भारतीय संस्कृतीमध्ये शिव आणि शक्ती या दोन तत्त्वांना सृष्टीच्या उत्पत्तीचे आणि संचालनाचे मूळ मानले गेले आहे. जिथे शिवाचा वास तिथे शक्तीचा अधिवास असतो, हा नियम देशातील तीर्थक्षेत्रांच्या रचनेत प्रकर्षाने दिसून येतो. याच पंक्तीतील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथ या प्रभू वैजनाथाच्या क्षेत्रात, शिव आणि शक्तीच्या अद्वैताचे प्रतीक असलेले कालरात्री देवी मंदिर हे एक जागृत आणि महत्त्वपूर्ण शक्तिपीठ मानले जाते. ही देवी वैजनाथाची बहीण असल्याची मान्यता आहे. येथील अर्धनारीनटेश्वर स्वरूपातील देवीची मूर्ती, दसऱ्याला होणारा भाऊ-बहिणीचा अनोखा भेट सोहळा आणि मानसिक व्याधींवर उपचार म्हणून ‘रात्रीसूक्त’ पठणाची परंपरा, ही या मंदिराची वैशिष्ट्ये आहेत.
नवदुर्गापैकी सातवी दुर्गा म्हणजे कालरात्री देवी होय. चैत्र व अश्विन नवरात्रातील सातवा दिवस या देवीच्या पूजनाचा महत्त्वाचा दिवस मानला जातो. ‘काल’ म्हणजे वेळ किंवा मृत्यू आणि ‘रात्री’ म्हणजे अंधकार. अज्ञान, अंधकार आणि दुष्ट प्रवृत्तींचा नाश करणारी ती कालरात्री, अशी या नावाची अर्थफोड होते. वाराणसी येथे या देवीचे जगप्रसिद्ध मंदिर आहे, तर दुसरे मोठे मंदिर दक्षिण भारतात कांचीपुरम येथे आहे. परळी हे ज्योतिर्लिंग क्षेत्र असल्याने, येथे शिवाला ‘महाकाल’ मानले जाते आणि त्याची शक्ती ही महाकाली किंवा कालरात्री स्वरूपात असल्याची मान्यता आहे. देवीचे येथील मंदिर परळी वैजनाथ मंदिरास समकालीन आहे. ते यादव काळातील म्हणजेच सुमारे बाराव्या ते तेराव्या शतकातील असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
या मंदिराबाबत आख्यायिका अशी की देव आणि दानवांनी मिळून केलेल्या समुद्रमंथनातून अमृताचा घट निघाला. तो घट दानवांच्या हाती पडू नये म्हणून वैजनाथाने घट घेऊन परळीच्या दिशेने पलायन केले. तेव्हा वैजनाथाची बहीण कालरात्री देवीने आपल्या भावाला मदत करण्यासाठी त्याला आपल्या पाठीमागे लपवले. त्यामुळेच येथील मूर्तीत पुढून पाहिले असता देवीचे रूप व मागून पाहिल्यास शिवपिंडी दिसते.
देवीबाबत दुसरी आख्यायिका अशी की प्राचीन काळी महाकोसल देशाचा राजा विश्वपती हा तेथील राज्यकारभार पाहत होता. त्या राजाचा मुलगा, जो राज्याचा वारस होता, त्याला अचानक एक विचित्र मानसिक आजार जडला. त्याला सतत भ्रम होऊ लागले. त्याला कसलीही शुद्ध राहिली नव्हती. राजवैद्य आणि मांत्रिकांकडून अनेक उपाय करण्यात आले, परंतु त्याचा हा आजार बरा होत नव्हता. त्यातच राजाला एके दिवशी परळी क्षेत्रातील कालरात्री देवीचा महिमा समजला. तो आपल्या मुलाला घेऊन परळीत आला. त्याने कालरात्री देवीचे कठोर अनुष्ठान सुरू केले.
वेदांमधील ‘रात्रीसूक्त’चा पाठ आणि देवीची उपासना यामुळे चमत्कार घडला व त्याच्या मुलाचा आजार पूर्णपणे बरा होऊन त्याला पुन्हा आपली बुद्धी व स्मृती प्राप्त झाली. तेव्हापासून अशी श्रद्धा रूढ आहे की या मंदिरात रात्रीसूक्ताचे पठण केल्यास मानसिक त्रासांपासून मुक्ती मिळते.
कालरात्री देवी मंदिराभोवती पाषाणी बांधणीची सुमारे वीस फूट उंच भक्कम तटबंदी आहे. या तटबंदीतील दुमजली प्रवेशद्वाराच्या आत पहारेकरी कक्ष व वरील मजल्यावर नगारखाना आहे. प्रांगणात तटबंदीला लागून दुमजली इमारती आहेत. त्यात भक्तनिवास व सेवेकऱ्यांची निवासस्थाने आहेत. इमारतींना लागून बाह्यबाजूने वरील मजल्यावर जाण्यासाठी जिना आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर दोन्ही बाजूला प्राचीन पाषाणी चौथरे व त्यावर निमूळते होत जाणारे दीपस्तंभ आहेत. यापैकी एका चौथऱ्यावर शिवपिंडी व दुसऱ्यावर काही स्थानिक देवतांचे पाषाण आहेत. सभामंडपास उजव्या व डाव्या बाजूच्या भिंतीत आणखी दोन दरवाजे आहेत. सभामंडपाचे प्रवेशद्वार प्रांगणापेक्षा किंचितसे उंच आहे. दगडी फरसबंदी असलेल्या येथील सभामंडपात मध्यभागी यज्ञकुंड व भिंतींमध्ये अनेक देवकोष्ठके आहेत. त्यातील एका देवकोष्ठकात आश्वारूढ खंडोबा-म्हाळसा यांचे शिल्प आहे. भिंतीवर लाकडी तुळईवर दोन्ही बाजूला पत्र्याचे उतरते छत आहे.
पुढे सभामंडपापेक्षा उंचावर अंतराळ आहे. या अंतराळाच्या प्रवेशद्वारास तीन पायऱ्या आहेत. पहिल्या पायरीवर कोरीव चंद्रशिळा आहे. प्रवेशद्वारात द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर इष्टशिल्प आहे. प्रवेशद्वारावर महिरपी तोरण आहे. अंतराळात पिठा-मिठाच्या परड्या ठेवल्या आहेत. देवीच्या दर्शनाला येणारे भाविक या परड्यांमध्ये पीठ, मीठ, धान्य, मिरची, मसाले असे जिन्नस वाहतात. अंतराळात चारही कोपऱ्यांत कोनछत्र रचना आहे. त्यावर घुमटाकार छत आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीत, प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला असलेल्या देवकोष्ठकात शेषशयनी विष्णूचे शिल्प आहे. विष्णूच्या पायाजवळ लक्ष्मी आहे, तर नाभीकमळावर ब्रह्मदेव आहे. विष्णूचा एक हात डोक्याखाली आहे. वरील दोन हातांत शंख व चक्र आहे. चौथा हात अभय मुद्रेत आहे.
अंतराळातून बाहेर पडण्यासाठी उजव्या व डाव्या बाजूला दरवाजे आहेत. अंतराळापुढे गर्भगृह आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार अंतराळापेक्षा काहीसे उंचावर आहे. द्वारशाखा व ललाटपट्टीवरील नक्षी काहीशी अस्पष्ट झालेली आहे. गर्भगृहात वज्रपीठावर तांदळास्वरूपातील मूर्ती आहे. मूर्तीचा पुढील भाग देवीचे मुख आहे,
तर मागील भाग शिवपिंडी आहे. साधारणतः देवीची मंदिरे ही स्त्रीरुपात असतात. परंतु परळीची कालरात्री देवी ही अर्धनारीनटेश्वर स्वरूपात आहे. हे रूप शिव आणि शक्तीच्या अद्वैताचे प्रतीक मानले जाते. कालरात्री देवीने आपल्या मागे वैजनाथाला लपवले असल्याने मूर्तीचे असे स्वरूप असल्याचे सांगितले जाते. वस्त्रे व अलंकार ल्यालेल्या या देवीचे नेत्र, जिव्हा व बिंदी चांदीची आहे. मूर्तीच्या वर छताला अभिषेकपात्र टांगलेले आहे.
गर्भगृहात वज्रपीठामागे उजव्या बाजूच्या देवकोष्ठकात लाकडी पाटावर देवीच्या शक्तीची तांदळा स्वरूपातील मूर्ती आहे. या मूर्तीच्या बाजूला अष्टभुजा देवीची पितळी मूर्ती आहे. मंदिराच्या मागे दर्शनी भिंतीत, मंडोवरावर युद्धशिल्प कोरलेले आहे. अंतराळाच्या छतावर वर्तुळाकार शिखर आहे. या शिखराच्या शीर्षभागी स्तूपिका आहे. गर्भगृहाच्या छतावर चौकोनी शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी आमलक व कळस आहे.
शारदीय नवरात्री हा येथील मुख्य वार्षिक उत्सव होय. सलग दहा दिवस मंदिरात आरादी, गोंधळी, वाघ्या-मुरळी, परडीवाले यांचे नृत्य-गायनाचे कार्यक्रम चालतात. अष्टमीच्या रात्री मंदिरात यज्ञाचे आयोजन केले जाते. यावेळी देवीचा छबीना काढला जातो. जागरण, गोंधळ, आरती, स्तोत्रगायन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दसऱ्याला वैजनाथ पालखीत बसून देवीच्या भेटीला येतात. वैजनाथातर्फे देवीस साडी-चोळीचा आहेर देऊन खणानारळाची ओटी भरली जाते. मग देवी पालखीत बसून वैजनाथाच्या पालखीमागे सीमोल्लंघनाला निघते. परिसरातील बटूभैरव मंदिराला प्रदक्षिणा घालून दोन्ही पालख्या वैजनाथ मंदिरास प्रदक्षिणा करतात. त्यानंतर देवीची पालखी ग्रामप्रदक्षिणा करून मंदिरात परत येते.
दसऱ्याला शहरातील सर्व नागरिक दसरा मैदानात जमतात. येथे वैजनाथ व देवीची पालखी येते. नागरिकांचा सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो. पालख्या मंदिरात परत गेल्यानंतर नागरिक आपापल्या घरी परततात. दसरा ते पौर्णिमा हा देवीचा शयनकाळ असतो. कोजागिरी पौर्णिमेला देवीचा उत्सव साजरा केला जातो. चैत्र नवरात्री हा येथील दुसरा मोठा उत्सव आहे. या वेळीही दहा दिवस धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मंगळवार, शुक्रवार, अष्टमी, पौर्णिमा, अमावस्या इत्यादी दिवशी मंदिरात भाविकांची गर्दी असते. या मंदिराचे व्यवस्थापन वैजनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे केले जाते.