रत्नागिरीतील जयगडनजीक नांदिवडे गावाजवळ असलेले कऱ्हाटेश्वर मंदिर हे कोकणातील प्राचीन शिवमंदिरांपैकी एक आहे. निळ्याशार अथांग समुद्राला लागून हे शिलाहारकालीन मंदिर आहे. बाजूला समुद्राचे खारे पाणी असूनही तेथून अवघ्या १० ते १५ पावलांवर असलेल्या येथील गोमुखातून गंगेच्या रूपाने वाहणारा गोड्या पाण्याचा झरा हा येथील एक निसर्गाचा चमत्कार समजला जातो. परिसरात राहणाऱ्या जोग व कानिटकर कुटुंबांचे कऱ्हाटेश्वर हे कुलदैवत आहे.
मंदिराची अख्यायिका अशी की जोगी नावाच्या गुराख्याची एक गाय पूर्वी जंगलातून वाट काढत येऊन समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या येथील दगडावर पान्हा सोडत असे. ती घरी गेल्यावर दूध देत नसल्याने गायीच्या मालकाने तिचा पाठलाग केला असता त्याला येथे स्वयंभू शिवलिंग आढळले. जांभ्या दगडाच्या खडकाला स्थानिक भाषेत काटा–कऱ्हाटा असे म्हणतात. त्या कऱ्हाट्यावर हे शिवलिंग आढळले म्हणून या देवस्थानाला कऱ्हाटेश्वर असे नाव पडले. ती गाय मेल्यानंतरही अनेक वर्षे साखळीला तिचे शिंग बांधून कऱ्हाटेश्वराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक केला जात असे. त्यानंतर अभिषेकपात्र बनवल्यावर शिंग पूजेसाठी गर्भगृहात ठेवण्यात आले. आजही गर्भगृहात वरच्या बाजूला असलेल्या एका देवळीत गायीचे शिंग पाहता येते.
इ. स. १६३७ मध्ये विश्वनाथ पित्रे या विद्वान पंडिताने लिहिलेल्या ‘वाडेश्वर महात्म्य’ या ग्रंथात कऱ्हाटेश्वर मंदिराचा उल्लेख आहे. समुद्राच्या मध्यभागी पर्वताच्या शिखरावर कऱ्हाटेश्वर आहे, या परिसरात गंगाकोलाहलांचा उगम आहे, असेही त्यात म्हटले आहे. यावरून मंदिर १६३७ पूर्वीचे असल्याचे स्पष्ट होते.
जयगड येथील जेएसडब्ल्यू प्रकल्पाच्या प्रवेशद्वारापासून डावीकडे जाणाऱ्या रस्त्याकडून पाच किलोमीटर अंतरावर कऱ्हाटेश्वर मंदिर आहे. समुद्र किनाऱ्यावरील एका मोठ्या खडकावर बांधले असल्याने ते एका तुकड्यावर उभे असल्यासारखे वाटते. समुद्राच्या बाजूने तटभिंत असून आवारात जांभ्या दगडांची फरसबंदी आहे. असे सांगितले जाते की अकराव्या शतकात शिलाहार काळात हे मंदिर बांधण्यात आले होते. आता कौलारू रचनेच्या मंदिराच्या जागेवर पूर्वी केवळ गवताने शाकारलेली छोटीशी घुमटी होती. येथील नंदीची मूर्ती या घुमटीबाहेर होती. इ.स. १६००, १७६४, १९२१ आणि १९७० मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याच्या नोंदी आहेत. ब्रिटिश काळात मंदिराचे जांभ्या दगडांत बांधकाम करण्यात आले होते.
कमानीतून जांभ्या दगडांच्या काही पायऱ्या उतरून मंदिरात जावे लागते. मंदिराकडे जाताना वाटेत औदुंबर वृक्ष आणि गणेशाचे छोटे मंदिर लागते. मंदिरात गणेशाची संगमरवरी मूर्ती आहे. गणेश मंदिराजवळील पायऱ्या उतरल्यावर कऱ्हाटेश्वर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मुख्य मंदिरासमोर तीन प्राचीन दगडी दीपमाळा आहेत. दीपमाळांच्या जवळच १९७० मध्ये बांधण्यात आलेली नवी दीपमाळ आहे.
सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिरातील लाकडी दरवाजे आणि इतर बांधकामांवरून प्राचिनत्वाच्या खुणा दिसतात. मंदिरात दगडी फरसबंदी आहे. लाकडी बांधकाम असलेल्या सभामंडपातील खांबांच्या वरच्या बाजूला नक्षीकाम आहे. अंतराळात गर्भगृहाला लागूनच असलेल्या डाव्या भिंतीजवळ पाच पितळी नागमूर्ती आणि शिवाच्या तीन मूर्ती आहेत. त्यापैकी एक तांडवनृत्य करणारी आहे. गर्भगृहात स्वयंभू शिवलिंग आणि त्यावर छत्र धरलेला नागफणा आहे. गर्भगृहाला घुमटाकार छत व वर चौकोनावर चौकोन अशा पद्धतीचे शिखर आहे. मंदिरात महाशिवरात्र व श्रावणी सोमवारी भाविकांची मोठी गर्दी असते. भाविकांना काही शुल्क भरून अभिषेक, वार्षिक अभिषेक, रुद्र एकादष्णी, महाशिवरात्र पूजा, श्रावणातील पूजा, लघुरुद्र यांसारख्या पूजा व विधी करता येतात. (संपर्क : कऱ्हाटेश्वर पूजा व्यवस्था मंडळ, मो. ९९७५१७१७५६)
मंदिराच्या पूर्वेला जयगड किल्ला आणि शास्त्री नदीच्या मुखाचा परिसर दिसतो. मंदिराच्या उजव्या बाजूने खाली किनाऱ्यावर जाण्यासाठी १०० फूट जांभ्या दगडांच्या पायऱ्या आहेत. काहीसे खाली उतरल्यावर पायरी मार्गाच्या बाजूला गोमुखातून वाहणारा गोड्या पाण्याचा झरा दृष्टीस पडतो. येथून बारमाही वाहणारे पाणी दोन कुंडांमध्ये साठवले जाते, त्यात स्नान करणे पवित्र मानले जाते. एका बाजूला समुद्राचे पाणी आणि त्यासमोरच गोड्या पाण्याचा झरा, हा निसर्गाचा एक चमत्कार मानला जातो. असे सांगितले जाते की येथे कऱ्हाटेश्वर प्रगट झाला तेव्हा मोठा आवाज होऊन येथून पाणी वाहण्यास सुरुवात झाली होती. यादवांच्या काळात एके वर्षी कार्तिक वद्य प्रतिपदेला येथे गंगा अवतीर्ण झाली होती. तिला ‘बेभाटी गंगा’ म्हणून ओळखले जात असे. १९२२ मध्ये मंदिराभोवतालची जागा रुंद करण्यासाठी खडक फोडले, तेव्हापासून ती लोप पावली.
नांदिवडे गावात कऱ्हाटेश्वर मंदिराशिवाय जोगेश्वरी, चंडिका, लक्ष्मीनारायण अशी आणखी मंदिरे आहेत. जयगड येथील समुद्र हा डोंगराच्या कडेला असल्याने येथे वाळू किंवा पुळणी नाही, थेट खोल समुद्रच आहे. त्यामुळे उंचावरून दूर दूरपर्यंतचा समुद्र नजरेत साठवता येतो. दररोज सकाळी ७ ते दुपारी १ व सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत कऱ्हाटेश्वराचे दर्शन घेता येते.