छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड–चाळीसगाव रस्त्यावरील उपला येथे तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या कालिका मातेचे मंदिर आहे. या मंदिराला ‘कालिमठ’ असेही म्हणतात. निद्रिस्त शंकराच्या अंगावर उभी असलेल्या कालिका मातेची भारतात केवळ तीन मंदिरे आहेत. त्यापैकी एक असलेल्या या मंदिराची स्थापना स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज यांनी १० एप्रिल १९८८ रोजी केली. नियोजनबद्ध बांधणी केलेले हे मंदिर आधुनिक स्थापत्यशास्त्राचा सुंदर नमुना आहे. मंदिराच्या प्रत्येक बांधकामाची बांधणी नऊच्या पटीत आहे, हे येथील वैशिष्ट्य आहे.
मंदिरातील कालिका मातेच्या हातात रक्तबीज नावाच्या राक्षसाचे शिर आहे. याबाबतची आख्यायिका अशी की रक्तबीज नावाच्या दैत्याने घोर तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले होते.ज्या ज्या ठिकाणी माझे रक्त सांडेल, त्या त्या ठिकाणी माझ्यासारखेच शक्तिशाली दैत्य उत्पन्न होतील, असा वर त्याने मागून घेतला होता. हा वर मिळाल्यावर मातलेल्या रक्तबीज राक्षसाने तिन्ही लोकांमध्ये धुमाकूळ घातला. अनेक देव–देवतांनी त्याला पराभूत करण्याचा प्रयत्न केला. मात्र शंकराकडून मिळालेल्या वरामुळे ते शक्य होत नव्हते. या दैत्याने इंद्रदेवालाही पराभूत केले. त्याच्या कृत्यांपुढे हतबल झालेल्या सर्व देव–देवतांनी त्याचा अंत करण्यासाठी दुर्गामातेला साकडे घातले.
सर्व देवांच्या विनंतीवरून दुर्गादेवीने रक्तबीज दैत्याशी युद्ध केले. मात्र देवीने आपल्या शस्त्रांनी त्याच्यावर वार केल्यानंतर जमिनीवर सांडलेल्या त्याच्या रक्तातून त्याच्यासारखेच असुर उत्पन्न होत होते. अनेक दिवस युद्ध केल्यानंतरही त्याचा वध होत नसल्याने दुर्गादेवीने पार्वतीकडे मदत मागितली. दुर्गादेवी पार्वतीला म्हणाली की मी वार केल्यानंतर रक्तबीज दैत्याचे रक्त अशा प्रकारे प्यावेस की त्या रक्ताचा एकही थेंब भूमीवर पडू नये. त्याचा अंत करण्यासाठी हा एकमेव उपाय आहे.
दुर्गादेवीच्या सांगण्यानुसार पार्वती कालिका मातेचा अवतार घेऊन तिच्यासोबत युद्धभूमीवर निघाली. दुर्गामातेने रक्तबीज दैत्यावर वार करताच बाहेर पडणारे त्याचे रक्त ती प्राशन करू लागली. त्यामुळे हळूहळू रक्तबीज दैत्य अशक्त होऊ लागला. हीच संधी साधून दुर्गामातेने त्याचा शिरच्छेद केला. त्यानंतर दुर्गादेवीने त्याचे शिर कालिका मातेला समर्पित केले.
रक्तबीज राक्षसाचा वध झाल्यानंतरही कालिका माता शांत होत नव्हती. तिला आणखी राक्षसांचा संहार करून त्यांचे रक्त प्राशन करायचे होते. तिला समजावण्याचे अनेक प्रयत्न फोल ठरले. त्यामुळे चिंताग्रस्त झालेले देव महादेवाकडे गेले. महादेव देवीचा क्रोध शांत करण्यासाठी गेले. मात्र त्यांचेही प्रयत्न अपयशी ठरले. तिचे डोळे लाल झाले होते. रस्त्यात दिसेल त्या दैत्याचा वध करून त्यांचे रक्त ती प्राशन करत होती. अखेर तिला शांत करण्यासाठी महादेव ती जात असलेल्या मार्गावर झोपले.
त्याचवेळी देवीचा पाय त्यांच्या शरीरावर पडला. साक्षात महादेव आपल्या पायाखाली असल्याचे दिसल्यावर तिची जीभ बाहेर आली. त्यामुळेच या मंदिरात तिच्या हातात रक्तबीज दैत्याचे शीर असून तिच्या पायाखाली निद्रिस्त महादेव आहेत.
उपला गावात देवीचे हे मंदिर उभारणाऱ्या स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराजांबाबत एक कथा सांगितली जाते. कोलकाता येथे २ ऑक्टोबर १९४१ रोजी जन्मलेल्या स्वामी प्रणवानंद यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. चळवळीनिमित्त ते अनेकदा घराबाहेर असत. स्वामी तीन महिन्यांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर स्वामींच्या काकूंनी त्यांचा सांभाळ केला. मात्र माझी आई कुठे आहे, अशी पृच्छा ते नेहमी वडिलांकडे करत. अखेर एके दिवशी त्यांच्या वडिलांनी त्यांना कालिका मातेच्या मंदिरात नेऊन, ‘ही तुझी आई’, असे सांगितले. तेव्हापासून स्वामींना दुर्गापूजेचे वेड लागले. शिकत असतानाही ते देवीची नित्यनेमाने सेवा करीत. पुढे ते अभियंते झाले. लहानपणापासून त्यांचे वाचन अफाट होते. त्यांच्यावर रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांचाही पगडा होता. त्यांची अनेक पुस्तकेही स्वामींनी वाचली होती.
एके दिवशी स्वामींच्या घरी एक संन्याशी आले. त्यांचे आचारविचार व बोलणे ऐकून स्वामींनाही आपण संन्यास घ्यावा, असे वाटू लागले. याच विचारामुळे त्यांचे मन नोकरीत रमेनासे झाले. अखेर त्यांनी १९६६ मध्ये नोकरी सोडली आणि विशुद्धानंद स्वामींची भेट घेतली. विशुद्धानंद स्वामींनी त्यांना योगामार्फत अध्यात्म कसे साधावे, याबाबत मार्गदर्शन केले. मात्र संन्यास घ्यावा, ही स्वामींची इच्छा कायम असल्याने विशुद्धानंद स्वामींनी त्यांना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी येथे जाऊन मुक्तानंद स्वामींची भेट घेण्यास सांगितले. त्यानुसार गणेशपुरीला आल्यावर मुक्तानंद स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी १० सप्टेंबर १९६७ रोजी संन्यास घेतला.
१९६८ मध्ये ते पाटनादेवी येथे आले. पाटनादेवी येथे त्यांनी सुमारे १९ वर्षे देवीची उपासना केली. १९८० मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी कालिका मातेने त्यांना दर्शन दिले व सांगितले की ११ वर्षांत माझे मंदिर बांध. मी तेथे जागृतावस्थेत वास करेन. तेव्हापासून त्यांनी देवीच्या मंदिरासाठी जागा शोधण्यास सुरुवात केली. अखेर उपला येथील ही जागा त्यांना पसंत पडली. ही १३ एकर १८ गुंठे जागा विकत घेऊन त्यांनी येथे देवीचे मंदिर उभारण्यास सुरुवात केली. ग्रामस्थांनीही श्रमदान करून मंदिर उभारण्यास हातभार लावला. १० एप्रिल १९८८ रोजी मंदिरात देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
नऊ या संख्येला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे. त्यामुळे या मंदिराच्या प्रत्येक बांधकामाची बांधणी ही नऊच्या पटीत आहे. ८१ फूट उंची असलेल्या या मंदिराला नऊ कळस आहेत. मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात. पहिल्या टप्प्यात नऊ पायऱ्या आहेत. तेथून दुसऱ्या टप्प्यातील पायऱ्यांपर्यंतचे अंतर नऊ फूट आहे. येथून नऊ पायऱ्या चढल्यावर उंबऱ्यापर्यंतचे अंतर नऊ फूट आहे. मंदिराला ५४ खांब आहेत. मंदिराचा सज्जा १८ फुटांचा आहे. सभामंडप ५४ बाय ५४ आकाराचा असून गर्भगृह २७ बाय २७ आकाराचे आहे.
या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कन्नड ते कालिमठ हे अंतरही नऊ किमी आहे. या मंदिरात देवीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर १५ फेब्रुवारी १९९१ रोजी स्वामी प्रणवानंद सरस्वती यांनी समाधी घेतली.
निसर्गसमृद्ध परिसरात व शांत वातावरणात हे मंदिर आहे. मंदिराच्या मागे अंबाडी व शिवना नद्यांचा संगम आहे. प्रवेशद्वारातून आत येताच समोर मोठे प्रांगण लागते. मंदिर परिसरात आमराई तसेच इतरही अनेक वृक्ष आहेत. मंदिराच्या मागील बाजूस स्वामी प्रणवानंद सरस्वती यांचे समाधी मंदिर आहे. त्याच्या मागील बाजूस स्वामींसाठी बांधण्यात आलेले निवासस्थान आहे. प्रांगणात स्वामी प्रणवानंद यांनी भक्तांसाठी उभारलेले भक्त निवास आहे. मंदिराच्या प्रांगणात भक्तांना बसण्यासाठी दगडी बाके आहेत. येथे होमहवन करण्यासाठी यज्ञशाळाही आहे.
सभामंडप, गर्भगृह आणि प्रदक्षिणा मार्ग असे या मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपात देव–देवतांच्या आरत्यांचे फलक आहेत. गर्भगृहासमोर एका चौथऱ्यावर गणेशाचे तसेच देवीचे टाक आणि पादुका आहेत.
गर्भगृहात काळ्या संगमरवरी दगडात साकारण्यात आलेली देवीची सहा फूट उंचीची मूर्ती आहे. देवीच्या वरच्या बाजूचा उजवीकडील हात वरदायिनी मुद्रेत, तर डावीकडील हातात तलवार आहे. खालच्या बाजूचा उजवीकडील हात कल्याणकारी मुद्रेत असून डावीकडील हातात रक्तबीज राक्षसाचे शीर आहे. देवीच्या पायाखाली निद्रिस्त मुद्रेतील महादेव आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूंना त्रिशूळ आहेत. मूर्तीच्या उजवीकडे स्वामी प्रणवानंद यांची, तर डावीकडे विठ्ठलाची मूर्ती आहे.
या मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या स्वामी प्रणवानंद यांच्या समाधी मंदिराच्या सभामंडपात देव–देवतांच्या प्रतिमा, स्वामी प्रणवानंद तसेच स्वामी नित्यानंद यांच्या प्रतिमा, देवीस्तुती तसेच आरत्यांचे फलक आहेत. समोर एका चौथऱ्यावर स्वामींची पांढऱ्या संगमरवरी दगडातील मूर्ती असून त्यामागील बाजूस देवीचे चित्र आहे. स्वामी प्रणवानंद यांची मूर्ती असलेल्या चौथऱ्याखालील भुयारात त्यांनी समाधी घेतली होती.
नवसाला पावणारी देवी, अशी कालिका मातेची ख्याती असल्याने छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिकसह राज्यातील विविध भागांतील भाविक तिच्या दर्शनासाठी येतात. येथे रोज नित्यनेमाने सकाळी साडेपाच वाजता अभिषेक, पूजा व आरती करण्यात येते. दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी सूर्यास्ताच्यावेळी महाआरती होते. केवळ पौर्णिमा आणि अमावस्येला भाविकांना गर्भगृहात प्रवेश दिला जातो. गुरुपौर्णिमा, महाशिवरात्री व नवरात्र काळात येथे मोठा उत्सव होतो. मंदिराच्या विश्वस्त मंडळाने मंदिरापासून जवळच स्वामी प्रणवानंद सरस्वती हायस्कूल सुरू केले आहे. विश्वस्त मंडळातर्फे दर वर्षी गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेतले जाते. शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटपही केले जाते. गुरुपौर्णिमेला गरीब महिलांना साड्यांचे वाटप करण्यात येते. स्वामी प्रणवानंद महाराजांच्या पुण्यतिथीदिनी (१५ फेब्रुवारी) मंदिर परिसरात रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.