केशरनाथ मंदिर

शेडवई, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात घराडी शेडवई या दोन गावांच्या सीमेवर वसलेले केशरनाथ मंदिर हे कोकणातील प्राचीन विष्णू मंदिरांपैकी एक आहे. गर्द हिरवाईमधून बाराही महिने खळखळून वाहणाऱ्या ओढ्यानजीक असलेल्या या मंदिरातील केशवाची मूर्ती ही सुमारे ८०० वर्षे जुनी आहे. या मंदिराच्या शेजारी शिवाचेही स्थान आहे. कार्तिकी एकादशीच्या दिवशी येथे परिसरातील अनेक गावांतून दिंड्या येतात. यावेळी होणाऱ्या हरिनामाच्या गजराने हा परिसर दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत दुमदुमून जातो.

मंदिराबाबतची आख्यायिका अशी की शेकडो वर्षांपूर्वी काही भाविक ही मूर्ती घेऊन पायवाटेने येथून जात होते. वाटेत विश्रांती घेण्यासाठी ते ओढ्यानजीक थांबले मूर्तीही त्यांनी खाली ठेवली. काही वेळ विसावा घेतल्यानंतर पुढील प्रवासासाठी निघत असताना त्यांना मूर्ती उचलेनाशी झाली. त्यामुळे देवाला येथेच वास्तव्य करायचे असल्याचे त्यांच्या ध्यानात आले. त्यानंतर या जागेवर हे मंदिर उभारण्यात आले. येथील लावण्यसुंदर शिल्पजडीत लक्ष्मीकेशवाची मूर्ती कोकणातील दुर्मिळ शिल्पठेवा समजला जातो. मंडणगडदापोली रस्त्यावर दहागाव येथून उजवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शेडवई गाव आहे. गावातील बारस्करवाडीत हे मंदिर आहे. निसर्गाच्या कुशीत, शेजारी बारमाही वाहणाऱ्या ओढ्यानजीक, पारंपरिक कोकणी पद्धतीने बांधलेले हे साधेसे कौलारू मंदिर आहे. मंदिराच्या समोरील बाजूला भाविकांच्या सोयीसाठी पत्र्याची शेड लावण्यात आलेली आहे. मुख्य मंदिराची रचना सभामंडप गर्भगृह अशी आहे. मंदिराचे जोते जमिनीपासून सुमारे दोन ते अडीच फूट उंचीवर आहे. त्यावर जांभ्या दगडांत हे मंदिर बांधले आहे. येथील खुल्या सभामंडपातून गर्भगृहात प्रवेश केल्यावर समोर केशरनाथाच्या प्रसन्न मूर्तीचे दर्शन होते.

हिरवट काळसर छटा असलेली, काळ्या पाषाणात घडवलेली ही मूर्ती साडेतीन फूट उंचीची आहे. या मूर्तीवर वैशिष्ट्यपूर्ण कोरीवकाम कलाकुसर करण्यात आलेली आहे. मूर्तीच्या हातातील आयुधांच्या क्रमाप्रमाणे ( शं ) मूर्तीशास्त्रानुसार ही मूर्ती केशवाची आहे. या मूर्तीच्या खालच्या उजव्या हातात कमळ (पद्म), वरच्या उजव्या हातात शंख, वरच्या डाव्या हातात चक्र आणि खालच्या डाव्या हातात गदा अशी आयुधे आहेत. मूर्तीच्या डाव्या पायाजवळ छोटी लक्ष्मीमूर्ती असल्याने ही मूर्ती लक्ष्मीकेशवाची ठरते. मूर्तीच्या उजव्या बाजूला गरुडाचे शिल्प आहे. मूर्तीच्या मस्तकाजवळ डावीकडे महेश, तर उजवीकडे ब्रह्म असून प्रभावळीवर दशावतार कोरलेले आहेत. मूर्तीचे वस्त्र आणि अलंकार अतिशय नाजूक कोरीवकामाने घडवलेले आहेत. या मूर्तीच्या बाजूला गणेशाची मूर्ती आहे.

या मूर्तीसारखी घडण असलेल्या आणखी दोन मूर्ती जिल्ह्यातील सडवे आणि टाळुसरे येथे आहेत. या तिन्ही मूर्ती एकाच शिल्पकाराने घडवल्याचे बोलले जाते. या मंदिराच्या बाजूला शंकराचे मंदिर आहे. या मंदिरात जमिनीत चौकोनी आकाराच्या खोलगट भागात लहानसे शिवलिंग नंदीची मूर्ती आहे. गर्द झाडी, बाजूलाच वाहणारा बारमाही झरा, त्यातील छोटा धबधबा, नीरव शांतता आणि विविध पक्ष्यांचे कानावर येणारे कुजन, असा हा परिसर आहे.

केशरनाथाच्या मंदिराची परिसरात प्रतिपंढरपूर म्हणूनही ओळख आहे. येथे आषाढी कार्तिकी एकादशीला यात्रा असते. विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाऊ शकणारी मंडळी आवर्जून येथे दर्शनासाठी येतात. कार्तिकी एकादशीला येथे रात्रभर दिंडीचा कार्यक्रम होतो. पहाटेपर्यंत हा परिसर हरिनामाने दुमदुमून जातो. सकाळी काकड आरती झाल्यावर भाविकांना प्रसाद दिला जातो.

उपयुक्त माहिती:

  • मंडणगडपासून १९ किमी, तर रत्नागिरीपासून १५४ किमी अंतरावर
  • मंडणगडपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home