ओढ्यावरील छोट्या लोखंडी पुलावरून पलीकडे गेल्यावर पेशवेकालीन दगडी बांधकाम असलेले हे मंदिर नजरेस पडते. मंदिराची भक्कम तटबंदी ही पाच फूट जाडीची जांभ्या दगडांची आहे. तटबंदीतील छोट्या कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. संपूर्ण प्रांगण फरसबंदी केलेले आहे. प्रवेशद्वाराजवळ दीपमाळ व उजवीकडे मारुती मंदिर आहे. मंदिराच्या डाव्या हाताला तुळशी वृंदावन असून त्यासमोर लक्ष्मी–विष्णूमंदिर आहे. विष्णूच्या मूर्तीच्या हातात शंख, गदा, पद्म, चक्र आहे. या मूर्तीशेजारी लक्ष्मीची मूर्ती आहे. मुख्य मंदिराच्या समोरील बाजूस जाखाई काळेश्रीचे मंदिर आहे. येथे तांदळा स्वरूपाच्या दोन मूर्ती आहेत, या मंदिरात लाकडी मेघडंबरी आहे. याशिवाय येथे गणपतीचे मंदिर, धर्मशाळा व नगारखाना आहे.
दर्शनमंडप, सभामंडप व गर्भगृह असे कोळेश्वर मंदिराचे स्वरूप आहे. दर्शनमंडपाला तीन कमानी असून वरच्या बाजूला कौलारू छप्पर आहे. येथील गर्भगृहाचे प्रवेशद्वार उंचीने कमी असून नतमस्तक होऊन गाभाऱ्यात जावे लागते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गाभाऱ्यातील पिंडीवर लाकडी मेघडंबरी असून येथे सिंहनाद ऐकू येतो. येथील सभामंडप व गर्भगृहावर अर्धगोलाकार घुमटासारखी शिखरे आहेत. गर्भगृहाच्या मागील भिंतीवर नक्षीकाम केलेले दिसते. येथील सर्व मंदिराच्या घुमटांची शैली इस्लामी वास्तुरचनेकडे झुकलेली दिसते. दरवर्षी कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक वद्य प्रतिपदा असा सात दिवस येथे उत्सव असतो. शेवटच्या दिवशी आलेल्या भाविकांना महाप्रसाद दिला जातो. याशिवाय मंदिरात महाशिवरात्र, वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपुरी पौर्णिमेलाही उत्सव होतात.
पाणी कळशांनी आणुनि दोन्ही करी। नेऊनी घालती मस्तकी सांबावरी।।
सिंहनाद ऐकती मधुर। ओवाळिती दीप आणि कर्पूर।।
धूपदीप, घंटांचे गजर। त्यासी प्रसन्न होतसे कोळेश्वर।।
स्थानिक अनामिक कवीने अशा चरणांमध्ये या मंदिराची नोंद घेतलेली आढळते.
कोळेश्वर महादेव हा येथील बर्वे, माईल, छत्रे, भावे, कोल्हटकर, बापये, बोरकर, पिंपळखरे, महाजन, लोणकर, वर्तक, लाटे, शेठे, शेंड्ये, जोशी, लागू, दातार आदी कोकणस्थ ब्राह्मणांचा कुलदैवत आहे. या मंदिराबरोबरच कोळथरे गावात श्रीराम, श्रीदत्त, वारेबुवा, खेम, ब्राह्मण आळीतील दत्त मंदिर, बापेश्वर, दुर्गादेवी, सोनार आळीतील गणपती अशी अनेक मंदिरे असल्याने या गावाला मंदिरांचे गाव असे म्हटले जाते. कोळेश्वर देवस्थानतर्फे भाविकांसाठी भक्त निवासाची सुविधा आहे. (संपर्क : मधुकर आनंद परांजपे, ट्रस्टी, दू. ०२३५८ २८५२१८) सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना कोळेश्वराचे दर्शन घेता येते.
मंदिरांशिवाय कोळथरे गाव प्रसिद्ध आहे ते येथील कासव संवर्धन प्रकल्पासाठी. वन विभाग, निसर्गप्रेमी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने २००५ पासून येथे हा प्रकल्प राबविण्यात येतो. ‘ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या कासवांची घरटी येथील समुद्रकिनारी संरक्षित करण्यात येतात. ‘आगोम’ ही प्रसिद्ध सूक्ष्म औषध कंपनी या गावात आहे. भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू अजित आगरकर हेही याच गावचे.