धर्माच्या आणि अध्यात्माच्या मार्गाने अनुयायांना सुसंस्कृत करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्नशील राहिलेले काशीनाथ महाराज यांचे संजीवन समाधीस्थान गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले आहे. हे स्थान ‘दक्षिण काशी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गंगाखेड येथे आहे. मराठवाड्यात गुरु-शिष्यपरंपरेची पाळेमुळे खोलवर रुजवण्यासाठी आयुष्यभर परिश्रम करणाऱ्या काशीनाथ महाराजांचे मराठवाडा व विदर्भात लाखो अनुयायी आहेत. गंगाखेड येथील त्यांच्या समाधी मंदिरात महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील हजारो अनुयायी येऊन महाराजांच्या समाधीला वंदन करतात.
बालपणापासूनच अध्यात्माकडे ओढा असलेल्या काशीनाथ महाराजांनी आयुष्यभर मानवसेवेचे व्रत घेतले होते. आपल्या शिष्यांना अध्यात्माचे धडे देत योग्य मार्ग दाखवण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या काशीनाथ महाराजांनी काही काळ शिक्षक म्हणूनही काम केले होते. ते संसारात फार काळ रमले नाहीत. त्यांनी गृहस्थाश्रमाचा त्याग करून संन्यासाश्रम स्वीकारला. काशीनाथ महाराज हे कर्नाटकातील यल्ललिंग महाराजांचे पट्टशिष्य होते. गुरुंच्या आज्ञेनुसार ते मराठवाड्यात आले. मराठवाड्यातील गावोगावी पदयात्रा करून त्यांनी गुरु-शिष्यपरंपरेची पाळेमुळे खोलवर रुजवण्यासाठी मोठे कष्ट घेतले. त्यांनी मराठवाड्यात सोळा ठिकाणी मठांची स्थापना केली. उमरगा येथील अचलबेटावरील गुहेत योगसाधना केल्यानंतर धाराशिव तालुक्यातील रामवाडी येथे त्यांचे २१ वर्षे वास्तव्य होते.
त्यानंतर त्यांनी गुरुंच्या आज्ञेनुसार लातूर जिल्ह्यातील मुरुड येथे मठाची आणि दत्त मंदिराची स्थापना केली. यानंतर त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील लखनगाव येथे शिवमंदिर, शिरधोण येथे गुरुआश्रम आणि उफळा येथे दत्तपादुकांची स्थापना केली. गुरुंच्या आज्ञेनुसार ते इ.स. १९४९ च्या सुमारास गंगाखेड येथे आले. त्यांनी येथे शिष्यांच्या मदतीने जमीन खरेदी करून मठाची स्थापना केली. येथेही त्यांच्या दर्शनासाठी असंख्य अनुयायी येत असत. मठाच्या सध्याच्या वास्तूच्या बांधकामास सन १९८२ ते १९८४ या काळात सुरुवात झाली. पृथ्वीतलावरील कार्य समाप्त होत असल्याची जाणीव झाल्यावर त्यांनी एका दिवशी काही अनुयायांना बोलावून घेतले. आपण लवकरच समाधी घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांनी आपले समाधीस्थानही निश्चित केले होते. त्यांच्या हयातीतच समाधी मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली. त्यांच्या अनुयायांनी श्रमदान करून हे समाधी मंदिर उभारले. समाधीसमोर स्थापन केलेले शिवलिंग काशीनाथ महाराजांनी स्वतः वाराणसी येथे जाऊन आणले होते. त्यांचे अनुयायी त्याला ‘आत्मलिंग’ असे म्हणतात. सन २००१ मध्ये ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी त्यांनी संजीवन समाधी घेतली.
या मठाचा परिसर प्रशस्त आहे. मठाच्या महाद्वारावर कलाकुसर आहे. महाद्वाराच्या पायथ्याशी कीर्तिमुखे कोरलेली आहेत. प्रवेशद्वारातून आत आल्यावर दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोन ओवऱ्या आहेत. प्रांगणात मध्यभागी समाधी मंदिर आहे. या मंदिराचे स्वरूप सभामंडप आणि गर्भगृह असे आहे. सभामंडपात नंदीमूर्ती व शेजारीच काशीनाथ महाराजांची धुनी आहे.
ही धुनी अखंड प्रज्वलित असते. गर्भगृहात काशीनाथ महाराजांची मूर्ती आहे. या मूर्तीसमोर शिवलिंग आहे. शिवलिंगाच्या समोर चांदीच्या पादुका आहेत. गर्भगृहावर सुंदर शिखर उभारले आहे.
मंदिराच्या प्रांगणात डाव्या बाजूला असलेल्या औदुंबर वृक्षाखाली दत्तपादुका आहेत. मंदिराच्या मागील बाजूला काशीनाथ महाराजांचे देवघर आहे. येथे ते पूजा, जप आणि तप करत असत. ते याच ठिकाणी अनुयायांना अनुग्रह देत असत. या देवघरात काशीनाथ महाराजांच्या वापरातील वस्तू जतन केलेल्या आहेत. त्यांच्या जवळच महाराजांची गादी आहे. गादीच्या मागील बाजूस हवनस्थान आहे. श्रावण महिन्यात येथे महिनाभर रुद्रयाग केले जातात. गादीपासून काही पावलांवर महाराजांचा पलंग आहे. त्याच्या जवळ एका खुर्चीत त्यांचे पट्टशिष्य भोलेनाथ यांची प्रतिमा ठेवली आहे. तेथून काही पावलांवर महाराजांचा झुला आहे. तेथून पुढे आल्यावर सुरुवातीला गणेश मंदिर आहे. त्याशेजारीच असलेल्या गर्भगृहात काशीनाथ महाराजांचे आजेगुरू म्हणजेच यल्ललिंग महाराजांचे गुरू सिद्धलिंग महाराज यांची मूर्ती आहे. या मूर्तीसमोर शिवलिंग आहे. या गर्भगृहाच्या शेजारी दत्त मंदिर आहे. येथे दत्तात्रयांच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. यल्ललिंग महाराजांच्या हस्ते सन २००१ मध्ये या मूर्तीची स्थापना झाली होती. या मंदिराच्या शेजारी असलेल्या गर्भगृहात यल्ललिंग महाराजांची मूर्ती आहे.
या मूर्तीसमोरही शिवलिंग आहे. सिद्धलिंग महाराज आणि यल्ललिंग महाराजांच्या गर्भगृहाच्या समोर नंदीमूर्ती आहे. सिद्धलिंग महाराजांचा मठ कर्नाटकातील लच्छन येथे आहे. यल्ललिंग महाराजांचा मठ कर्नाटकातील मुगलखोद येथे आहे. येथून काही पावलांवर असलेल्या चौथऱ्यावर नवग्रहांची स्थापना केलेली आहे. परिसरात कालभैरव आणि मारुतीचे मंदिरही आहे. येथील मारुती मंदिरातील मूर्तीची स्थापना सन २०११ मध्ये झाली.
परिसरात असलेल्या एका इमारतीत अन्नछत्रही चालवले जाते. सन २००४ पासून दर गुरुवारी दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत हे अन्नछत्र सुरू असते. पंचक्रोशीतील अनेक भाविक या अन्नछत्राचा लाभ घेतात. परिसरात काशीनाथ महाराज वापरत असलेले वाहन जतन केलेले आहे.
या मंदिरात दररोज सूर्योदयापूर्वी सिद्धलिंग आणि यल्ललिंग महाराजांची आरती होते. त्यानंतर काशीनाथ महाराजांची आरती करण्यात येते. यानंतर काशीनाथ महाराजांच्या देवघरात पूजा केली जाते. महाराजांना काजू, बदाम, साखर आणि तुपापासून बनवलेला विशेष नैवेद्य अर्पण करण्यात येतो. त्यानंतर त्यांना चहाचा नैवेद्य दाखवला जातो. हा विधी झाल्यानंतर भाविकांना व अनुयायांना तीर्थ दिले जाते.
दुपारी १२ वाजता दत्त मंदिरात आरती झाल्यावर देवघर आणि समाधी मंदिरात आरती केली जाते. दुपारचा नैवेद्य झाल्यावर दुपारी १२.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मंदिर बंद असते. येथे दररोज सूर्यास्तापूर्वी सांजआरती केली जाते.
या मंदिरात महाशिवरात्र, रामनवमी, गुढीपाडवा, दसरा, गुरुपौर्णिमा आणि दत्तजयंती आदी सण व उत्सव साजरे केले जातात. या उत्सवांच्या वेळी मंदिरातून पालखी मिरवणूक काढण्यात येते. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला काशीनाथ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त येथे मोठा उत्सव होतो. त्यानिमित्ताने येथे अखंड हरिनाम सप्ताहही होतो.
या सप्ताहादरम्यान भजन, कीर्तन, प्रवचन आणि इतर धार्मिक कार्यक्रम होतात. मुख्य सोहळ्याच्या दिवशी मंदिरातून गावात पालखी मिरवणूक काढण्यात येते.
पालखी मंदिरात परत आल्यावर महाआरती होते आणि त्यानंतर भाविकांना व अनुयायांना महाप्रसाद वाटला जातो. या दिवशी धाराशिव जिल्ह्यातील रामवाडीपासून गंगाखेड येथे भाविकांची पालखीही चालत येते. दररोज सकाळी पाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.