अलकनंदा, वरुणा व शास्त्री या नद्यांच्या संगमावर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर वसले आहे. या नद्यांच्या संगमाजवळ वसलेल्या कर्णेश्वर मंदिराचा समावेश राज्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांमध्ये होतो. असे सांगितले जाते की इ. स. १०७५ ते १०९५ या कालखंडात चालुक्य कुळातील राजा कर्णदेव याची संगमेश्वर येथे राजधानी होती. त्याच्या कार्यकाळात या गावाला मोठी तटबंदी बांधून येथे अनेक मंदिरे आणि महाल उभारण्यात आले. राजा कर्णाने हे मंदिर उभारले म्हणून ते कर्णेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. हे मंदिर २०१२ मध्ये पुरातत्त्व विभागाकडून राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.
ऐतिहासिक नोंदींनुसार, शिवकाळापूर्वी संपूर्ण देशात संगमेश्वर हे रामक्षेत्र व विद्यानगरी म्हणून प्रसिद्ध होते. संगमेश्वरपासून काही अंतरावर असलेल्या श्रृंगारपूर गावात देशातील त्यावेळचे सर्वात मोठे ज्ञानपीठ होते. तेव्हा देशभरातून अनेक संतमहंत व विद्यार्थी येथे अभ्यासासाठी येत असत. सह्याद्री खंडामध्येही या प्रदेशाचा रामक्षेत्र असा उल्लेख आलेला आहे. असे सांगितले जाते की या परिसरात प्राचीन काळी ३५० हून अधिक मंदिरे होती. आता त्यातील केवळ ३० मंदिरे शिल्लक आहेत. काहींच्या मते चालुक्य राजा कर्ण याने हे मंदिर बांधले, तर काहींच्या मते पांडवांनी वनवास काळात आपला ज्येष्ठ बंधू कर्ण याच्या नावाने एका रात्रीत हे मंदिर बांधले. दिवस उजाडण्यापूर्वी पांडवांना हे ठिकाण सोडणे भाग असल्यामुळे मंदिराच्या शिखराचे काम अर्धवट राहिले.
कर्णेश्वर मंदिराभोवती मजबूत तटबंदी आहे. तटबंदीच्या पूर्व व पश्चिम दिशेला प्रवेशद्वारे आहेत. पूर्वाभिमुख असलेले मंदिर तीन फूट उंच जोत्यावर (पाया) आहे. या जोत्यावरूनच दोन मीटर रुंदीचा प्रदक्षिणेसाठी मार्ग आहे. १६ कोन व पाच घुमटांचे शिखर असलेल्या मंदिराला तीन मुखमंडप व तीन बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्या पूर्वेकडील मुखमंडपाच्या पायऱ्यांखाली दोन लहान मंदिरे आहेत. त्यामध्ये गणपती व नृत्यपार्वती यांच्या मूर्ती आहेत. तेथून पाच पायऱ्या चढून मुख्य मुखमंडपात प्रवेश होतो. मुखमंडपाच्या दोन्ही बाजूला सुमारे पाच फूट उंचीची कक्षासने (दगडी बाके) आहेत. त्यांच्या बाजूने वामनस्तंभ (अर्धस्तंभ) आहेत. कक्षासनाच्या बाहेरील बाजूने लहान–लहान शिल्पे कोरलेली आहेत. ज्यामध्ये देवी–देवतांसह वादक व नर्तक असे कलाकारही आहेत. तेथील छतावर मध्यभागी दगडी झुंबर कोरलेले आहे. त्या बाजूला समुद्रमंथन व दशावतार दृष्ये कोरलेली दिसतात. मुखमंडपातील स्तंभ, द्वारशाखा व भिंतीवरही कोरीव काम केलेले आहे.
सभामंडपात अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती असून तेथील गोलाकार स्तंभांवर कोरीवकाम आहे. या खांबांच्या वरच्या बाजूला साधारणतः सर्वत्र दिसणाऱ्या भारवाहक यक्षांऐवजी शिव व गणेश यांची शिल्पे आहेत, हे येथील वेगळेपण आहे. सभामंडपाच्या छतावर यंत्र कोरलेले आहे. असे सांगितले जाते की या यंत्रातून पूर्वी मंत्रोच्चारांचा प्रतिध्वनी ऐकू येई, पण आता तसा प्रतिध्वनी येणे बंद झाले आहे. गर्भगृहाच्या दोन्ही बाजूला ब्रह्मा व विष्णू कोरलेले आहेत. सभामंडपातून गर्भगृहाकडे जाण्याच्या मार्गावर खालील बाजूला दगडावर सुबक रांगोळी कोरलेली आहे. तेथून अंतराळात प्रवेश होतो. अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस शिखरांची प्रतिकृती व त्यांच्या मध्यभागी शेषशाही विष्णू आहे. गर्भगृहात कर्णेश्वराचे लिंग व पार्वतीची मूर्ती आहे.
मंदिराच्या बाह्य भागात गाभाऱ्यातील पाणी बाहेर जाण्यासाठी मगरमुख आहे. मंदिराच्या समोर एका उंच चौथऱ्यावर दगडी दीपस्तंभ एक लहान मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला सूर्यमंदिर आहे. या छोटेखानी मंदिरातील सूर्यमूर्ती उभी असून मूर्तीच्या प्रभावळीमध्ये राशीचक्र कोरलेले आहे. त्याच्यासमोरच पुढील बाजूला वाईच्या गणपतीची आठवण करून देणारी मूर्ती असलेले गणपती मंदिर आहे. मंदिरातील गणपतीची मूर्ती ही साडेचार फूट उंचीची आहे. चतुर्भुज असणारी ही मूर्ती तैलरंगाने रंगविलेली आहे. मूर्तीच्या उजवीकडील एका हातात परशू, तर दुसऱा हात गुडघ्यावर ठेवलेला आहे. डावीकडील वरील हातात अंकुश व खालील हातात मोदक असून तो सोंडेने उचलत असल्याच्या स्थितीत आहे. या गणेशाचे दोन्ही पाय गुढघ्यात वाकलेले आहेत.
कर्णेश्वर मंदिरापासून ५० मीटर अंतरावर श्रीलक्ष्मीनृसिंहाचे मंदिर आहे. संगमेश्वर महात्म्य या ग्रंथात या मंदिराचा उल्लेख आहे. येथील नृसिंहाची मूर्ती चतुर्भुज असून मांडी घातलेल्या स्थितीत आहे. डाव्या मांडीवर लक्ष्मी आरुढ आहे व नृसिंहाचा एक डावा हात लक्ष्मीच्या पाठीवर आहे, तर दुसऱ्या डाव्या हातात शंख आहे. वरच्या उजव्या हातात चक्र व खालील उजवा हात उजव्या गुडघ्यावर आहे. वैशाख शुक्ल चतुर्दशीला येथे नृसिंह जयंतीचा मोठा उत्सव साजरा केला जातो.