काशी विश्वनाथ मंदिर

बीड बायपास, भालगाव फाटा, जि. छत्रपती संभाजीनगर

हिंदू धर्मामध्ये काशी यात्रेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. काशी येथे जाऊन विश्वनाथाचे दर्शन घेऊन गंगास्नान केल्यास सर्वपापमुक्ती होते, असे मानले जाते. मात्र सर्वांनाच काशीस जाण्याचे भाग्य लाभत नाही. अशा भाविकांसाठी मराठवाड्यातच काशी विश्वनाथाचे मंदिर उभारण्यात आले आहे. २०१७ मध्ये उभारण्यात आलेल्या या देखण्या मंदिरामध्ये सहा फूट उंचीची भव्य शिवपिंडी आहे. या मंदिरापासून जवळच भालगावमध्ये रामचंद्र मठात रामदास स्वामींनी स्वतः स्थापन केलेली श्रीराम वामांकारुढ सीतेची दुर्मीळ मूर्ती आहे.

छत्रपती संभाजीनगरपासून २० किमी अंतरावर, धुळेसोलापूर महामार्गाच्या बीड बायपास रोडवर, भालगाव गावाच्या सीमेवर हे मंदिर उभारण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील अंबरवाडी गावातील विश्वनाथ घुगे कुटुंबीयांनी आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ हे मंदिर उभारले आहे. ते प्रथम येथून वेगळ्या जागेवर उभारण्यात येणार होते. त्या ठिकाणी भूमिपूजनही झाले होते. मात्र भूमिपूजन झाल्यानंतर त्या ठिकाणी एक नाग आला आणि त्याने पूजास्थान अस्ताव्यस्त केले. नंतर सध्या ज्या ठिकाणी पिंडी आहे, तेथे येऊन तो बसला. हा दृष्टान्त मानून मंदिरासाठी हीच जागा निवडण्यात आली. असे सांगितले जाते की आजही या मंदिर परिसरात नियमित नाग येतात.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले मूळ काशी विश्वनाथ मंदिर हे वाराणसीमध्ये आहे. भगवान शिव ही वाराणसीची संरक्षक देवता असून पौराणिक कथांनुसार या नगरीचे निर्माण त्रिशुलाच्या टोकावर करण्यात आलेले आहे. सध्याचे काशी विश्वनाथ मंदिर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी .. १७८० मध्ये उभारले होते. महाराष्ट्रात वाई येथे कृष्णावेण्णा संगमावर काशी विश्वेश्वराचे मंदिर आहे. त्या मंदिराचे निर्माण .. १७३५ मध्ये करण्यात आले होते. आता एकविसाव्या शतकात भालगाव फाटा येथे काशी विश्वनाथाच्या या मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे.

रस्त्यालगत असलेल्या या मंदिराचे पांढऱ्या रंगाचे शिखर कळस दुरूनच लक्ष वेधून घेतात. मंदिराला विस्तीर्ण प्रांगण आहे. त्याला पेव्हर ब्लॉकची फरसबंदी आहे. या मंदिराच्या समोरील बाजूने पाच कमानीसदृश्य दरवाजे आहेत. यापैकी मधल्या कमानीमध्ये आतील बाजूस सभामंडपात मोठ्या चौथऱ्यावर नंदी विराजमान आहे. तिच्या बाजूच्या दोन्ही कमानींतून मंदिरात आत जाण्यासाठी बाहेर पडण्यासाठी प्रवेशद्वारे आहेत. या प्रवेशद्वारांच्या शेजारी असलेल्या कमानींपुढे कलाकुसर केलेले दोन मोठे गजराज आहेत. या कमानीवजा दरवाजांतून आत गेल्यावर प्रशस्त संगमरवरी फरसबंदी असलेल्या आयताकृती सभामंडपात प्रवेश होतो. या सभामंडपातील नंदीची मूर्ती मोठी असून त्यावर वैशिष्ट्यपूर्ण कोरीवकाम रंगकाम केलेले आहे. हा सभामंडप खुल्या स्वरूपाचा आहे. येथील खांबांवरही कलाकुसर आहे. भाविकांना बसण्यासाठी सभामंडपाच्या दोन्ही बाजूंस बाकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यास दोन गर्भगृहे आहेत. पहिल्या गर्भगृहात जाण्यासाठी सभामंडपातून १० पायऱ्या चढून जावे लागते, तर दुसरे गर्भगृह तळघरात असून तेथे जाण्यासाठी सभामंडपातून दहा पायऱ्या उतराव्या लागतात.

पहिल्या गर्भगृहात एका उंच अधिष्ठानावर तीन लहान मंदिरांच्या प्रतिकृती आहेत. त्यातील मध्यभागी असलेल्या मंदिरात विठ्ठलरुक्मिणी यांच्या मूर्ती आहेत. त्याच्या उजवीकडे गणपती तर डावीकडे साईबाबा यांच्या मूर्ती आहेत. येथील अधिष्ठानाच्या खालच्या बाजूला काचेच्या पेटीत कासवयंत्र आहे. या गर्भगृहातील भिंतींवर संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या प्रतिमाही आहेत. तळघरातील गर्भगृहाच्या मध्यभागी सुमारे सहा फूट उंचीची भलीमोठी शिवपिंडी आहे. तिचे वेगळेपण असे की येथील शाळुंकेच्या टोकावर (जेथून अभिषेकाचे पाणी बाहेर जाते) गायीचे मुख आहे. या शिवपिंडीभोवती पिंडीच्याच आकाराचे स्टीलचे रेलिंग लावण्यात आलेले आहे. या रेलिंगला लागून नऊ फूट उंचीचे त्रिशूल डमरू आहे. शिवपिंडीच्या पुढील भिंतीमध्ये अन्नपूर्णादेवीची आशीर्वाद मुद्रेतील शुभ्र संगमरवरातील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. याशिवाय येथील भिंतीवर कैलास पर्वतावर ध्यानस्थ बसलेल्या शिवशंकरांची सुंदर प्रतिमा आहे. येथील शिवपिंडीस रोज नवा साजशृंगार करण्यात येतो. या मंदिरात वर्षभर दर सोमवारी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद दिला जातो. तसेच श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी, रविवारी गुरुवारी येथे महाप्रसाद दिला जातो.

काशी विश्वनाथाच्या या भव्य मंदिराबरोबरच भालगाव हे येथील प्राचीन श्रीरामचंद्र मठासाठीही प्रसिद्ध आहे. समर्थ रामदास स्वामी यांना श्रीरामाचा अनुग्रह झाल्यानंतर काही वर्षांनी त्यांनी संपूर्ण भारतात तीर्थाटन केले. तेथून ते .. १६४४ मध्ये महाबळेश्वरला आले. त्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांनी मसुर येथे मारुतीची स्थापना करून रामनवमीच्या उत्सवास प्रारंभ केला. आपल्या अवतारकाळात त्यांनी सातारा, सांगली कोल्हापूर परिसरात ११ मारुतींची स्थापना केली. त्याच प्रमाणे अनेक ठिकाणी मठही स्थापन केले. असे सांगितले जाते की भालगावमधील मठ त्यातीलच एक असून या मठात स्वतः समर्थांनी श्रीराम सीतेची मूर्ती स्थापिली. स्थापनेनंतर रामदास स्वामींनी त्यांचे शिष्य त्र्यंबकराज (भोळाराम) यांच्याकडे महंत म्हणून मठाची जबाबदारी सोपवली. येथील लोककथेनुसार, भोळाराम यांच्या नावावरून या गावाला भालगाव असे नाव पडले.

काशी विश्वनाथ मंदिरापासून पूर्वेकडे येथे येण्यासाठी डांबरी रस्ता आहे. हा रस्ता थेट मठापर्यंत येतो. रस्त्याच्या डावीकडे समर्थ रामदास स्वामींनी वाड्यात स्थापन केलेला हा मठ आहे. मठाच्या गर्भगृहात काळ्या सागवानी लाकडाच्या मोठ्या देवघरात श्रीराम आणि सीतेची पंचधातूची मूर्ती आहे. बुधकौशिक ऋषींनी अनुष्टुभ छंदात रचलेल्यारामरक्षास्तोत्राच्या पहिल्याच ध्यानश्लोकामध्येवामांकारूढ सीताअसे श्रीरामांचे वर्णन केलेले आहे. या वर्णनाच्या मूर्ती दुर्मीळ असून त्यातील एक खुद्द रामदास स्वामींचे जन्मगाव जांब (जि. जालना) येथील राममंदिरात आहे, तर अशीच एक मूर्ती पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे १८८४ मध्ये स्थापन झालेल्या राममंदिरात आहे. तेथे या मूर्तीसराज्याभिषेक मूर्तीअसे म्हणतात. भालगाव येथील मठातहीवामांकारूढ सीतास्वरूपातील श्रीराममूर्ती आहे. श्रीरामाच्या उजव्या बाजूला हनुमानाची तर सीतेच्या डाव्या बाजूला गरुडाची मूर्ती आहे.

येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. नऊ दिवस हा उत्सव चालतो. त्यादरम्यान अभिषेक, दासबोध पारायण, श्री रामविजय ग्रंथ पारायण, महाआरती, महाप्रसाद, श्रीरामनाम जप, हरिहर स्वामी रचित दिवटी सलाम, हरि कीर्तन आदी कार्यक्रम होतात. रामनवमीला होणाऱ्या मुख्य सोहळ्यादरम्यान सकाळी सात वाजता श्रीरामांच्या मूर्तीस अभिषेक होतो. त्यानंतर सकाळी दहा ते बारा या वेळेत रामजन्म उत्सव सोहळा होतो. दुपारी दहा वाजता महाप्रसाद तर दुपारी दोन वाजता महाआरती होते. दुपारी तीन वाजता वसंतपूजा होते. सायंकाळी बारागाड्यांचा कार्यक्रम होतो. परिसरातील अनेक भाविक या सोहळ्यास उपस्थित असतात.

उपयुक्त माहिती:

  • छत्रपती संभाजीनगरपासून १९ किमी अंतरावर
  • छत्रपती संभाजीनगरपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : काशी विश्वनाथ मंदिर, विश्वनाथ घुगे, मो. ९४२२२०१७००
  • सुरेश रामदासी, अध्यक्ष, श्रीरामचंद्र मठ संस्थान, मो. ९३७१०६५१२६
Back To Home