केदारेश्वर महादेव मंदिर

शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा

नीरा, कानदी, वेळवंडी, गुंजवणी आणि शिवगंगा या पाच नद्यांच्या परिसरात शिरवळ हे शहर वसले आहे. हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली लढाई याच ठिकाणी सुभानमंडळ गढीवर लढली आणि विजयासोबतच स्वराज्यासाठी येथून बरीच संपत्तीही मिळविली. अशा ऐतिहासिक शिरवळमध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यापैकी शिवकाळापूर्वीचे केदारेश्वर मंदिर हे येथील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज अनेकदा दर्शनासाठी येऊन गेल्याचे इतिहासात दाखले आहेत.

शिरवळ शहराच्या मध्यभागी असलेल्या केदारेश्वर मंदिराच्या समोर एक घडीव दगडांची विहीर आहे. या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे ती शिवपिंडीच्या आकाराची असून त्यामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. विहिरीच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आलेला आहे. या विहिरीच्या मागच्या बाजूला असलेल्या केदारेश्वर मंदिराच्या चारही बाजूने सुमारे १८ फूट उंच दगडी तटबंदी आहे. या तटबंदीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करता येतो. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूला तटबंदीमध्ये ओवऱ्या आहेत. मुख्य मंदिराच्या समोर दुमजली नंदीमंडप असून त्यामध्ये तीन नंदी विराजमान आहेत. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या शिखरावर देवीदेवतांची शिल्पे कोरलेली आहेत. या नंदीमंडपाच्या दोन्ही बाजूला चार फूट उंचीच्या अष्टकोनी चौथऱ्यावर दोन उंच दगडी दीपमाळा आहेत. या दीपमाळांवर वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम केलेले दिसते.

मुख्य मंदिराचे स्वरूप हे दर्शनमंडप, सभामंडप गर्भगृह असे आहे. हेमाडपंती रचनेच्या या मंदिरातील दर्शनमंडप सभामंडपात अनेक नक्षीकाम केलेले दगडी खांब आहेत. या खांबांवर भिंतींवर रंगकाम केल्याने येथील दर्शन मंडप सभामंडप खुलून दिसतात. सभामंडपाच्या मध्यभागी एका देवळीत कालिका मातेची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या शेजारी गणेशाची मूर्ती असून ललाटबिंबावरही गणेशमूर्ती, तर खालच्या बाजूला कीर्तिमुख कोरलेले आहेगर्भगृहात काळ्या पाषाणातील भलीमोठी शिवपिंडी आहे. असे सांगितले जाते की ही शिवपिंडी स्वयंभू असून ती येथे एका शेतकऱ्याच्या नांगराला अडकली होती. या शिवपिंडीच्या एका बाजूला नांगराचा फाळ लागल्याची खूण आहे. शिवपिंडीच्या समोरील देवळीमध्ये पार्वतीमातेची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे.

मुख्य मंदिराशिवाय या प्रांगणात श्रीगणेश, हनुमान दुर्गामाता यांची मंदिरे आहेत. मंदिराच्या गर्भगृहावर असलेले शिखर हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. या शिखरावर मुख्य कळसाव्यतिरिक्त पन्नासहून अधिक लहानलहान कळस बसविलेले असून तेथे अनेक देवीदेवतांची शिल्पे आहेत. या मंदिरात श्रावण महिन्यात एक महिन्याची यात्रा असते. याशिवाय महाशिवरात्रीला एक दिवस यात्रा असते. महाशिवरात्रीच्या यात्रेच्या वेळी आदल्या दिवसाच्या मध्यरात्रीपासून येथे भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या असतात. दररोज सकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरातील केदारेश्वर महादेवाचे दर्शन घेता येते.

केदारेश्वर मंदिराशिवाय शिरवळच्या उत्तरेकडे किमी अंतरावर शिंद्याची वाडी नावाची वाडी आहे. येथे शिरवळमधील प्रसिद्ध असलेल्या लयणगिरी लेण्या आहेत. पुणेसातारा मार्गावर शिरवळपासून दोन किमी अलीकडे उजवीकडे लॉकीम फाटा लागतो, तेथून काही अंतरावर लयणगिरी (पांडवदरा) डोंगर नजरेस पडतो. पायथ्यापासून १५ ते २० मिनिटांच्या पायवाटेने या लेण्यांपाशी पोचता येते. या ठिकाणी काळा पाषाण खोदून अनेक छोट्या गुहा तयार केल्या आहेत. असे सांगितले जाते की पांडव अज्ञातवासात असताना त्यांनी या लेण्यांची निर्मिती करून या ठिकाणी मुक्काम केला होता. त्यामुळे या लेण्यांना पांडवदरा लेणी असे म्हटले जाते.

लेण्यांमधील विहारांची रचना ही बाहेरील बाजूस ओसरी आतील बाजूस एक खोली अशी आहे. आतील खोलीमध्ये बसायला बाकासारखी रचना असून बौद्ध भिक्षूंना त्यांच्या वस्तू ठेवण्यासाठी येथे विशेष जागा केलेल्या दिसतात. याशिवाय तेलवात लावण्यासाठी येथे खड्डा केलेलाही दिसतो. या लेण्यांच्या मुख्य विहारात शिवलिंग असून त्याची येथे नियमित पूजाअर्चा होते. महाशिवरात्री श्रावण महिन्यात शेकडो भाविक यालयणगिरी महादेवाच्या दर्शनाला येतात.

उपयुक्त माहिती:

  • खंडाळा शहरापासून १३ किमी, तर साताऱ्यापासून ६० किमी अंतरावर
  • मुंबई, ठाणे, पुणे सातारा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home