केदारेश्वर मंदिर

धर्मापुरी, ता. परळी, जि. बीड

बीड जिल्ह्यातील धर्मापुरी हे चालुक्यकालीन महत्त्वाचे ठाणे. धर्मापुरी या शब्दाचा एक अर्थ यमपुरी असा होतो. यमाच्या नगरीत मृत्यूनंतर माणसाच्या भल्या बुऱ्या कर्मांचा हिशेब केला जातो. याच कारणाने येथे अनेक वीरांची समाधी स्थळे होती. येथे सापडणारे वीरगळ या गोष्टीची साक्ष देतात. धर्मापुरी या शब्दाचा दुसरा अर्थ न्यायालय अथवा महत्त्वाची कचेरी किंवा राजपीठ होय. चालुक्य काळात या परिसरात महत्त्वाची राजकीय कचेरी असावी, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. त्यामुळेच येथे केदारेश्वराचे मंदिर बांधले गेले होते, असे सांगितले जाते. चालुक्यकालीन हे प्राचीन व प्रसिद्ध केदारेश्वर मंदिर आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहे.

हेमाडपंती स्थापत्यशैलीतील दगडी बांधकाम असलेले हे मंदिर चालुक्य राजा सहावा विक्रमादित्य याने बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात बांधले असल्याचे इतिहास अभ्यासक सांगतात. या परिसरात उत्खनन केले असता अनेक प्राचीन शिल्पे व वीरगळ सापडतात. त्यावरून या भागात प्राचीनकाळी अनेक मंदिरे होती, असा अंदाज वर्तविला जातो. परिसरातील अनेक घरांच्या बांधकामात मंदिरांचे प्राचीन अवशेष वापरले गेले असल्याचे सांगितले जाते. या सर्व गोष्टींवरून या मंदिराचे व परिसराचे प्राचीनत्व अधोरेखित होते.

गावापासून काही अंतरावर असलेल्या या मंदिरापर्यंत जाण्यासाठी पक्की सडक आहे. हे मंदिर सुमारे चार फूट उंच जगतीवर बांधलेले आहे. जगतीवर चढण्यासाठी कोरीव पाषाणात बांधलेल्या सुमारे पाच पायऱ्या आहेत. तीन दिशांना तीन मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. या तिन्ही मुखमंडपांसमोर प्रत्येकी पाच पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस सुरक्षा कठडे व चौथरे आहेत. मुखमंडपात प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला कठडे आहेत, ज्यात भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. कक्षासनांत आठ अर्धस्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. स्तंभदंडात चौकोन, षट्कोन, अष्टकोन आणि वर्तुळ असे भौमितिक आकार आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी कणी आणि त्यावर हस्त आहेत. हस्तांवर छताचा भार तोलून धरणारी भारवाहक यक्षांची शिल्पे कोरलेली आहेत. येथील वितानावर चक्राकार नक्षी आहे. मुखमंडपाचा भाग पुरातत्त्व विभागाने पुनर्निर्मित केला असल्याने तो मंदिराच्या इतर भागापेक्षा नवा वाटतो. मुखमंडपातील जमीन सभामंडपातील जमिनीपेक्षा काही इंच उंच आहे.

पुढे सभामंडप आहे. सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. त्याच्या बाह्य बाजूने कठडे व त्यात भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. सभामंडपात चार रांगांमध्ये एकूण सोळा स्तंभ आहेत. सभामंडपात बाह्य बाजूस अर्धस्तंभ आहेत आणि ते कक्षासनांत आहेत. मुखमंडप व सभामंडपातील कक्षासनांवर चौकट व स्तंभांवर नक्षी आहे. कक्षासनांवरील अर्धस्तंभाची रचना मुखमंडपातील अर्धस्तंभांसारखीच आहे. सभामंडपात मध्यभागी चार स्तंभ आहेत, जे नक्षीदार चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. स्तंभांचा खालील सुमारे दोन फूट भाग चौकोनी आहे. त्यावरील भागात चौकोन, षट्कोन, अष्टकोन आणि वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी कणी आहे आणि या कणीवर हस्त आहेत. हस्तांवर भारवाहक यक्ष शिल्पे कोरलेली आहेत. हस्तांवर तुळई आहे, ज्यावर छत आहे. प्रत्येक चार स्तंभांच्या मधील अष्टकोनी वितानावर मध्यभागी चक्राकार नक्षी आहे. सभामंडपात मध्यभागातील चार स्तंभांच्या मधील वितानावर सप्तमातृका शिल्पे व कीर्तीमुख कोरलेले आहेत. या चार स्तंभांच्या मधील जमिनीवर काही इंच उंच रंगशिळा आहे. सध्या या रंगशिळेवर नंदीची मूर्ती आहे. सभामंडपात अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दर्शनी भिंतीत रिकामी देवकोष्ठके आहेत.

पुढे सभामंडपापेक्षा अरुंद अंतराळ आहे. या अंतराळात डाव्या व उजव्या बाजूला प्रत्येकी एक देवकोष्ठक आहे. उजव्या बाजूच्या देवकोष्ठकात गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराला पाच द्वारशाखा आहेत. द्वारशाखांच्या खालील बाजूस द्वारपाल व द्वारपालिका शिल्पे आहेत. तसेच वर वेलबुट्टीशाखा, पर्णशाखा, पुष्पशाखा, स्तंभशाखा आहेत. ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे, तर ललाटपट्टीत पानाफुलांची नक्षी आहे. उंबरठ्यास चंद्रशिला आहे, जिच्यावर कीर्तीमुख शिल्पे कोरलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस नक्षीदार स्तंभ आहेत, ज्यांवर प्रवेशद्वाराचे तोरण आहे. तोरणात शिखरशिल्पे आहेत. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे. गर्भगृहात मागील भिंतीलगतच्या वज्रपीठावर पार्वतीची मूर्ती आहे. बाजूला शक्ती देवतेची मूर्ती आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृहात छताला पितळी घंटा टांगलेल्या आहेत.

मंदिराचा बाह्य भाग सुबक नक्षी व शिल्पांनी सुशोभित आहे. मंदिराच्या अधिष्ठानावर गजथर व इतर नक्षी आहे. मंडोवरावर विविध प्रकारची शैव व वैष्णव शिल्पे आहेत. यात विष्णूचे दशावतार, गौरीहर, ब्रह्मदेव, उग्रकाली, चतुर्भुज गरुड, बटू वामन व राजा बली यांची शिल्पे आहेत. तसेच शुकसारिका, पुत्रवल्लभा, मर्दला, विषकन्या, शुभगामिनी, पत्रलेखिका आदी सूरसुंदरी शिल्पे आणि काही कामशिल्पे आहेत. सर्व शिल्पांच्या पीठाखाली शिल्पपीठाचा भार तोलून धरणारी यक्षशिल्पे आहेत. मंडोवरावर प्रसव शिल्प आहे, जे अनोखे आहे. मंडोवराच्या मागील बाजूला मकर प्रणाल आहे व त्यावर आरूढ गंगा शिल्प आहे.

महाशिवरात्र हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी परिसरातील अनेक भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. उत्सवाच्या वेळी मंदिरात महाअभिषेक, भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. श्रावणातील सर्व सोमवारी मंदिरात भाविकांची गर्दी होते. पौर्णिमा, अमावस्या, सोमवार आदी दिवशी मंदिरात भाविकांची वर्दळ असते.

उपयुक्त माहिती:

  • परळी येथून २३ किमी अंतरावर
  • बीड येथून १२३ किमी अंतरावर
  • परळी येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीच्या सुविधा आहेत
Back To Home