
महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये खंडोबाची १२ प्रसिद्ध ठाणी आहेत. त्यापैकी तारळी नदीच्या तीरावर असलेले पाल हे जेजुरीनंतर खंडोबाचे महत्त्वाचे व जागृत ठाणे मानले जाते. याच ठिकाणी खंडोबा व म्हाळसादेवी यांचा विवाह झाला होता, अशी मान्यता आहे. हे ठाणे खंडोबाचे पाल म्हणून प्रसिद्ध आहे. पौष पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. या दिवशी खंडोबा व म्हाळसादेवी यांचा लाखो भाविकांच्या उपस्थित येथे विवाह सोहळा पार पडतो. या गावाचे मूळ नाव राजापूर होते; परंतु खंडोबाची प्रिय भक्त पालाई हिच्या नावावरून हे गाव पाल म्हणून प्रसिद्ध झाले.
मंदिराची आख्यायिका अशी की पूर्वी राजापूर गावातील पालाई नावाची एक गुराखी गाईंना चरण्यासाठी दररोज शेजारच्या डोंगरावर जात असे. त्या ठिकाणी असलेल्या मंदिरात ती खंडोबाची सेवा करीत असे. हा तिचा नित्यक्रम झाला होता. पुढे काही कारणांमुळे तिला आता डोंगरावर जाणे शक्य होत नव्हते, त्यामुळे तिने देवालाच डोंगरावरून खाली येण्यासाठी मनोमन साकडे घातले. पालाईच्या भक्तीवर प्रसन्न होऊन चंपाषष्ठीच्या मुहूर्तावर देवाने तिला स्वप्नदृष्टांत देऊन तुझ्याकडे असणाऱ्या कपिला गाईला ज्या ठिकाणी पान्हा फुटेल त्या ठिकाणी मी तुला दर्शन देईन, असे सांगितले. त्याप्रमाणे पालाईने ग्रामस्थांच्या मदतीने कपिलेचा शोध घेतला असता, गावाजवळ एका ठिकाणी कपिलेला पान्हा फुटला. ग्रामस्थांनी या ठिकाणी खोदकाम केल्यावर तेथे खंडोबाची पिंडी सापडली. तेच हे आजचे पालचे खंडोबा देवस्थान होय.
पाल गावाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या मंदिराला चारही बाजूंनी तटबंदी आहे. तटबंदीत असणाऱ्या भव्य प्रवेशद्वारातून मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला गजमंदिर असून त्यात एक भला मोठा दगडी हत्ती
आहे. प्रवेशद्वाराच्या अलीकडे दोन्ही बाजूला शेकडो पूजा साहित्याची दुकाने आहेत. मंदिराचा संपूर्ण आवार भंडारा उधळल्यामुळे पिवळाधम्मक दिसतो. हे मंदिर ५०० ते ५५० वर्षांपूर्वीचे असून आबा बिनशेट्टी पदिदे या वाण्याने ते उभारले होते. राजाराम महाराजांचे सेनापती धनाजीराव जाधव यांनी या मंदिराचा सभामंडप बांधला. मोगलांच्या उपद्रवामुळे १७७२ मध्ये खंडो पारगावकर यांनी मंदिराभोवती तटबंदी उभारली. १७९९ मध्ये चतुरसिंग आणि सरदार रास्ते यांच्यामध्ये झालेल्या युद्धाच्या वेळी चतुरसिंग या ठिकाणी येऊन विधिपूर्वक पूजा करून गेल्याचे सांगितले जाते.
‘समर्थ साधक’ या ग्रंथामधील उल्लेखानुसार १६६६ मध्ये समर्थ रामदास स्वामी सज्जनगडावरून चाफळ येथे निघाले असता मार्गात त्यांनी पाल येथील खंडोबा यात्रेच्या वेळी काही शाहिरांचे सवालजवाब ऐकले. त्यावेळी दोन्ही शाहिरांना आपल्या ज्ञानाचा गर्व झाल्याचे समर्थांना लक्षात आले आणि त्यांनी डफ हातात घेऊन त्यांना प्रश्न टाकला ‘किती पृथ्वीचे वजन। किती आंगोळ्या गगन। सांग सिंधूचे जीवन किती टाक। किती आकाशीचा वारा। किती
पर्जन्याच्या धारा। तृण भूमीवरी सखया। संख्या सांग?’ समर्थांचे हे सवाल ऐकून दोघेही शाहीर येथे निरुत्तर झाले होते.
वेळोवेळी झालेल्या जीर्णोद्धारामुळे मंदिराचे मूळ रूप बदलले आहे. मंदिराच्या चारही बाजूने ओवऱ्या आहेत. यातील एका ओवरीमध्ये खंडोबाचा भव्य खांडा (तलवार) आहे. मंदिराच्या आवारात ज्योर्तिलिंग, विठ्ठल, मार्तंडभैरव यांची लहान मंदिरे आहेत. याशिवाय सर्वत्र शिवलिंगे, कासव शिल्पे, नाग व नंदी यांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. यातील काही मूर्ती पितळी पत्र्याने मढविलेल्या आहेत.
मुख्य मंदिरासमोर नंदीमंडप आणि दीपमाळा आहेत. यापैकी नंदीमंडपाजवळ असलेल्या दीपमाळेवर विविध शिल्पे व नक्षीकाम अलंकृत केलेले आहे. मंदिर हेमाडपंती रचनेचे असून शिखरापासून त्यावर वैशिष्ट्यपूर्ण रंगकाम केलेले आहे. मुख्य प्रवेशद्वारावर सुबक कलाकुसर केलेला लाकडी दरवाजा असून सभामंडपात १२ दगडी स्तंभ आहेत. या सभामंडपाच्या तीन बाजूने दालने आहेत व त्यात भाविकांना बसण्यासाठी
दगडी बैठका आहेत. हा सभामंडप बांधणाऱ्या धनाजीराव जाधवांचे एका दगडावर ‘धनाजी दिनस दाजी जाधव‘ असे नाव कोरलेले आहे.
गर्भगृहाचे प्रवेशद्वार पितळी पत्र्याने मढविलेले आहे. खंडोबाची मूर्ती चतुर्भुज असून हातांमध्ये खड्ग, डमरू, त्रिशूल व पानपत्र आहेत. मूर्तीच्या मांडीखाली मणी व मल्ल या दैत्यांची मस्तके आहेत. गर्भगृहात स्वयंभू शिवलिंग असून त्यावर दोन शाळुंका आहेत. त्यापैकी एकावर खंडोबाचा, तर दुसऱ्या शाळुंकेवर म्हाळसाचा पितळी मुखवटा आहे. त्यांच्या शेजारी उजव्या बाजूला खंडोबाची दुसरी पत्नी बाणाई हिची मूर्ती आहे. संपूर्ण गाभारा भंडाऱ्याने रंगलेला दिसतो. या मंदिराच्या शिखरावर अनेक देवी–देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
दरवर्षी पौष पौर्णिमेला येथे खंडोबाची जत्रा भरते. या दिवशी खंडोबा–म्हाळसा यांचा विवाह सोहळा साजरा होतो. या सोहळ्यासाठी विविध गावांतील खंडोबाचे मानकरी मिरवणुकीने येथे मानाचे गाडे व सासनकाठ्या घेऊन येतात. दुपारी तीन वाजता प्रमुख मानकऱ्याचे रथातून आगमन होते. मंदिरातील सर्व विधी आटोपून सायंकाळी चार वाजता मानकरी देवाच्या मूर्ती घेऊन येथील अंधार दरवाजाजवळ येतात. तेथे ते रथात विराजमान झाल्यानंतर मुख्य मिरवणुकीस प्रारंभ होतो. मिरवणूक हळूहळू पुढे सरकत मारुती मंदिरमार्गे सायंकाळी सहापर्यंत बोहल्याजवळ येते. या वेळी खंडेरायाच्या जयजयकाराने परिसर दुमदुमून जातो. मंडपात आल्यानंतर देवाला स्नान घालण्यात येते. मुख्य मानकरी देवास बोहल्यावर चढवतात. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने लाखो भाविकांच्या साक्षीने खंडोबा व म्हाळसा यांचा विवाह सोहळा पार पडतो. या वेळी भाविक भंडारा व खोबऱ्याची उधळण करतात.
या सोहळ्याशिवाय चंपाषष्टीला येथे सहा दिवसांचा उत्सव असतो. या सोहळ्यात नवरात्रीप्रमाणे सहा दिवस घटस्थापना करण्यात येते. चंपाषष्टीच्या पाचव्या दिवशी म्हणजे पंचमीला येथे यात्रेला सुरुवात होते. यामध्ये हजारो भाविक सहभागी होतात. देवस्थानच्या वतीने येथे भक्त निवासाची सुविधा करण्यात आली आहे.