खांदेश्वर महादेव मंदिर

खांदा वसाहत, ता. पनवेल, जि. रायगड

पनवेल हे आज आधुनिक शहर म्हणून नावारूपास आले असले तरी येथील प्राचीन मंदिरे शहराच्या जुन्या खुणांचे अस्तित्व सांभाळून आहेत. पनवेल शहरातील मोठा खांदा गावातील खांदेश्वर शिवमंदिर प्रसिद्ध आहे. येथील जागृत व स्वयंभू महादेव नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या देवस्थानावरून येथील रेल्वेस्थानकाचेही नामकरण खांदेश्वर असे करण्यात आलेले आहे. महाशिवरात्रीला होणाऱ्या येथील यात्रेत सुमारे दोन लाख भाविक हजेरी लावतात.

प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘माझी जीवनगाथा’ या आत्मचरित्रामध्ये या मंदिराच्या निर्मितीची माहिती दिलेली आहे. त्यातील उल्लेखानुसार, त्याकाळी खांदा गाव म्हणजे २०-२५ झोपड्यांचे एक खेडे होते. मुंबई-पनवेल रस्त्यावर पनवेलपासून दोन मैलावर असलेल्या या गावात हमरस्त्यावरच एक तलाव आहे. अनेकदा सायंकाळच्या वेळी शहरातील प्रसिद्ध वकील बाबा पतकी आणि त्यांचे समवयस्क व व्यावसायिक मित्र या तलावाच्या परिसरात फिरण्यासाठी येत असत. एखाद्या निवांत जागी गप्पा मारत त्यांनी छंद म्हणून टोकदार दगडाने बसल्या जागी जमीन उकरण्याचे ठरविले. काही दिवसांनी या जागेवर एक खड्डा तयार झाला.

हा खड्डा खणत असताना एका दिवशी एक गोलाकार पाषाण दिसू लागला. शंकरभक्त असलेल्या बाबा पतकींना ती शिवपिंड असावी, असे वाटले आणि ते ‘हरहर महादेव’ अशा गर्जना करू लागले. नजीकच्या खांदे गावात या गर्जनांचा घोष ऐकू जाताच ग्रामस्थ येथे आले. त्यासरशी बाबांच्या सूचनेनुसार ग्रामस्थांनी कुदळी व फावडे आणले. हे सर्व होताना काळोख पडू लागला होता, मात्र ग्रामस्थांनी पाचोळ्याचे चुडे पेटवले आणि त्याच्या उजेडात या पाषाणाच्या बाजूने कंबरभर खणले. बाबांचा अंदाज खरा ठरला होता. या जमिनीत शाळुंकेसह शिवपिंड होती. सोमवारच्या दिवशीच या शिवपिंडीचे दर्शन झाल्याने सर्वांना अत्यंत आनंद झाला. हरहर महादेवच्या गर्जना करीत ते नाचू लागले.

बाबा पतकींना खांदे गावात स्वयंभू शिवपिंडी सापडली, ही खबर पंचक्रोशीत पोहोचताच हजारो भाविकांची येथे गर्दी झाली. शिवपिंडीच्या आसपासची जागा साफ करून बाबांनी येथे झावळ्यांचा एक मंडप उभारला. एक-दोन दिवसांतच तेथे बांबूच्या तट्ट्यांचे आणि पत्र्याच्या छपराचे लहानसे मंदिर तयार झाले. महादेवाच्या पूजाअर्चेसाठी बाबांनी आपल्या खर्चाने एका गोसाव्याची नेमणूक केली. मित्रगणांसह दररोज आरतीसाठी ते येथे येऊ लागले. याचदरम्यान मुंबईचा एक व्यापारी दिवाणी दाव्याबाबत बाबांचा सल्ला घेण्यासाठी पनवेलला आला होता. बिकट दिवाणी खटल्यात बाबांचा सल्ला घेण्यासाठी मुंबईचे अनेक वकील आपल्या अशिलांना त्यांच्याकडे पाठवीत असत. या व्यापाऱ्याच्या खटल्यात लाखो रुपयांच्या वारसाहक्काचा मुद्दा होता.

बाबा पत्कींनी त्या व्यापाऱ्याचा हात धरून त्याला या महादेवाच्या पिंडीसमोर उभे केले व सांगितले की तुमचे कार्य हा श्री खांदेश्वर यशवंत करणार आहे. खटला जिंकलात तर खांदेश्वराला चिरेबंदी मंदिर बांधून देईन, अशी देवापुढे प्रतिज्ञा करीत असाल, तरच मी तुमचे काम हातात घेतो. त्या व्यापाऱ्याने बाबांचे म्हणणे मान्य केले व देवासमोर मंदिर बांधण्याची प्रतिज्ञा केली. एका वर्षाच्या आतच बाबांनी दिलेल्या कायदेशीर मुद्यावर त्या व्यापाऱ्याने खटला जिंकला आणि शिवपिंड सापडल्यापासून तिसऱ्या महाशिवरात्रीच्या यात्रेच्या सुमाराला येथे खांदेश्वराचे मंदिर उभे राहिले. याच दरम्यान इतर दात्यांकरवी त्यांनी येथे विहीर व धर्मशाळाही बांधून घेतली.

खांदेश्वर तलाव व मंदिराचा परिसर सिडकोने आता सुशोभित केलेला आहे. मंदिराभोवती सुंदर उद्याने विकसित करून त्यात जागोजागी आसनांची रचना केलेली आहे. मंदिरासमोर एक वैशिष्ट्यपूर्ण दीपस्तंभ आहे. हा दीपस्तंभ कासवाच्या पाठीवर आहे. दीपस्तंभाच्या शेजारी तुलसी वृंदावन व आणखी एक नव्याने बांधलेला दीपस्तंभ आहे. उंच जगतीवर असलेल्या या मंदिराच्या सभामंडपात सहा पायऱ्या चढून यावे लागते. पायऱ्यांच्या उजव्या बाजूला एक प्राचीन महावृक्ष आहे व त्याभोवती मोठा पार बांधलेला आहे. पारावर महादेव व इतर देवतांच्या मूर्ती आहेत. पायऱ्यांच्या डाव्या बाजूला मंदिराच्या बाह्य भिंतीस लागून एक मंडप आहे. त्यावर पत्र्याचे छत आहे. उत्सवप्रसंगी या ठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. येथील सभामंडप बंदिस्त स्वरुपाचा आहे. सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी गवाक्ष आहेत आणि छताला नवसपूर्तीच्या अनेक पितळी घंटा टांगलेल्या आहेत. सभामंडपात मध्यभागी असलेल्या चौथऱ्यावर नंदीची मूर्ती व त्यापुढे पितळी कासव आहे. पुढे अरुंद अंतराळ आहे. अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस देवकोष्टके आहेत. उजव्या बाजूच्या देवकोष्टकात चतुर्भुज गणपती व डाव्या बाजूला मारुतीची शेंदूरचर्चित मूर्ती आहे.

गर्भगृहाच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. ललाटपट्टीवर वेलबुट्टी नक्षी व मंदारकाजवळ चंद्रशिला आहे. अंतराळापेक्षा काहीशा खोलवर असलेल्या गर्भगृहात मध्यभागी शिवपिंड आहे. या शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग आहे. शिवपिंडीच्या पुढे भिंतीतील देवकोष्टकात पार्वतीची चतुर्भुज मूर्ती आहे. गर्भगृहाच्या बाह्यबाजूने सभोवतीने चौथरा व त्यावर सुरक्षा कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावर पिरॅमिडसारखे चौकोनी शिखर आहे.

या मंदिराचा परिसर विस्तीर्ण असल्यामुळे धार्मिक विधींसाठी येथे मुबलक जागा उपलब्ध आहे. येथे शिवपूजन विधीसोबतच कालसर्प योग, नारायण नागबळी, श्राद्ध, जनन शांती, लग्न विधी, सामूहिक दुग्धाभिषेक, अभिषेक, रुद्राभिषेक, प्रदोष पूजन, सामूहिक प्रदोष पूजन, दीप अर्चना असे अनेक विधी पार पडतात. महाशिवरात्री हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी येथे मोठी यात्रा असते. महाशिवरात्री आधी सात दिवस येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. हरिनाम सप्ताहात मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. आलेल्या भाविकांसाठी यावेळी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांना या मंदिरात दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • पनवेलपासून ३ किमी अंतरावर
  • खांदेश्वर रेल्वेस्थानकापासून २ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून पनवेलसाठी एसटी व रेल्वेची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय

खंडेश्वर महादेव मंदिर

खंडा कॉलोनी, ताल. पनवेल, जिला. रायगढ़

Back To Home