खंडोबा, खंडेश्वर, मार्तंड, मल्हारी आणि मल्लाना अशा विविध नावांनी ओळखला जाणारा हा देव महाराष्ट्र, कर्नाटक तसेच आंध्र प्रदेशातील अठरा पगड जातींचा कुलदेव आहे. ‘मल्हारी माहात्म्य’ हा खंडोबाचा आद्य ग्रंथ समजला जातो. जेजुरी येथील खंडोबाचे मुख्य मंदिर वीरपाळ यांनी १३८१ साली बांधले. त्यानंतर सन १६३५ मध्ये खटावच्या राघो मंबाजी यांनी या मंदिराचा विस्तार केला. चैतन्य महाप्रभू यांनी जेजुरीच्या खंडोबाला भेट दिली होती, तर नाना फडणवीस यांनी एक लाखाचा नवस केला होता, असे उल्लेख सापडतात. महाराष्ट्रात गावोगावी खंडोबाची अनेक लहान-मोठी मंदिरे आहेत. बीड जिल्ह्यातील कुसळंब गावातील खंडेश्वर मंदिर ‘प्रति जेजुरी’ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील जागृत देव नवसाला पावतो, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे.
हेमाडपंती स्थापत्यशैलीतील हे मंदिर सुमारे तीनशे ते चारशे वर्षांपूर्वीचे असल्याचे येथील पुजारी सांगतात. या मंदिराबाबत आख्यायिका अशी की या गावात मुंबऱ्या नावाचे खंडोबाचे नि:सीम भक्त होते. ते दर पौर्णिमेला सातारा जिल्ह्यातील पाली येथील खंडोबाच्या दर्शनाला पायी जात असत.
पुढे वृद्धापकाळामुळे त्यांना ही यात्रा करणे अशक्य होऊ लागल्याने त्यांनी देवाला आपल्या गावी येण्याचे साकडे घातले. ‘तुमच्या मागोमाग तुमच्या गावी येईन, परंतु चालत असताना तुम्ही ज्या ठिकाणी मागे वळून पाहाल, त्याच ठिकाणी मी स्थापित होईन,’ असे म्हणत देव मुंबऱ्या भक्ताच्या मागोमाग चालू लागले. गावाजवळ पोहोचताच मुंबऱ्या भक्ताने मागे वळून पाहिले आणि त्याच क्षणी देव येथे मूर्तिरूपात स्थापित झाले. त्यानंतर गावकऱ्यांनी लाकडी मंदिर बांधले. पुढे गेणुबा पवार या पाटलांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि हे हेमाडपंती स्थापत्यशैलीतील मंदिर बांधले. अलीकडील काळात या मंदिराचा दुसऱ्यांदा जीर्णोद्धार करण्यात आला आहे, अशी माहिती पुजारी सांगतात.
गावापासून जवळच व मुख्य रस्त्यालगत वसलेले हे मंदिर एका लहानशा टेकडीवर आहे. टेकडीच्या खाली रस्त्यालगत प्रशस्त वाहनतळ आहे. त्याच्या पुढे स्वागत कमान आहे. या स्वागत कमानीच्या सज्जावर असलेल्या आडव्या रचनेच्या शिखरावर पाच कळस आहेत. शिखराच्या दोन्ही बाजूंना संतशिल्पे आहेत. कमानीच्या पुढे दोन्ही बाजूंना गजराज शिल्पे आहेत. कमानीपासून सुमारे वीस पायऱ्या चढून मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरील प्रवेशद्वारापर्यंत जाता येते.
पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना सुरक्षा कठडे आहेत, त्यावर सिंहशिल्पे आहेत. दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपाल चित्रे रंगवलेली आहेत व दीपकोष्ठके आहेत. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर अश्वारूढ म्हाळसा-खंडोबाची मणी-मल्ल राक्षसांशी युद्धरत असलेली मूर्ती आहे. वरच्या मजल्यावर आठ नक्षीदार स्तंभ आहेत. सर्व स्तंभदंडांत चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. स्तंभांवर तुळई व तुळईवर छत आहे. छतावर आडव्या रचनेचे शिखर व त्यावर कळस आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंनी सुमारे वीस फूट उंच भक्कम तटबंदी आहे. तटबंदीत उजव्या बाह्य बाजूला देवकोष्ठके आहेत आणि त्यात देवमूर्ती आहेत. तटबंदीवर ठराविक अंतरावर नक्षीदार स्तंभ व त्यावर आमलक आहेत. प्रवेशद्वारातून मंदिराच्या फरशीबद्ध प्रांगणात जाण्यासाठी सुमारे दहा पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना स्टेनलेस स्टीलचे सुरक्षा कठडे आहेत. विविध वनस्पतींनी प्रांगण सुशोभित केले आहे. प्रांगणात डाव्या बाजूला गोलाकार दीपमाळ आहे. मंदिरासमोर वज्रपीठावर नंदीची काळ्या पाषाणातील मोठी मूर्ती आहे. नंदीच्या पाठीवर झूल व गळ्यात घुंगरमाळा कोरलेल्या आहेत.
प्रांगणापेक्षा मंदिर सुमारे पाच फूट उंचावर आहे. सभामंडप व गर्भगृह अशी रचना असलेल्या मंदिराच्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर पाच पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या डाव्या बाजूला चौथरा आहे. उत्सवकाळात या चौथऱ्यावर देवाची पालखी ठेवली जाते. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना भिंतीवर पहारेकरी चित्रे रंगवलेली आहेत व द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी आहे. सभामंडपात प्रवेशद्वार सोडून चारही बाजूंनी उंच चौथरे असल्यामुळे त्यावर ओवऱ्या बांधण्यात आल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला ओवरीत देवाची उत्सव काळात वापरली जाणारी पालखी ठेवली आहे. ओवऱ्यांमध्ये समोरील बाजूला व मागील भिंतीत प्रत्येकी वीस चौकोनी स्तंभ आहेत. सभामंडपाचे छत घुमटाकार आहे आणि त्यावर सुंदर नक्षीकाम आहे. सभामंडपात मध्यभागी जमिनीवर कासवशिल्प आहे.
पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. सभामंडपात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना चित्रे रंगवलेली आहेत. गर्भगृहाच्या बाहेरून डाव्या व उजव्या बाजूने प्रदक्षिणा मार्गावर दोन दरवाजे आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी आहे आणि ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे.
प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. गर्भगृहात मागील भिंतीगत वज्रपीठावर पाषाणी नक्षीदार मखर आहे. त्यामध्ये खंडोबाची अश्वारूढ मूर्ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण दिसते.
मंदिराच्या छतावर चारही बाजूंनी कठडा आहे. तेथील देवकोष्ठकांमध्ये विविध देवतांच्या मूर्ती आहेत. सभामंडपाच्या छतावर प्रवेशद्वाराकडे द्रविडी शैलीतील आडव्या रचनेचे शिखर व त्यावर पाच कळस आहेत. गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे षटकोनी शिखर आहे. त्यातील प्रत्येक थरात सहा देवकोष्ठके व विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या शीर्षभागी आमलक व त्यावर कळस आहे. मंदिराच्या बाजूला प्रांगणात गणपती व तुळजा भवानी यांची लहान मंदिरे आहेत.
चैत्र पौर्णिमा हा येथील तीन दिवसांचा मुख्य वार्षिक जत्रोत्सव उत्साहाने साजरा केला जातो. यात्रेच्या पहिल्या दिवशी भक्तांनी कावडीतून आणलेल्या पवित्र नद्यांच्या पाण्याने देवाला अभिषेक केला जातो. त्यानंतर देवाची तळी उचलून बेल-भंडारा उधळला जातो. दुपारी देवाची पालखी मिरवणूक पायथ्याशी असलेल्या मुंबऱ्या भक्ताच्या समाधीला प्रदक्षिणा घालून परत मंदिराकडे येते. यात्रोत्सव काळात मंदिरात भजन, कीर्तन, संगीत, महाप्रसाद यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी येतात. यात्रेनिमित्त विविध वस्तूंची दुकाने सजल्यामुळे परिसरास तात्पुरत्या बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त होते. यात्रेतील बाजारपेठेत विविध वस्तूंच्या खरेदी-विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होते. चंपाषष्ठी व दसरा या वेळीही देवाची पालखी मिरवणूक निघते. मंदिरात चैत्र पाडवा, शारदीय नवरात्र, दिवाळी, कोजागिरी पौर्णिमा इत्यादी सण व उत्सव साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. पौर्णिमा, अमावस्या, रविवार, प्रदोष अशा दिवशी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते.