
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरनजीक असलेल्या पाचगणी शहराची स्वतंत्र अशी ओळख आहे. प्रसन्न वातावरण, डोंगर, दऱ्या, धबधबे, लेण्या, पठार असा निसर्गसमृद्ध परिसर हे पाचगणीचे वैशिष्ट्य. पर्यटनदृष्ट्या खास असलेल्या पाचगणीला ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्याही महत्त्व आहे. पाचगणी शहरालगत असलेले दांडेघर येथील प्राचीन केदारेश्वर व शहरातील जागृत घाटजाई देवी ही दोन मंदिरे हजारो भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. यातील केदारेश्वर मंदिर हे आपल्या प्राचीन समृद्धीची साक्ष देते तर घाटजाई देवीचे मंदिर हे येथील उत्सवांसाठी प्रसिद्ध आहे.
वाई–महाबळेश्वर मार्गावर पसरणी घाटातून पुढे आल्यावर पाचगणीच्या आधी दोन किमी अंतरावर दांडेघर गाव लागते. मुख्य मार्गापासून जेमतेम २०० मिटर अंतरावर गावाच्या मध्यभागी प्राचीन केदारेश्वराचे मंदिर आहे. मंदिर हेमाडपंती शैलीतील असून त्याचे बांधकाम १२व्या वा १३व्या शतकातील असावे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. छत्रपती शिवाजी महाराज अनेकदा या मंदिरात दर्शनासाठी आल्याचे सांगितले जाते.
केदारेश्वर मंदिराभोवती उंच दगडी तटबंदी असून त्यात असलेल्या दगडी कमानीतून पायऱ्या उतरून मंदिराकडे जावे लागते. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला भाविकांना थांबण्यासाठी ओवऱ्या बांधलेल्या आहेत.
मंदिराच्या कमानीजवळ पुजासाहित्य विक्रीची दुकाने आहेत. कमानीतून प्रवेश केल्यावर खालच्या बाजुला असलेल्या पुरातन मंदिराचे दर्शन होते. नंदीमंडप, जोडमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. नंदीमंडपातील नंदीची मूर्ती अडिच ते तीन फूट उंचीची असून नंदीला पितळी मुखवटा लावल्याने तो वैशिष्ट्यपूर्ण भासतो. अशा प्रकारे नंदीला पितळी मुखवटा लावल्याचे इतरत्र कोठे पाहायला मिळत नाही. नंदीमंडपापासून दोन फुटांवरच मुख्य मंदिराचा जोडमंडप आहे. मुख्य सभामंडपाला जोडून असलेल्या या जोडमंडपात १० दगडी खांब आहेत. तर सभामंडपात १६ खांब आहेत. हे सर्व खांब गोलाकार धाटणीचे आहेत. सभामंडपातून गर्भगृहात
जाण्यासाठी एक लहानसे प्रवेशद्वार आहे. त्याच्या दोन्ही बाजूला श्रीभैरवनाथ, देवी कडेश्वरी यांच्यासह अनेक देवीदेवतांच्या प्राचीन मूर्ती आहेत. सभामंडपापासून काहीशा खोलवर असलेल्या गर्भगृहात जाण्यासाठी पायऱ्या उतरून जावे लागते. तेथे मोठे प्राचीन शिवलिंग असून त्यावरील शाळुंकेच्या जागेवर काही खडकसदृश्य दगड आहेत व त्यातून सतत पाणी बाहेर येत असते. हेच पाणी मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या पुष्करणीमध्ये जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की मुख्य शिवलिंगासह या मंदिरात एकूण २२ प्राचीन दगडी मूर्ती असून त्यावरील कलाकुसर व कोरीवकाम अद्यापही सुस्थितीत असल्याचे पाहायला मिळते.
मंदिराच्या प्रांगणात सर्वत्र दगडी फरसबंदी आहे. मंदिर बांधकामाच्या वेळी लावलेले दगड आजही येथे सुस्थितीत आहेत. मंदिराच्या उजवीकडे प्रदक्षिणा मार्गावर श्री सती व श्री जननी माता यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या मागील बाजूस एक लहानशी पुष्करणी असून त्यात गोमुखातून बाराही महिने पाणी पडत असते. या पुष्करणीमध्ये खाली उतरण्यासाठी तिन बाजूने पायऱ्या आहेत. मंदिराच्या समोरील बाजूस नंदीमंडपाच्या मागे श्रीगणेश, श्री दाजी बुवा व संत दत्तात्रेय महाराज कळंबे यांच्या मूर्ती आहेत. मंदिराजवळ एक आंब्याचे झाड असून त्याला अश्विन महिन्यात मोहोर येतो. अशा प्रकारची अवेळी फळे देणारी झाडे दुर्मिळ असतात.
केदारेश्वर मंदिरापासून साधारणतः दोन किमी अंतरावर वाई–पाचगणी रस्त्याला लागून पाचगणी शहराचे आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री घाटजाई काळेश्वरी देवी मंदिराची कमान आहे. तेथून पुढे काही अंतरावर गर्द वनराईत, टेबल लॅण्डवर (डोंगरावरील पठार) घाटजाई काळेश्वरी देवीचे मंदिर आहे. हे जागृत देवस्थान असून या देवीमुळे येथील घाटमार्गावर शक्यतो अपघात होत नाहीत व कोणाला मोठी दुखापत होत नाही, अशी या परिसरातील भाविकांची श्रद्धा आहे.
निसर्गसमृद्ध परिसरात वास्तव्य करून असलेली ही देवी नवसाला पावणारी आहे, अशी मान्यता आहे. येथून जवळच असलेल्या पसरणी येथील भैरवनाथाची यात्रा पार पडल्यानंतर माघ वद्य नवमी आणि दशमीला घाटजाई काळेश्वरीचा वार्षिक यात्रोत्सव सुरू होतो. यावेळी झांजांच्या तालावर ढोल वाजविणाऱ्यांमध्ये होणारी चढाओढ आणि गुलाल–खोबऱ्याची उधळण हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. या वेळी संपूर्ण मंदिर परिसरात रोषणाई तसेच पताका लावून सजावट केली जाते.
या उत्सवात देवीचा भंडारा, देवींच्या पालखीची मिरवणूक, जागर, ढोल पथक व लेझीम यांच्या जुगलबंदीत छबिना (मिरवणूक) व लोकनाट्ये असे विविध कार्यक्रम पार पडतात. याशिवाय रामदास नवमीला (फाल्गुन कृष्ण नवमी) या देवीचा जागर व यात्रा असते. या वेळीही हजारोंच्या संख्येने भाविक या देवीच्या दर्शनाला येतात. त्याचबरोबर प्रत्येक मंगळवार, शुक्रवार तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये येथे भाविकांची गर्दी असते.