कल्लोल काली मंदिर

बांगूर नगर, गोरेगाव पश्चिम, मुंबई

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथील बांगूर नगर भागात कल्लोल काली माता मंदिर वसलेले आहे. मुंबईत स्थायिक झालेल्या बंगाली नागरिकांना एकत्र आणणाऱ्या आणि त्यांच्या सांस्कृतिक परंपरांचे जतन करणाऱ्या ‘कल्लोल सोशल अँड कल्चरल ऑर्गनायझेशन’ या संस्थेतर्फे या मंदिराची उभारणी करण्यात आली. त्यामुळे मंदिरास कल्लोल काली मंदिर असे नाव देण्यात आले. या संस्थेतर्फे १९६८ पासून या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गापूजेची सुरुवात करण्यात आली. प्रारंभी तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या सार्वजनिक मंडपामध्ये दर अमावस्येस कालीपूजा आयोजित केली जात असे. पुढे संस्थेची व्याप्ती वाढत गेली आणि या समुदायाला एका स्थायी आणि हक्काच्या मंदिराची गरज भासू लागली. या गरजेतूनच या कल्लोल काली मंदिराची उभारणी झाली.

बंगाली भाषेत ‘कल्लोल’ म्हणजे तरंगध्वनी. महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्रात ‘सत्यकथा’ या मासिकाने आधुनिक साहित्यिक चळवळ सुरू केली. त्याच धर्तीवर बंगालमध्ये ‘कल्लोल’ या मासिकाने नवी प्रभावशाली सांस्कृतिक चळवळ सुरू केली. दिनेशरंजन दास आणि गोकुलचंद्र नाग यांनी सन १९२३ मध्ये हे सांस्कृतिक-साहित्यिक मासिक सुरू केले. विख्यात साहित्यिक काझी नझरूल इस्लाम, प्रेमेंद्र मित्र, बुद्धदेब बसू हे या चळवळीचे अध्वर्यू होते. याच चळवळीतून पुढे ‘उत्तरा’ (१९२५), ‘प्रगती’ (१९२६), ‘कालीकलम’ (१९२६), ‘पूर्बाशा’ (१९३२) अशी मासिके सुरू झाली. बंगाली साहित्याबरोबरच नाट्य, संगीत, चित्रकला आदी क्षेत्रांत आधुनिकतेचा प्रवाह आणण्याचे श्रेय या चळवळीस दिले जाते. साहित्यादी कलांमधील अभिजातता आणि रोमँटिसिझमला प्रतिक्रिया म्हणून सुरू झालेल्या या चळवळीने बंगालमधील कष्टकरी, नागरी समाजाच्या संघर्षाला केंद्रस्थानी आणले. मुंबईत स्थायिक झालेल्या बंगाली नागरिकांनी स्थापन केलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थेला याच चळवळीचे नाव देण्यात आले.

बंगाली संस्कृती, परंपरा यांचे जतन करण्याच्या दृष्टीने स्थापन झालेल्या या संस्थेतर्फे प्रारंभी येथे वसंतपंचमी, सरस्वतीपूजा, कालीपूजा असे विविध कार्यक्रम केले जात असत. येथे दर महिन्याच्या अमावस्येला सामुदायिक कालीपूजा केली जात असे. बंगाली समाजात काली मातेच्या उपासनेला अनन्यसाधारण ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. मध्ययुगीन काळात बंगालमध्ये तांत्रिक आणि शाक्त परंपरेचा मोठा प्रसार झाला. अठराव्या शतकात राजा कृष्णचंद्र आणि इतर स्थानिक राज्यकर्त्यांनी कालीपूजेला व्यापक सामाजिक स्वरूप दिले. रामप्रसाद सेन आणि रामकृष्ण परमहंस यांसारख्या संतांनी काली मातेचे रूप बंगाली जनमानसात अत्यंत साध्या आणि घरगुती स्वरूपात रुजवले. यामुळे आजही बंगाली समाजात प्रत्येक शुभ कार्यात आणि वार्षिक उत्सवात कालीपूजेला सर्वोच्च स्थान दिले जाते.

प्राचीन ग्रंथ आणि पुराणांमध्ये देवी कालीच्या रौद्र आणि कल्याणकारी रूपाचे अनेक उल्लेख आढळतात. विशेषतः मार्कंडेय पुराणातील ‘देवी माहात्म्य’ म्हणजेच ‘दुर्गा सप्तशती’ या ग्रंथात देवीच्या उत्पत्तीची आणि तिच्या पराक्रमाची सविस्तर माहिती दिलेली आहे. या ग्रंथानुसार, मूळ प्रकृती आदिमाया भगवती महालक्ष्मीने तमोगुण आणि सत्त्वगुणांपासून महाकाली आणि महासरस्वती ही दोन रूपे निर्माण केली. महाकाली ही जशी संहारिणी आहे, तशीच ती विश्वजननी व पोषिणीही आहे, असे मानले जाते. ‘कालिका पुराण’ आणि ‘महानिर्वाण तंत्र’ यांसारख्या तंत्रग्रंथांमध्ये कालीपूजेचे विधी, तिचे ध्यान आणि तिचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट केले आहे. शाक्त आणि तंत्रमार्ग या जादूटोणा आणि मंत्र-तंत्राला महत्त्व असलेल्या वाममार्गी पंथातही कालीपूजेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. बंगालची या विद्यांसाठी विशेष ख्याती असल्याचे सांगितले जाते.

बांगूर नगर येथील मध्यवर्ती परिसरात देवीचे हे मंदिर स्थित आहे. मंदिराभोवती असलेल्या तटबंदीमधील प्रवेशद्वारातून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. बंगाली परंपरेत या सभामंडपाला ‘नाटमंदिर’ असे म्हणतात. या सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी बाके ठेवलेली आहेत. त्यापुढे तीन पायऱ्या चढून मंदिराच्या अंतराळात प्रवेश होतो. या अंतराळात भाविक आणि दर्शनासाठी येणाऱ्या लोकांच्या गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी दर्शनरांगेची शिस्तबद्ध व्यवस्था केलेली आहे. त्यापुढे मंदिराचे गर्भगृह आहे. या गर्भगृहात माता कालीची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आलेली आहे. एक अखंड काळ्या पाषाणापासून घडवलेली ही मूर्ती पारंपरिक दक्षिणाकालीच्या रूपात आहे. माता कालीच्या चरणांशी भगवान शिव झोपलेल्या मुद्रेत विराजमान आहेत.

कल्लोल संस्थेद्वारे आयोजित केली जाणारी दुर्गापूजा ही संपूर्ण पश्चिम मुंबईत अत्यंत प्रसिद्ध आहे. आश्विन महिन्यातील महाषष्ठीपासून ते विजयादशमीपर्यंत चालणाऱ्या या पाच दिवसीय महोत्सवात धार्मिक विधींसोबतच सांस्कृतिक, सामाजिक आणि वाङ्मयीन कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते. या उत्सवासाठी दरवर्षी विशेष कारागीर बोलावून मातीची पारंपरिक ‘एकचला’ पद्धतीची म्हणजेच एकाच चौकटीत सर्व देवता असणारी मूर्ती तयार करून घेतली जाते. पूजा मंडपाची रचना दरवर्षी वेगवेगळ्या सामाजिक, पर्यावरणपूरक किंवा ऐतिहासिक संकल्पनांवर आधारित असते. (या पाच दिवसांत होणारी महाआरती, ‘धुनुचि’ या पश्चिम बंगालमधील पारंपरिक धार्मिक नृत्यप्रकाराची स्पर्धा आणि संथ सुरातील ‘चंडीपाठ’ यांचे वेळापत्रक संस्थेच्या संकेतस्थळावर त्या-त्या वेळी प्रसिद्ध केले जाते.)

दुर्गापूजेव्यतिरिक्त दिवाळीच्या दिवशी साजरी केली जाणारी कालीपूजा हा या मंदिराचा सर्वात महत्त्वाचा आणि मूळ उत्सव आहे. कार्तिक अमावस्येच्या रात्री येथे तांत्रिक आणि वैदिक धार्मिक नियमांचे पालन करून महानिशापूजा केली जाते. या पूजेला मध्यरात्री सुरुवात होते आणि ती पहाटेपर्यंत चालते. या पूजेच्या वेळी हजारो भाविक रात्रभर जागे राहून उपवास करतात. याशिवाय वसंतपंचमीला होणारी सरस्वतीपूजा ही प्रामुख्याने लहान मुलांच्या पहिल्या अक्षरांच्या ओळखीसाठी म्हणजेच ‘हाते खोडी’ विधीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तसेच, ‘पोइला बैशाख’ हे बंगाली नववर्ष, महाशिवरात्री आणि लक्ष्मीपूजनाचे कार्यक्रमही येथे मोठ्या उत्साहात साजरे करण्याची परंपरा आहे. या मंदिरात भाविकांना बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी सकाळी सहा ते दुपारी साडेबारा व सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत दर्शन घेता येते. मंगळवार, शनिवार आणि रविवारी दर्शनाची वेळ सकाळी सहा ते दुपारी एक व सायंकाळी पाच ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत अशी असते.

‘कल्लोल सोशल अँड कल्चरल ऑर्गनायझेशन’ ही संस्था वर्षभर विविध सेवाभावी उपक्रम राबवते. संस्थेद्वारे एक सुसज्ज धर्मादाय दवाखाना चालवला जातो. येथे स्थानिक गरीब, कष्टकरी आणि गरजू रुग्णांना अल्प दरात किंवा मोफत वैद्यकीय सल्ला, प्राथमिक उपचार आणि आवश्यक औषधे दिली जातात. शिक्षण क्षेत्रातही या संस्थेचे मोठे योगदान आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच प्राथमिक शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे नियमित वाटप केले जाते. नवीन पिढीला आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडून ठेवण्यासाठी मंदिरात हिंदुस्तानी आणि बंगाली शास्त्रीय संगीत, पारंपरिक नृत्य, वादन आणि चित्रकला यांचे रीतसर प्रशिक्षण वर्ग माफक शुल्कात चालवले जातात.

उपयुक्त माहिती

  • गोरेगाव रेल्वे स्थानकापासून ४ किमी अंतरावर
  • बोरिवली एस.टी. बसस्थानकापासून १२ किमी अंतरावर
  • मुंबईतील अनेक भागांतून येथे येण्यासाठी बेस्ट बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ८६५५८५२९१७/१६/१५

कल्लोल काली मंदिर

बांगुर नगर, गोरेगांव पश्चिम, मुंबई

Back To Home