कनिफनाथ मंदिर

काळेगाव, ता. खामगाव, जि. बुलडाणा

नवनाथांपैकी एक ‘नाथ’ तसेच चौऱ्याऐंशी सिद्धांपैकी एक ‘सिद्ध’ मानल्या जाणाऱ्या कनिफनाथांचे मंदिर खामगाव तालुक्यातील काळेगाव येथील उंच टेकडीवर विराजमान आहे. ज्ञानगंगा अभयारण्यानजीक असलेल्या या निसर्गरम्य टेकडीवर कनिफनाथांनी काही काळ वास्तव्य करून तपश्चर्या केली होती, असे मानले जाते. नाथसंप्रदायाचे असंख्य अनुयायी या मंदिरात दर्शनासाठी येतात. शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात येथे नऊ दिवस यात्रा भरते. त्या वेळी हा परिसर भक्तांच्या गर्दीने गजबजून जातो. या यात्रेतील कळण्याची भाकर आणि हिरव्या मिरचीचा ठेचा हा महाप्रसाद अत्यंत प्रसिद्ध आहे.

पौराणिक माहितीनुसार नाथ संप्रदायाचा उदय भगवान शंकरांपासून म्हणजेच आदिनाथांपासून झाला. ज्या काळात समाज कर्मकांडांच्या जटिल जाळ्यात अडकला होता आणि अध्यात्म केवळ ठराविक वर्गापुरते मर्यादित होते, त्या काळात सामान्यांना योगसाधनेच्या व सोप्या भक्तीच्या माध्यमातून ईश्वराची ओळख करून देण्याचे महान कार्य या संप्रदायाने केले. आदिनाथांनी हे गुह्य ज्ञान माता पार्वतीला सांगितले आणि तेथूनच मत्स्येंद्रनाथांच्या रूपाने ही परंपरा प्रत्यक्ष लोकजीवनात प्रवाहित झाली. ‘अलख निरंजन’ या मंत्राचा जयघोष करत नऊ सिद्ध योगी, म्हणजेच नवनाथ, भारतभर भ्रमण करू लागले. या नऊ नाथांनी प्रत्यक्ष समाजात मिसळून जातिभेद आणि अंधश्रद्धा दूर करण्याचे कार्य केले.

याच दिव्य परंपरेतील एक प्रखर तेजस्वी आणि सिद्ध योगी म्हणजे कानिफनाथ. नऊ नाथांमध्ये त्यांना ‘प्रबुद्ध नारायण’ यांचा अवतार मानले जाते. त्यांच्या जन्माची पौराणिक कथा मोठी विलक्षण आणि प्रतीकात्मक आहे. हत्तीच्या कानातून त्यांचा जन्म झाल्याचे सांगितले जाते म्हणूनच त्यांना ‘कानिफनाथ’ हे नाव प्राप्त झाले. जालंदरनाथांचे लाडके शिष्य असलेले कानिफनाथ हे आपल्या अफाट सिद्धीसाठी आणि करुणेसाठी जनमानसात प्रसिद्ध होते. त्यांनी कावेरीच्या तीरापासून ते नर्मदेच्या खोऱ्यापर्यंत आणि महाराष्ट्राच्या डोंगरदऱ्यांपर्यंत या संप्रदायाचा यशस्वी प्रसार केला. कानिफनाथांचे व्यक्तिमत्व हे शक्ती, योग आणि भक्तीचे अजोड मिश्रण होते. त्यांनी समाजातील शोषित आणि वंचितांना जवळ केले, त्यामुळेच आजही त्यांच्या भक्तगणांमध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांचा समावेश असतो.

कानिफनाथांनी आपल्या योगाग्नीने समाजातील अज्ञान जाळून टाकले आणि सामान्यांच्या हृदयात आत्मज्ञानाचा दिवा लावला. मालू कवींच्या ‘नवनाथ भक्तिसार’ या ग्रंथामध्ये कानिफनाथांच्या पराक्रमाचे आणि त्यांच्या लोककल्याणाच्या कथांचे अतिशय विस्तृत व ओघवत्या शैलीत वर्णन आढळते. महाराष्ट्रात भ्रमंती करत असताना सध्याच्या खामगाव तालुक्यातील काळेगाव येथील टेकडीवर त्यांचे वास्तव्य होते आणि येथूनच ते अंतर्धान पावले, असे सांगण्यात येते. कालांतराने ग्रामस्थांनी येथे त्यांचे छोटेखानी मंदिर उभारले. दगड व चुन्याचा वापर करून बांधलेले हे मंदिर कालौघात जीर्ण झाले होते, त्यामुळे ग्रामस्थांनी सन १९९१ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला. राज्य सरकारने या मंदिराला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे.

बुलडाणा – खामगाव मार्गावर ज्ञानगंगा अभयारण्य संपल्यानंतर काही अंतरावर डाव्या बाजूला काळेगावकडे जाणारा रस्ता आहे. या गावातूनच मंदिराकडे येण्यासाठी मार्ग आहे. मंदिराच्या कमानीपासून काही पावलांवर टेकडीवर येण्यासाठी सिमेंटच्या पायऱ्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय थेट मंदिराजवळ जाण्यासाठी आता नव्याने रस्ता देखील उपलब्ध आहे. टेकडीच्या पठारावर मंदिराभोवती आवारभिंत आहे आणि या भिंतीत असलेल्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. पेव्हरब्लॉकची फरसबंदी असलेल्या या प्रांगणात दीपस्तंभ, एका झाडाखाली आसरा देवींचे स्थान व यज्ञकुंड आहे. मंदिरासमोर खुला मंडप आहे. या मंडपाच्या मध्यभागी असलेल्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर नवसाच्या नारळांचे तोरण बांधलेले असते. गर्भगृहात दगडी देवकोष्ठकात कनिफनाथांची मूर्ती आहे. या कोष्ठकाच्या दोन्ही बाजूंना त्रिशूळ आहे. या मूर्तीसमोर अश्व आहे व त्यासमोरील चौथऱ्यावर पादुका आहेत. मंदिर परिसरात दत्तात्रय तसेच हनुमानाची छोटी मंदिरे आहेत. दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या निवासाच्या सोयीसाठी राज्य सरकारच्या पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत येथे भक्तनिवास उभारण्यात आले आहे.

कनिफनाथांवर श्रद्धा असलेले असंख्य भाविक येथे दर्शनासाठी येतात. अनेक भाविक येथे नवनाथ ग्रंथाचे पारायण करतात. दर पौर्णिमेला येथे अनेक धार्मिक कार्यक्रम होतात. या दिवशी येथे येणाऱ्या शेकडो भाविकांना भंडाऱ्याचे वाटप करण्यात येते. माघ शुद्ध द्वितीयेला येथे धर्मनाथ बीज साजरी केली जाते. दत्तजयंतीलाही येथे मोठा उत्सव होतो. नवरात्रोत्सवाच्या काळात नऊ दिवस येथे यात्रा भरते. या वेळी मंदिरात पारायण सप्ताहासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या यात्रेनिमित्त टेकडीच्या पायथ्याशी अनेक दुकानेही लागतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कळण्याची भाकर, हिरव्या मिरचीचा ठेचा तसेच वांग्याचे भरीत यांचा समावेश असलेल्या महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. पंचक्रोशीतून येणारे भाविक मंदिर परिसरातच चुली मांडून हा महाप्रसाद बनवतात.

उपयुक्त माहिती:

  • खामगाव येथून २३ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ३९ किमी अंतरावर
  • खामगाव येथून काळेगावपर्यंत एसटीची सुविधा
  • परिसरात निवासाची सुविधा आहे
  • संपर्क : ज्ञानदेव गायगोळ, अध्यक्ष, मो. ९९२२३१८६५८
  • एकनाथ बोचरे, उपाध्यक्ष, मो. ९९७०७५८२१८

कनीफनाथ मंदिर

कालेगांव, त. खामगांव, जिला. बुलढाणा

Back To Home