परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात जवळा येथे श्री जिवाजी महाराज संस्थान हे एक प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरामुळे या गावाला ‘जवळा जिवाजी’ असे नाव पडले आहे. जेजुरीच्या भगवान खंडोबाचे निस्सीम भक्त असलेल्या जिवाजी महाराज आणि त्यांच्या पत्नीच्या समाधीचे प्रतीक म्हणून या मंदिराच्या मुख्य गर्भगृहात दोन मुख्य लिंगे प्रतिष्ठित आहेत. हे देवस्थान भाविकांमध्ये अत्यंत जागृत स्थान म्हणून ओळखले जाते. उंच महाद्वार, मजबूत तटबंदी, नगारखाना आणि मुख्य घुमटाकार शिखर ही या मंदिराची प्रमुख वास्तुरचनात्मक वैशिष्ट्ये आहेत. मंदिरात जिवाजी महाराजांच्या वंशजांची चार समाधी लिंगे देखील आहेत. चंपाषष्ठीला येथे मोठी वार्षिक यात्रा भरते. या यात्रेत “येळकोट येळकोट जय मल्हार” अशा जयघोषात पिवळा भंडारा उधळत खंडोबाची भव्य पालखी निघते. सायंकाळी होणारा नवसाच्या गाड्या ओढण्याचा सोहळा हे या देवस्थानचे एक वैशिष्ट्य मानले जाते.
या मंदिराच्या स्थापनेविषयी आणि जिवाजी महाराजांविषयी परिसरात एक प्राचीन आख्यायिका सांगितली जाते. अनेक वर्षांपूर्वी या भागात जिवाजी महाराज देवकर नावाचे खंडोबाचे निस्सीम भक्त होऊन गेले. ते दररोज रात्री पायी चालत जेजुरीला दर्शनासाठी जात असत. जेजुरीला जाताना आणि तिथून परत येताना त्यांच्या पायातील जोडे फाटत असत. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ते जोडे पुन्हा आपोआप नवीन होत असत, असे सांगितले जाते. आपला पती दररोज रात्री नक्की कोठे जातो, हे जिवाजी महाराजांच्या पत्नीला समजत नव्हते. त्यामुळे तिने एका रात्री त्यांच्यावर पाळत ठेवण्याचे ठरवले.
ती जिवाजी महाराजांच्या नकळत त्यांच्या पाठीमागे निघाली आणि थेट जेजुरीला पोहोचली. जेजुरी गडाच्या पायऱ्या चढत असताना मागून काहीतरी आवाज आला. त्यामुळे जिवाजी महाराजांनी मागे वळून पाहिले. त्या वेळी त्यांना तिथे आपली पत्नी उभी असलेली दिसली. मात्र, ते पत्नीला त्या वेळी काहीही बोलले नाहीत. त्याच रात्री भगवान खंडोबाने जिवाजी महाराजांना प्रत्यक्ष दर्शन दिले. त्या रात्री खंडोबाने जिवाजी महाराजांना आपल्याजवळच ठेवून घेतले आणि “यापुढे पुन्हा जेजुरीला येऊ नकोस” असा आदेश दिला. दुसऱ्या दिवशी गावात परत आल्यावर जिवाजी महाराजांनी समाधी घेतली. आपण आपल्या पतीवर संशय घेतला आणि त्यामुळेच त्यांनी समाधी घेतली, या विचाराने त्यांच्या पत्नीनेही समाधी घेतली. या मंदिरातील मुख्य गर्भगृहात जिवाजी महाराज आणि त्यांच्या पत्नीच्या समाधीचे प्रतीक म्हणून दोन लिंगांची स्थापना केलेली आहे. येथे या दोन्ही लिंगांचे दर्शन घडते.
मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच महाद्वार भव्य असे आहे. महाद्वाराला लागूनच मजबूत तटबंदी व वरच्या भागात नगारखाना आहे. महाद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर ‘पेव्हर ब्लॉक’ची फरसबंदी केलेले प्रांगण लागते. या प्रांगणाच्या आतील भागात चारही बाजूंनी ओवऱ्यांसारखे बांधकाम केलेले आहे. या प्रांगणामध्ये समोरच मुख्य मंदिर आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात,
मध्यभागी भगवान खंडोबाचे एक चित्र रंगवलेले आहे.
मंदिरात नव्याने बांधण्यात आलेल्या मंडपामध्ये प्रवेश केल्यावर भाविकांना एका लिंगाचे आणि नंदीच्या मूर्तीचे दर्शन घडते. या मूर्तीजवळच शेंदूर लावलेले तीन तांदळे म्हणजेच पाषाण प्रतिष्ठित आहेत. येथून पुढे कमानीच्या आकाराची दोन प्रवेशद्वारे लागतात. या प्रवेशद्वारांतून मुख्य सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात एका उंच चौथऱ्यावर दोन लिंगे बसवलेली आहेत. या सभामंडपाच्या भिंतींमध्ये देवकोष्टकेही तयार केलेली आहेत. येथून पुढे उजव्या बाजूला मुख्य गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या उजवीकडे असलेल्या एका चौथऱ्यावर आणखी दोन लिंगे दिसतात. असे सांगितले जाते की ही चारही लिंगे जिवाजी महाराजांच्या वंशजांच्या समाध्या आहेत. मंदिराच्या मुख्य गर्भगृहाचे प्रवेशद्वार आकाराने लहान आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना पवित्र मंगलकलशाची चित्रे रंगवलेली आहेत आणि मध्यभागी ‘ॐ’ हे अक्षर लिहिलेले आहे. गर्भगृहामध्ये एका पीठासनावरील जागेत जिवाजी महाराज आणि त्यांच्या पत्नीच्या समाधीचे प्रतीक असलेली दोन मुख्य लिंगे विराजमान आहेत. या दोन्ही लिंगांवर धातूचे मुखवटे बसवलेले आहेत. यातील जिवाजी महाराजांच्या लिंगावर फेटा बांधलेला आहे,
तर त्यांच्या पत्नीच्या समाधीवर मुकुट चढवलेला आहे. गर्भगृहाच्या वरच्या भागात घुमटाकार शिखर आहे. या शिखरावर द्विस्तरीय म्हणजेच दोन थरांचे आमलक आणि त्यावर कळस बसवलेले आहेत. शिखराच्या चारही बाजूंना उंच मिनारांसारखी रचना आहे.
मुख्य मंदिराच्या वास्तूला लागूनच डाव्या बाजूला या संस्थानाचे देणगी कार्यालय आहे. या कार्यालयाच्या डाव्या बाजूला वर छत असलेला एक मंडप उभारलेला आहे. त्यासमोर दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून संस्थानाने एक भक्तनिवास बांधलेले आहे. या मंदिर परिसरामध्ये भाविकांसाठी एक स्वतंत्र स्वयंपाकगृह देखील उपलब्ध आहे.
जिवाजी महाराजांवर श्रद्धा असलेले असंख्य भाविक येथे दर्शनासाठी येतात. विशेषतः दर रविवारी येथे येणाऱ्या हजारो भाविकांमुळे परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. चंपाषष्ठी आणि एकनाथ षष्ठी हे या संस्थानातील प्रमुख उत्सव आहेत. एकनाथ षष्ठीच्या दिवशी मंदिरातून श्रींची पालखी काढली जाते. ही पालखी गावातील मारुती मंदिरात जाते आणि तिथे दर्शन घेऊन पुन्हा मुख्य मंदिरात परत येते. चंपाषष्ठीच्या दिवशी येथे मोठी जत्रा भरते.
जत्रेच्या दिवशी अनेक भाविक मंदिराच्या प्रांगणामध्ये लोटांगण घालत मुख्य मंदिरापर्यंत येतात. दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
यात्रेच्या दिवशी सायंकाळी मंदिर परिसरामध्ये भाविकांकडून नवसाच्या गाड्या ओढण्याची जुनी परंपरा येथे पाळली जाते. या गाड्यांमध्ये लोक बसलेले असतात आणि दोरखंडाच्या साहाय्याने या गाड्या ओढल्या जातात. चंपाषष्ठीच्या रात्री मुख्य मंदिरातून भगवान खंडोबाची पालखी निघते.
या पालखी सोहळ्यापूर्वी गावातील प्रमुख मानकऱ्यांच्या कुटुंबांना मानाने मंदिरात आणण्यासाठी संस्थानातर्फे हलगी आणि मशाल पाठवल्या जातात. त्यानंतर “येळकोट येळकोट जय मल्हार” अशा जयघोषात सर्व मानकरी मंदिराच्या दिशेने मार्गस्थ होतात. सर्व मानकरी मंदिरात एकत्र आल्यानंतर मुख्य गर्भगृहातून खंडोबाची उत्सवमूर्ती बाहेर आणली जाते.
ही उत्सवमूर्ती सुंदर सजवलेल्या पालखीत विराजमान केली जाते. त्यानंतर मंदिरापासून या पालखीची संपूर्ण गावातून अत्यंत उत्साहात ग्रामप्रदक्षिणा काढली जाते. पालखीच्या पुढे भाविक विविध प्रकारचे पारंपरिक खेळ सादर करतात. या पालखी सोहळ्यामध्ये संपूर्ण परिसरात भंडारा उधळत हजारो भाविक भक्तिभावाने सहभागी होतात. हे मंदिर दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांसाठी खुले असते.