खंडेराव महाराज मंदिर

जव्हार, ता. जव्हार, जि. पालघर

खंडोबा वा खंडेराय हे शिव आणि शक्तीचे प्रतीक समजले जाते. या खंडोबाचे महाराष्ट्रातील मूळ स्थान जेजुरी येथे आहे. जव्हार संस्थानातील राजघराण्याची या खंडोबावर अपार श्रद्धा होती. जव्हार संस्थानच्या राजचिन्हातही ‘जय मल्हार’ ही अक्षरे अग्रभागी होती. खंडोबावरील असलेल्या श्रद्धेतून आणि जेजुरीच्या खंडेरायाने दिलेल्या दृष्टांतामुळे या राजघराण्याकडून जव्हार येथे खंडेराव महाराज मंदिर उभे राहिले. जव्हार राजघराण्याचे कुलदैवत असलेले हे स्थान आज ‘धाकटी जेजुरी’ म्हणून पालघर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. येथे तीन दिवस भरणारी चंपाषष्टीची यात्रा ही जव्हार तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा असते.

जव्हारचे प्राचीन नाव ‘जवार’ असे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपूर्वीपासून हे आदिवासी वारली जमातीचे राज्य अस्तित्वात होते. इगतपुरी भागातील मुकणे या गावातील महादेव कोळी समाजाचे राजे जयदेव (जयबा) मुकणे यांनी वारल्यांकडून ते मिळवून येथे कोळी राज्याची स्थापना केली. अल्लाउद्दीन खिलजी, मुहंमद तुघलक यांनी जेव्हा देवगिरीच्या साम्राज्याची वाताहत केली. त्याच काळात म्हणजे इ.स. १३१६ मध्ये जव्हार साम्राज्याची उभारणी झाली. जयबा मुकणे यांचा थोरला मुलगा धुळबाराजे ऊर्फ निमशाह हा महापराक्रमी होता. त्याने नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातील मिळून सुमारे २२ किल्ले जिंकले. ५ जून १३४३ रोजी दिल्लीचा सुलतान मुहंमद बिन

तुघलक याने निमशाह यांना राजा ही पदवी दिली. जव्हार येथील भोपटगड (भूपतगड) या कोळी राज्याची राजधानी होती. त्या काळात राज्याचा वार्षिक महसूल सुमारे ९ लाख रुपये (९० हजार पौंड) एवढा असल्याची नोंद आहे. १० जून १९४८ पर्यंत म्हणजे तब्बल ६३२ वर्षे जव्हार संस्थान अस्तित्वात होते. ठाणे व परिसरातील हे एकमेव संस्थान होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे संस्थान भारतात विलीन झाले.

जव्हारचे राजे मल्हारराव ऊर्फ पतंगशाह मुकणे चौथे (१८६५-१९०५) यांच्या आई राणी लक्ष्मीबाई या जेजुरी येथील रामजी चव्हाण या मराठा सरदाराच्या कन्या होत्या. त्यांचे माहेरचे नाव मुक्ताबाई असे होते. खंडोबा हे त्यांचे उपास्य दैवत असल्याने त्या नियमित खंडोबाची उपासना करीत. अशी आख्यायिका सांगण्यात येते की एके दिवशी त्यांना खंडोबारायाने दृष्टांत देऊन सांगितले की ‘मी अमुक ठिकाणी आहे, तेथे शोध घेऊन त्यावर माझे मंदिर बांध.’ त्याप्रमाणे सध्या जेथे मंदिर आहे तेथे खणले असता एक पिंडी आढळली. या जागेवर मंदिर बांधण्यास त्यांनी पतंगशाह यांना सांगितले. त्यानुसार जेजुरीसारखे कडेपठार असलेल्या स्थानावर, जव्हार गावच्या एका बाजूच्या पठारावर, सूर्य तलावाशेजारी पतंगशाह चौथे यांनी हे खंडेराय मंदिर बांधले. यावरून हे मंदिर १८६७ नंतर वा त्या सुमारास बांधण्यात आल्याचे स्पष्ट होते. याचे कारण पतंगशाह चौथे यांच्याकडे १८ मार्च १८६७ नंतर संस्थानचा कारभार आला. संस्थानच्या आमदानीत येथे चंपाषष्टीची फार मोठी यात्रा भरत असे. या यात्रेस नाशिक, इगतपुरी, घोटी, देवळाली आदी भागांतून अनेक भाविक येत असत.

आदिवासी, दुर्गम, डोंगरदऱ्यांचा भाग असणाऱ्या पालघर जिल्ह्यातील जव्हार गावाची ओळख पर्यटन स्थळ म्हणून आहे. जव्हारला पालघर जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हटले जाते. जव्हार बस स्थानकापासून जवळच एका मोठ्या प्रांगणात खंडेराव महाराज मंदिर स्थित आहे. मंदिरासमोर होमकुंड व तुळशी वृंदावन आहे. चारपाखी कौलारू रचनेच्या या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यास एक ओसरीसारखी जागा आहे. तेथून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपाच्या द्वारपट्ट्यांवर नक्षीदार कोरीवकाम आहे व ललाटबिंबस्थानी गणेशमू्र्ती आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात मध्यभागी एका चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या जागेत असलेल्या देवकोष्टकांत पितळी गणेशमूर्ती व घोड्यावर स्वार खंडोबाची मूर्ती आहे. गर्भगृहात एका उंच वज्रपीठावर शुभ्र घोड्यावर स्वार असलेले खंडोबा व म्हाळसाई यांच्या मूर्ती आहेत. घोड्याच्या पायाजवळ एक लहानसा कुत्राही आहे. याशिवाय या वज्रपीठाजवळ खंडोबाचे मूळ स्थान असलेले स्वयंभू लिंग आहेत. त्यात दोन पाषाण आहेत.

मल्हारी माहात्म्य या ग्रंथातील कथेनुसार, खंडोबाने मणी व मल्ल या दैत्यांशी मार्गशीर्ष शुक्ल १ ते ६ अशी सहा दिवस लढाई केली. सहाव्या चंपाषष्ठीच्या दिवशी दोघांचा वध केला. या सहा दिवसांत सर्वत्र खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला ‘खंडोबाचे नवरात्र’ असे म्हणतात. याच काळात या खंडेराव महाराज मंदिरात तीन दिवस मोठी यात्रा असते. चंपाषष्ठीच्या दिवशी दुपारी ३ वाजता खंडेरायाची घोड्यावरून पालखी निघते व संपूर्ण गावात ती फिरवली जाते. रात्री गोंधळाचे कार्यक्रम असतात. यावेळी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. ज्या भाविकांना जेजुरी येथे जाणे शक्य होत नाही असे उत्तर महाराष्ट्रातील अनेक भाविक या यात्रेसाठी येथे उपस्थित असतात.

खंडेराव महाराज मंदिरापासून एक किमी अंतरावर जव्हार संस्थानाचा राजवाडा जय विलास पॅलेस आहे. हा राजवाडा ५०० एकर जागेवर आहे. राजघराण्यातील मुकणे कुटुंबीयांची ही खासगी मालमत्ता आहे. त्यामुळे या राजवाड्यात आत जाण्यास मनाई आहे; परंतु बाहेरून याची भव्यता व सुंदरता अनुभवता येते.

उपयुक्त माहिती

  • जव्हार बस स्थानकापासून पायी १० मिनिटांवर
  • जव्हार येथे येण्यासाठी पालघर व ठाणे येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home