खोलेश्वर मंदिर

गवळीपुरा, अंबाजोगाई, ता. अंबाजोगाई, जि. बीड

मृत व्यक्तींच्या स्मृती जपणे हे माणसाच्या रक्तात आहे. अगदी आदिम जमातीत देखील मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ पाषाण स्तंभ उभे करण्याच्या प्रथा दिसून येतात. त्यामुळेच जगभरातील जवळपास सर्वच संस्कृतीमध्ये मृतांची स्मृतिस्थळे पहावयास मिळतात. भारतात ऐतिहासिक व पौराणिक काळापासून राजा, राणी, प्रधान सेनापती यांच्या स्मृतीत बांधलेली मंदिरे, बारव, उद्याने, समाध्या व वीरगळ पहावयास मिळतात. अंबाजोगाई येथील बाराव्या शतकात बांधलेले खोलेश्वर मंदिर हे खोलेश्वर आणि त्याचा मुलगा राम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधले गेले असल्याचे येथील शिलालेखात नमूद आहे.

हे मंदिर सुमारे आठशे वर्षे प्राचीन आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारात असलेल्या शिलालेखात नमूद केल्यानुसार, खोलेश्वराची मुलगी लक्ष्मी हिने आपले वडील व भाऊ राम यांच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले. खोलेश्वर हा यादव राजा सिंघण याचा सेनापती होता. तो व त्याचा मुलगा युद्धात मारले गेले होते. आपल्या वडिलांच्या व भावाच्या पराक्रमाची व कर्तृत्वाची स्मृती कायम राहावी, तसेच त्यांना मरणोत्तर गती मिळावी म्हणून लक्ष्मीने हे मंदिर बांधले आहे. यामुळेच या मंदिरास खोलेश्वर नावाने ओळखले जाते.

अंबाजोगाई शहरातील गवळीपुरा परिसरात मुख्य रस्त्यालगत हे मंदिर आहे. मंदिरासमोर वाहनतळ व त्यापुढे प्रांगण आहे. मंदिर उंच अधिष्ठानावर उभे आहे. या अधिष्ठानात पुष्पथर, स्तंभनक्षी व गजमुख शिल्पे आहेत. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. मंदिराच्या पूर्व, उत्तर व दक्षिण दिशेस मुखमंडप आहेत. त्यांच्या पुढे सभामंडपाची प्रवेशद्वारे आहेत. तिन्ही मुखमंडप प्रांगणापेक्षा उंचावर असल्यामुळे तेथे जाण्यासाठी प्रत्येकी आठ पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला लोखंडी सुरक्षा कठडे आहेत.

पूर्व दिशेच्या मुखमंडपात बाह्य बाजूस कठडा आहे. या कठड्यात भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. मुखमंडपात प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन व सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन असे एकूण आठ स्तंभ आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. स्तंभदंडात चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी कणी व त्यावर हस्त आहेत. हस्तांवर तुळई आणि तुळईवर छत आहे. वितानावर चक्राकार नक्षी आहे. मुखमंडपात डाव्या कठड्यावर संस्कृत भाषेतील शिलालेख आहे. त्यात स्थळकाळ, मंदिर बांधणाऱ्याचे नाव व हेतू स्पष्ट केला आहे. त्यापुढे सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे.

गोलाकार असलेल्या सभामंडपात सोळा नक्षीदार स्तंभ आहेत. हे सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. स्तंभदंडात चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी कणी व कणीवर हस्त आहेत. हस्तांवर तुळई व त्यावर गोल घुमटाकार छत आहे. एकावर एक रचलेल्या वर्तुळाकार पाषाणाने ही घुमटाकार रचना साकारली आहे. वितानावर मध्यभागी चक्र कोरलेले आहे. सभामंडपात वर्तुळाकार रंगशिळा आहे. प्राचीन काळी या रंगशिळेवर नृत्य, गायन आदी रंगभोगाचे कार्यक्रम सादर केले जात असत.. सभामंडपात डाव्या भिंतीजवळ चतुर्भुज विष्णूची मूर्ती आहे. अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दर्शनी भिंतीत दोन देवकोष्ठके आहेत. डाव्या देवकोष्ठकात गणपती, तर उजव्या बाजूच्या देवकोष्ठकात एक अस्पष्ट शिल्प आहे.

अंतराळात जमिनीवर मध्यभागी काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. अंतराळात दोन्ही बाजूला दोन रिकामी देवकोष्ठके आहेत. पुढे अंतराळापेक्षा उंचावर गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारासमोर पायरी आहे. प्रवेशद्वारास पुष्पशाखा, पर्णशाखा, नरशाखा, स्तंभशाखा, व्यालशाखा आहेत. तसेच द्वारशाखांवर खालील बाजूस द्वारपाल, द्वारपालिका, गंगा, यमुना आदी शिल्पे आहेत. ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे. तोरणात शिखरशिल्पे आहेत, तर मंडारकास चंद्रशिला आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग आहे. जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. शिवपिंडीच्या बाजूला त्रिशूल आहे. गर्भगृहात मागील भिंतीलगत वज्रपीठावर गौरीहर मूर्ती आहे. ती नंतरच्या काळात बसवली गेली असल्याचे सांगितले जाते. गर्भगृहात चारही कोनांवर असलेले चार नक्षीदार स्तंभ भिंतीत आहेत. मंदिराच्या बाह्य बाजूला मंडोवरावर स्तंभशिल्पे व देवकोष्ठक आहेत. देवकोष्ठकात देवमूर्ती आहे. मंदिराच्या छतावर चहुबाजूने सुरक्षा कठडा आहे. तो अलीकडील काळात बांधला असल्याचे सांगितले जाते. छतावर मध्यभागी घुमटाकार शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी स्तूपिका व त्यावर कळस आहे. मंदिराच्या मागील बाजूला प्रांगणात कोरीव पाषाणात बांधलेले कुंड आहे. कुंडात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. देवाच्या अभिषेकासाठी या कुंडातून पाणी घेतले जाते.

महाशिवरात्री हा येथील मुख्य वार्षिक उत्सव आहे. यावेळी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. उत्सवकाळात मंदिरात लघुरुद्र, अभिषेक, भजन, संगीत, कीर्तन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. श्रावण मास, अधिकमास, दसरा, दिवाळी, पौर्णिमा, अमावस्या, प्रदोष, सोमवार आदी दिवशी मंदिरात भाविकांची गर्दी असते. दर सोमवारी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

उपयुक्त माहिती:

  • अंबाजोगाई बस स्थानकापासून १ किमी अंतरावर
  • बीड येथून ९६ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून अंबाजोगाईसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : शरद लोमटे, अध्यक्ष, मो. ९४२२२४२४७८,
  • कल्याण लोमटे, उपाध्यक्ष, मो. ९४२२२४२०३१

खोलेश्वर मंदिर

गवलीपुरा, अंबाजोगाई, ताल. अम्बाजोगाई, जिला. बीड

Back To Home