छत्रपती संभाजीनगरची (पूर्वीचे औरंगाबाद) ग्रामदैवता असलेल्या कर्णपुरा देवीचे मंदिर शहरातील छावणी परिसरात आहे. नवसाला पावणारी असा लौकिक असलेल्या कर्णपुरा देवीला कर्णिका देवी असेही म्हणतात. तुळजाभवानीचे प्रतिरूप अशी मान्यता असलेल्या या देवीचे हे मंदिर सुमारे २०० वर्षांपूर्वीचे आहे. शारदीय नवरात्रोत्सवात येथे दहा दिवस मोठी यात्रा भरते. ही यात्रा छत्रपती संभाजीनगर परिसरातील एकमेव जुनी यात्रा मानली जाते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही यात्रा येथे भरते. या दहा दिवसांत कर्णिका देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येथे येतात.
ऐतिहासिक नोंदींनुसार, इ. स. १८३५ मध्ये राजस्थानमधील बिकानेरचे महाराज कर्णसिंह यांनी येथील खाम नदीच्या पूर्वेला आपल्या लवाजाम्यासह छावणी टाकली होती. कर्णसिंह यांचे या परिसरात २० ते २५ वर्षे वास्तव्य होते. तेव्हापासून या परिसराला कर्णपुरा असे ओळखले जाऊ लागले. याच परिसरात कर्णसिंह यांनी पद्मपुरा व केसरसिंहपुराही वसविले. राजस्थान येथील कर्णिका मातेचे भक्त असलेल्या कर्णसिंह यांनी कर्णपुरा येथे हे देवीचे मंदिर उभारले होते. १९८२ मध्ये झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे. या मंदिरात जाताना प्रथम सिद्धिविनायक मंदिर लागते. या गणपतीचे दर्शन घेऊन नंतर देवीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे.
सभामंडप, गर्भगृह आणि प्रदक्षिणा मार्ग असे कर्णपुरा देवी मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपातील मोठ्या खिडक्यांमुळे येथे पुरेसा प्रकाश आणि खेळती हवा असते. भाविकांना बसण्यासाठीही सभामंडपात आसनव्यवस्था आहे. या सभामंडपाच्या डाव्या बाजूला गर्भगृह आहे. गर्भगृहाभोवती स्टेनलेस स्टीलचे रेलिंग बसवण्यात आले आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारानजीकच्या खांबांच्या वरच्या भागात डावीकडे हातात वीणा असलेली सरस्वती तर उजवीकडे धनलक्ष्मी यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. गर्भगृहात मध्यभागी असलेल्या मखरात कर्णपुरा देवी विराजमान आहे. काळ्या पाषाणात घडवलेल्या या मूर्तीवर सुंदर मुकुट, विविध वस्त्रे व आभूषणांमुळे तिचे रूप खुलून दिसते. मूर्तीच्या प्रभावळीवरही वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर आहे. आकर्षक नक्षीकाम असलेल्या मखराच्या मध्यभागी कीर्तिमुख तर वरच्या कोपऱ्यांवर डावीकडे चंद्र आणि उजवीकडे सूर्यप्रतिमा कोरण्यात आल्या आहेत. गर्भगृहासमोर सभामंडपाच्या बाहेरील बाजूस देवीचे वाहन असलेल्या सिंहाची प्रतिकृती व यज्ञकुंड आहे. प्रदक्षिणा मार्गावर गर्भगृहाच्या मागील भिंतीवर भवानी मातेचा आशीर्वाद घेणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे चित्र रंगविलेले आहे. या चित्राच्या वरच्या बाजूस डावीकडे बासरी वादन करणारा कृष्ण आणि उजवीकडे श्रीरामाचे चित्र आहे. येथून काही पावलांवर असलेल्या एका पाळण्यात शयनगादी आहे. देवी रात्री तेथे निद्रा करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
नवरात्रोत्सव हा येथील मोठा उत्सव असतो. घटस्थापनेच्या दिवशी पहाटे तीन वाजता विधिवत महापूजा, सात वाजता आरती, सव्वासात वाजता घटस्थापना होते. पहाटेपासूनच मंदिराबाहेर दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागतात. विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी परंपरेप्रमाणे बालाजीचा रथ ओढून सीमोल्लंघन करण्यात येते. (देवी मंदिराच्या शेजारीच बालाजी मंदिर आहे.) सायंकाळी कर्णपुरा देवीची आरती झाल्यावर बालाजी मंदिरात आरती करण्यात येते. त्यानंतर रथयात्रेला सुरुवात होते. रथाला दोरखंड बांधण्यात येतो. हा रथ दोरखंडाने ओढत ओढत पंचवटी चौकात आणल्यानंतर पुन्हा आरती होते. सीमोल्लंघन झाल्यावर रथ पुन्हा मंदिराकडे निघतो. मंदिरात आल्यावर आरती झाल्यावर या मिरवणुकीची सांगता होते. रथोत्सवादरम्यान बालाजीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होते.
नवरात्रोत्सवात येथील कर्णपुरा मैदानावर दहा दिवसांची मोठी यात्रा भरते. शहरातील ही एकमेव जुनी यात्रा समजली जाते. यावेळी मंदिर व परिसरात सजावट तसेच रोषणाई करण्यात येते. असे सांगितले जाते की यात्रेदरम्यान देवीच्या दर्शनासाठी दहा लाखांहून अधिक भाविक येतात. दहा दिवसांत सुमारे दहा कोटींहून अधिकची उलाढाल होते. कर्णसिंह यांचे पुत्र केसरसिंह यांनी येथील केसरसिंहपुरा येथे स्थापन केलेले रेणुका मंदिरही या मंदिरापासून जवळ आहे. येथेही नवरात्रोत्सवादरम्यान भाविकांची गर्दी असते. कर्णपुरा देवी मंदिरात दररोज पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत भाविकांना देवीचे दर्शन घेता येते.