खोलेश्वर मंदिर

करमाळा, ता. करमाळा, जि. सोलापूर

अठराव्या शतकात रंभाजीराव निंबाळकर यांचे घराणे पराक्रमी घराणे म्हणून नावाजलेले होते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर १७२४ मध्ये हैदराबादमधील निजामशाही स्थापन करण्यात रंभाजीराव यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे निजामाने त्यांना ‘रावरंभा’ ही पदवी दिली. तेव्हापासून रंभाजी हे रावरंभा या नावाने ओळखले जावू लागले. करमाळा हे त्यांच्या जहागिरीमधील मुख्य गाव होते. येथील खोलेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर रावरंभा निंबाळकर यांच्याच कारकिर्दीत उभारण्यात आले होते. अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असणारे हे मंदिर तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी रमाबाई यांच्या ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ या आत्मकथनात खोलेश्वर मंदिराचा उल्लेख आहे. रमाबाईंची ही आठवण १८९१ मधील आहे. त्या वेळी न्या. रानडे यांची नेमणूक शेतकी खात्याचे विशेष न्यायाधीश म्हणून झाली होती. पुणे, सातारा, नगर व सोलापूर या चार जिल्ह्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. न्या. रानडे रमाबाईंसह आठ महिने फिरतीवर होते. १८९१च्या फेब्रुवारी महिन्यात ते करमाळ्याला येऊन पोचले. त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था येथील खोलेश्वर मंदिरात केली होती.
येथे आल्यावर न्या. रानडे यांची प्रकृती बिघडली. प्रकृती इतकी खालावली की त्यांचे बोलणेही बंद झाले. करमाळ्यातील सरकारी डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. पण प्रकृतीत फरक पडत नव्हता. तेव्हा पुण्याहून डॉ. विश्राम घोले यांना तारेने बोलावण्यात आले. डॉ. घोले येईपर्यंत स्थानिक डॉक्टर खोलेश्वर मंदिरात न्या. रानडे यांच्यासोबत थांबले होते. न्या. रानडे यांची शुद्ध हरपत चालली होती. त्यामुळे रमाबाईंचा धीर सुटत होता. त्या खोलेश्वराच्या गर्भगृहात देवासमोर जाऊन बसल्या व त्यांनी खोलेश्वराकडे साकडे घातले. खोलेश्वराशी केलेल्या संवादाने त्यांचे मन हलके झाले आणि त्या अवस्थेत त्यांचा डोळा लागला. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास न्या. रानडे यांना शुद्ध आली होती व त्यांचे बोलणेही पूर्वीसारखे झाले होते.
करमाळा शहराच्या मध्यवर्ती भागात खोलेश्वर महादेवाचे मंदिर आहे. मंदिराभोवती उंच तटबंदी आहे. या किल्लेवजा तटबंदीत मंदिराचे दुमजली प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती व वरील मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वारातून आत मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात मंदिराच्या समोरील बाजूस अखंड पाषाणातील मोठी नंदीची मूर्ती आहे. त्यापुढे प्राचीन हेमाडपंती रचनेचे खोलेश्वर मंदिर आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. उंच अधिष्ठानावर असलेल्या या मंदिराच्या दर्शनी बाजूस चार दगडी स्तंभ व त्यातील मधील दोन स्तंभांमधून सभामंडपात जाण्यासाठीचा मार्ग आहे. या स्तंभांच्या वरील बाजूला सभामंडपाच्या छतावर बाशिंगी कठडा व मध्यभागी किर्तीमुख आहे. सभामंडपातील प्राचीन दगडी स्तंभांवर रंगकाम केलेले आहे. सभामंडपात अंतराळाच्या दर्शनी भिंतीजवळ विठ्ठल, गणपती व काही प्राचीन मूर्ती आहेत. या मूर्तींच्या समोर काळ्या पाषाणातील शिवपिंडी आहे. गर्भगृहात मध्यभागी काळ्या पाषाणातील शाळुंकेवर शुभ्र संगमरवरी चारमुखी शिवपिंडी आहे. गर्भगृहावरील कळसावर अनेक देवकोष्टके, शिर्षभागी आमलक व कळस आहे. या मंदिर परिसरात अनेक प्राचीन वीरगळ शिल्पे आहेत.
श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी दुपारी १२.३० वाजता खोलेश्वर महादेवाची भव्य मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी होतात. ज्या रथातून मिरवणूक निघते तो रथ पूर्णपणे सागवानी असला तरी त्याची रचना व त्यावरील नक्षीकाम या मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या कमला भवानी मंदिरामधील दगडी रथाप्रमाणे आहे. या रथाला २०२१ मध्ये चांदीचा कळस बसविण्यात आला होता. या मिरवणुकीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. माघ महिन्यातील महाशिवरात्रीनंतर येणाऱ्या पहिल्या गुरूवारी येथील मंदिरातील नंदीची मिरवणूक काढली जाते. याशिवाय कोष्टी समाजाच्या वतीने श्रावण महिन्यात येथे शिवनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.

उपयुक्त माहिती

  • करमाळा बस स्थानकापासून १ किमी अंतरावर
  • सोलापूर जिल्ह्यातील अनेक शहरांतून करमाळ्यासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ८४१२८१३०२९
Back To Home