खटाव तालुक्यातील अंभेरी येथे शक्तीचे प्रतीक असलेले दैवत कार्तिक स्वामी यांचे मंदिर प्रसिद्ध असून तेथे स्वामींची १२व्या शतकातील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. रहिमतपूर–वडूज रस्त्यावर ज्या ठिकाणी हे मंदिर आहे, तेथील घाटाचे नामकरण या मंदिरावरून कार्तिकेय घाट असे झाले आहे, तर ज्या दोन डोंगरांमध्ये हे स्थान आहे, त्या परिसराला देवदरी असे सुंदर नाव पडले आहे. शिवलीलामृत आणि पद्मपुराणात या मंदिराचा उल्लेख आहे. त्यामुळे हे मंदिर यादव वा चालुक्य काळातील किंवा त्याच्या आधीचे असावे, असे सांगितले जाते.
रहिमतपूर–वडूज रस्त्यावरून कार्तिक स्वामी मंदिराकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक मार्ग कार्तिकेय घाटाच्या अलीकडून सुरू होऊन तेथून पायवाटेने मंदिरापर्यंत जाता येते. दुसरा मार्ग हा नव्याने बांधला असून घाट संपल्यावर तेथून डांबरी रस्त्याने मंदिरापर्यंत जाता येते. दोन्ही बाजूने उंचच उंच डोंगर व निसर्गरम्य वातावरणाने समृद्ध अशा या मार्गाने थेट मंदिराजवळ असलेल्या वाहनतळापर्यंत पोचता येते. मंदिराच्या अलीकडे कमंडलू नदीवर एक लहानसा लोखंडी पूल आहे. त्या पुलावरून पलीकडच्या बाजूला असलेल्या कुंडातील पाण्याने हात–पाय धुऊन मंदिरात जाण्याची पद्धत आहे. पावसाळ्यात या पुलाच्या समोरून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी येथे दररोज शेकडो पर्यटक येत असतात.
मंदिराची आख्यायिका अशी की एकदा पार्वती मातेवर रुसून कार्तिक स्वामी कैलास पर्वतावरून अंभेरी या गावात आले. या ठिकाणी त्यांनी अनेक वर्षे तपश्चर्या केली. त्यांच्या येथील वास्तव्याच्या काळात त्यांनी आपल्या कमंडलूतील पाणी बाजूला ओतून दिले. त्यामुळे तिथे एक नदीचा प्रवाह तयार झाला. हीच नदी कमंडलू नदी म्हणून अखंड वाहत असते. या नदीचे उगमस्थान कार्तिक स्वामी मंदिराच्या परिसरात आहे.
मंदिरात समोरासमोर दोन गर्भगृहे असून त्यांना जोडणारा एक सभामंडप आहे. जुन्या गर्भगृहात काही पायऱ्या उतरून जावे लागते. तेथे एक शिवपिंडी असून त्याच्या मागे साधारण साडेतीन मीटर उंचीची कार्तिक स्वामींची काळ्या पाषाणातील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. ही मूर्ती अंदाजे १२व्या शतकातील असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. मूर्ती एकमुखी असून तिला १२ हात आहेत. उजवीकडील एक हात अभय मुद्रेत, तर डावीकडील एका हातात कोंबडा धरलेला दिसतो. डोक्यावर मुकुट, त्यातून डोकावणारे नागशिल्प, कानात कुंडले, गळ्यात आणि पायात अलंकार आहेत. मूर्तीच्या उजवीकडे खालच्या बाजूला मोर कोरलेला असून त्याचा पिसारा डाव्या पायाच्या पुढे आला आहे. पायापासून उजव्या खांद्यापर्यंत भाला कोरलेला आहे. डोक्यावर जटामुकुट असलेली ही मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे.
मुख्य मूर्तीशेजारी सहा मुखे असलेली व अंदाजे दीड फूट उंचीची कार्तिक स्वामींची आणखी एक मूर्ती आहे. १२ हात असलेल्या या मूर्तीच्या हातांत विविध आयुधे दिसतात. कमरेला धोतर नेसलेली अशी ही मूर्ती आहे. या मूर्तीसंदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी की अंभेरी गावातील घाटातून एकदा इनामदार नावाचे गृहस्थ बैलगाडीने प्रवास करीत होते. रस्ता नागमोडी असल्याने एका वळणावर त्यांची गाडी दरीत कोसळली. काही कालावधीनंतर ते शुद्धीवर आले व त्यांनी पाहिले तर ते कार्तिक स्वामी मंदिराजवळ होते. या मोठ्या अपघातातून कार्तिक स्वामींनीच आपल्याला तारले, अशी त्यांची खात्री झाली व काही दिवसांनंतर त्यांनी येथील मंदिरात मूळ मूर्तीच्या शेजारी सहामुखी कार्तिक स्वामींची मूर्ती घडवून तिची स्थापना केली. त्यामुळे या मंदिरात कार्तिक स्वामींच्या दोन मूर्ती आहेत.
या गर्भगृहासमोरील दुसऱ्या गर्भगृहात नव्याने बसविण्यात आलेली एकमुखी कार्तिक स्वामींची संगमरवरी मूर्ती आहे. गर्भगृहात असलेल्या पायरी मार्गाने खाली उतरल्यावर आत काशिनाथ भारती महाराजांची समाधी पाहायला मिळते. या भारती महाराजांनी या परिसरात अनेक वर्षे तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या आवारात चाफ्याच्या झाडाखाली दोन वीरगळी आहेत. पुढे काही अंतरावर दोन तपस्वींची समाधी स्थळे आहेत. हा संपूर्ण परिसर वटवृक्षांनी व गर्द झाडींनी वेढलेला आहे.
श्रावणातल्या पहिल्या सोमवारी आणि कार्तिक पौर्णिमेला इथे यात्रा भरते. या मंदिरात महिलांना प्रवेश मिळत नाही. धनवृद्धी व प्रापंचिक अडचणींसाठी येथे नवस करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हे जागृत स्थान असून हा देव नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. ज्या व्यक्तींना मंगळ असेल त्यांनी कृतिका नक्षत्रावर कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्यास मंगळाची पिडा कमी होते, अशी मान्यता आहे. त्यामुळे कार्तिकी पौर्णिमेला कृतिका नक्षत्रावर येथे हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते.