रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळी येथे असलेले प्राचीन श्री कनकादित्य सूर्यमंदिर हे देशातील काही मोजक्या व प्रसिद्ध सूर्यमंदिरांपैकी एक मानले जाते. माघ शुद्ध सप्तमी (रथसप्तमी) ते माघ शुद्ध एकादशीपर्यंत चालणारा येथील उत्सव रत्नागिरी जिल्ह्यातील मोठ्या उत्सवांपैकी एक समजला जातो. यावेळी कनकादित्याच्या भेटीसाठी आडिवरे येथील कालिकादेवीचे कशेळी येथे चार दिवसांसाठी आगमन होते. या देवाकडे केलेली मनोकामना एका वर्षाच्या आत पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मंदिराची अख्यायिका अशी की साधारणतः ८०० वर्षांपूर्वी गुजरातमधील सोमनाथनजीक प्रभासपट्टण येथील सूर्यमंदिरात १२ महिन्यांचे प्रतीक असलेल्या व वेगवेगळ्या आसनांवर स्थित १२ सूर्यमूर्ती होत्या. इ. स. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून गेला तेव्हा सूर्यमंदिरातील पुजाऱ्याने येथील मूर्तींची विटंबना होऊन नये यासाठी काठेवाडातील वेरावळ बंदरातून दक्षिणेकडे जाणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या जहाजावर एक सूर्यमूर्ती चढविली. तेथून निघाल्यावर जहाज कशेळी येथील समुद्र किनाऱ्यापाशी थांबले. अथक प्रयत्नांनंतरही ते जागचे हलत नव्हते. शेवटी जहाजावरील आदित्याच्या मूर्तीला येथेच वास्तव्य करण्याची इच्छा असावी, असे वाटल्याने व्यापाऱ्याने किनाऱ्यावरील गुहेत ती मूर्ती आणून ठेवली. त्यानंतरच त्याचे जहाज पुढे गेले.
काही दिवसांनंतर कशेळी येथील कनका नावाच्या सूर्योपासक महिलेला सूर्यदेवाने स्वप्नदृष्टांत देऊन ‘आपण समुद्रकिनाऱ्यावरील गुहेत आहोत, गावात मंदिर बांधून त्यात माझी स्थापना कर’, असे सांगितले. ग्रामस्थांना सोबत घेऊन कनकाने स्वप्नदृष्टांतानुसार समुद्रकिनारी शोध घेतला असता त्यांना तेथील कड्यावरील गुहेत सूर्यमूर्ती सापडली. त्यानंतर कनकाबाईने ग्रामस्थांच्या सहकार्याने मंदिर बांधून त्यामध्ये सूर्यमूर्तीची स्थापना केली. कनकाच्या भक्तीमुळे देव कशेळीत आला म्हणून या मंदिराला कनकादित्य असे नाव पडले. कशेळीच्या समुद्र किनाऱ्यावरील कड्यावर असलेल्या ज्या गुहेत ही मूर्ती सापडली त्या गुहेला देवाची खोली असे म्हणतात. ही गुहा सुमारे १५ फूट उंचीवर असून तिचा आकार ४०० चौरस फूट आहे. आजही ती गुहा भाविकांना पाहता येते.
कशेळी गावाच्या मध्यवर्ती भागात जांभ्या दगडातील व कौलारू बांधकामाचे कनकादित्य मंदिर आहे. मंदिराभोवती तटबंदी असून त्यातील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. दुमजली प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या मजल्यावर नगारखाना आहे. मंदिराच्या संपूर्ण प्रांगणात जांभ्या दगडाची फरसबंदी आहे, त्यामुळे मंदिर परिसर सुंदर व स्वच्छ भासतो. येथे मुख्य मंदिरासह गणपती, श्रीआर्यादुर्गा, श्रीशंकर व श्रीविष्णू यांची मंदिरे आहेत. याशिवाय जुन्या पद्धतीची विहीरही आहे. याच विहिरीचे पाणी येथील पूजाविधीसाठी वापरले जाते.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी कनकादित्य मंदिराची रचना आहे. जमिनीपासून काहीशा उंच जोत्यावर मंदिराचे बांधकाम आहे. पाच ते सहा पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपातील लाकडी खांबांवर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम व वेलबुट्टी कोरलेली दिसते. प्रत्येक दोन खांब हे कमानीने एकमेकांशी जोडलेले आहेत. अंतराळातील छतावर विविध देवी–देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. त्यात समुद्रमंथनासारखे विविध पौराणिक प्रसंगही कोरलेले आहेत. येथे असलेल्या अग्निनारायणाच्या मूर्तीला सात हात, तीन पाय आणि दोन मुखे आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारपट्टीच्या वरील भागात शेषशायी विष्णूचे लाकडी शिल्प आहे. विष्णूच्या शेजारी गरुड आणि लक्ष्मी आहेत. दरवाजाच्या दोन्ही बाजूला द्वारपालांची शिल्पे आहेत.
गर्भगृहात सूर्यदेवाची म्हणजेच कनकादित्याची काळ्या पाषाणातील सुमारे एक मीटर उंचीची मूर्ती आहे. प्रमाणबद्ध, घोटीव आणि चकचकीत अशी ही मूर्ती अनेक वस्त्रालंकारांनी झाकलेली असली तरी तिचे पूर्णरूप हे काकड आरतीच्या वेळी पाहायला मिळते. ही मूर्ती स्थानक समभंग म्हणजेच दोन्ही पायांवर समान भार देऊन उभी आहे. माथ्यावर मुकुट, चांदीचे डोळे, कानात मकरकुंडले, गळ्यात दागिना, डाव्या खांद्यावर रुळणारे जाड यज्ञोपवीत (जानवे), कमरेत पट्टा, पायांतील बोटांत अंगठ्या परिधान केलेली अशी ही मूर्ती आहे. मूर्तीच्या पादपीठावर सात घोड्यांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. डाव्या व उजव्या बाजूला चामरधारी स्त्री प्रतिमा उषा–प्रत्युषा आहेत. मूर्तीच्या मागे चांदीची प्रभावळ आहे.
कनकादित्य मंदिरात वर्षातून दोन उत्सव होतात. माघ शुद्ध सप्तमी ते माघ शुद्ध एकादशी असे पाच दिवस रथसप्तमीचा उत्सव साजरा केला जातो. त्यासाठी येथून जवळच असलेल्या आडिवरे येथील कालिकादेवीला खास आमंत्रण असते. तिची पाठराखीण म्हणून आडिवरे येथील भगवती देवीही येथे येते. यावेळी कालिकादेवीचा मुखवटा कनकादित्याच्या शेजारी ठेवला जातो. या उत्सवासाठी महाराष्ट्रासह बेळगाव, हुबळी, धारवाड, उज्जैन, भोपाळ, इंदूर, येथून हजारो भाविक येतात. असे सांगितले जाते की मुंबईचे शिल्पकार अशी ओळख असलेले नाना शंकरशेट यांनी पुत्र व्हावा, यासाठी या देवाकडे नवस केला होता. पुत्रप्राप्तीनंतर त्यांनी मंदिरातील सभामंडप बांधून दिला, तसेच कळसावरील तांब्याचा पत्राही मंदिराला भेट म्हणून दिला होता.
ऐतिहासिक नोंदींनुसार, कनकादित्य मंदिराचे पुजारी गोविंद भट भागवत यांची कीर्ती ऐकून पन्हाळगडचा शिलाहार राजा येथे संक्रांतीच्या पर्वकाळी समुद्रस्नानासाठी आला होता. गावात दररोज १२ ब्राह्मणांना भोजन देण्यासाठी येणाऱ्या खर्चाकरिता त्याने भागवतांना एक गाव इनाम म्हणून दिल्याचे वर्णन असलेला ताम्रपट मंदिरात होता. ७५० ते ८०० वर्षांपूर्वीचा, तीन ताम्रपृष्ठांचा हा ताम्रपट सध्या सुरक्षिततेच्या कारणास्तव बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आलेला आहे.