हिंदू धर्मात ब्रह्म, विष्णू, महेश हे त्रिदेव प्रमुख मानले जातात. यातील विष्णू हा सृष्टीचा पालनकर्ता आहे. त्याची हजार नावे आहेत. केशव हे त्यापैकीच एक लोकप्रिय नाव आहे. या देवाचे एक प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर बीड तालुक्यातील परभणी येथे आहे. केशव या नावाचा अर्थ ‘सुंदर केस असलेला देव’ असा होतो. येथील जागृत देव नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथील केशवराज भाविकांच्या शारीरिक, मानसिक व आर्थिक समस्या दूर करतो, अशी मान्यता आहे.
अभ्यासकांच्या मते हे मंदिर सुमारे आठशे ते हजार वर्षांपूर्वीचे असावे. मंदिराबाबत आख्यायिका अशी की गावातील एक वृद्ध गृहस्थ विष्णूचे परम भक्त होते. ते नित्यनेमाने विष्णू सहस्त्रनाम पारायण करायचे. आपल्याला सर्वांगसुंदर विष्णूचे प्रत्यक्ष दर्शन व्हावे, अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले व वर मागण्यास सांगितले. तेव्हा देवाने केशव रूपात कायमस्वरूपी येथेच स्थापित व्हावे व सर्व भाविकांच्या इच्छा फलद्रुप कराव्यात, असा वर त्यांनी मागितला. भक्ताच्या इच्छेचा मान राखून देव मूर्ती रूपात येथेच स्थापित झाले व पुढे गावकऱ्यांनी येथे मंदिर बांधले.
हे मंदिर गावातील वर्दळीच्या रस्त्याला लागून आहे. मंदिर रस्त्यापेक्षा सुमारे दहा फूट उंच ऐसपैस चौथऱ्यावर आहे. या चौथऱ्यास कोरीव पाषाणात बांधलेल्या सुमारे बारा पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या प्रारंभी साधीशी स्वागत कमान आहे. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला स्टेनलेस स्टीलचे सुरक्षा कठडे आहेत.
चौथऱ्यावर बाह्य बाजूने सुमारे चार फूट उंच कठडा आहे. त्यावर विविध देवदेवता व साधुसंतांची चित्रे रंगवलेली आहेत. चौथऱ्यावर कठड्यात व मध्यभागी लोखंडी स्तंभ आहेत. या स्तंभांवर पत्र्याचे छत आहे. चौथऱ्यावर एका कोपऱ्यात भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमांसाठी व्यासपीठ बांधलेले आहे. चौथऱ्यावर मंदिरासमोर कासव शिल्प आहे. पुढे सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिराचे प्रवेशद्वार चौथऱ्यापेक्षा उंचावर असल्यामुळे प्रवेशद्वारास तीन पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला द्वारपालपीठ आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल चित्रे रंगवलेली आहेत. द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे.
बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ भिंतीत आहेत. स्तंभांचा खालील सुमारे तीन फूट भाग चौकोनी आहे. वरील भागात चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. अष्टकोनी वितानावर मध्यभागी चक्राकार नक्षी आहे. सभामंडपात उजव्या बाजूला देवकोष्ठक आहे. त्यात गणपतीची मूर्ती आहे. सभामंडपात डाव्या बाजूला आणखी एक दरवाजा आहे.
पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. मंदिराचा अलीकडील काळात जीर्णोद्धार झाला असल्याने आतील बाजूला फरशी आच्छादन करण्यात आले आहे. गर्भगृहात वज्रपीठावर श्रीविष्णूची केशवराज रूपातील चतुर्भुज मूर्ती आहे. मूर्तीच्या डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. हातात शंख, चक्र, गदा व पद्म आहेत. मूर्तीवर वस्त्रे व अलंकार कोरलेले आहेत. तसेच पायाजवळ लक्ष्मी व गरुड यांची शिल्पे आहेत. मूर्तीच्या पाठशिळेवर वरील बाजूस विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. मूर्तीच्या मागे पितळी प्रभावळ आहे. या प्रभावळीत वर मध्यभागी कीर्तीमुख व दोन्ही बाजूला पानफुलांची नक्षी असलेले स्तंभ आहेत. मूर्तीवर चांदीचे छत्र आहे. गर्भगृहाच्या छतावर गोलाकार शिखर आहे. शिखरावर स्तंभ नक्षी आहेत. शिखराच्या शीर्षभागी आमलक व कळस आहे.
केशवराज मंदिरासमोर रस्त्याच्या पलीकडे वाहनतळ आहे. वाहनतळावर सुमारे पाच फूट उंच चबुतऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा आहे. पुतळ्याच्या मागे उंच चौथऱ्यावर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. मंदिरात जमिनीवर शिवपिंडी आहे. मंदिराच्या छतावर चारही कोनांवर गरुड, मारुती व इतर मूर्ती आहेत. छतावर मध्यभागी पाच थरांचे शिखर आहे. शिखराचा पहिला थर अष्टकोनी आहे. त्यातील सर्व बाजूंवर गजराज शिल्पे आहेत. शिखराचा दुसरा, तिसरा व चौथा थर गोलाकार आहेत. सर्व थरात प्रत्येकी आठ देवकोष्ठके आहेत. देवकोष्ठकात विविध देवमूर्ती आहेत. शिखराच्या पाचव्या थरात बाशिंग रचना आहे. तसेच शीर्षभागी आमलक व कळस आहे.
मंदिरात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते रामनवमी हा नऊ दिवसांचा जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. सलग दहा दिवस मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यानिमित्ताने राज्यभरातून भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. मंदिरात दसरा, दिवाळी, श्रावण मास, आषाढी व कार्तिकी एकादशी, महाशिवरात्री आदी सर्व सण व उत्सव साजरे केले जातात. आषाढी व कार्तिकी एकादशीनिमित्त अन्नदान केले जाते.