कालिका माता मंदिर

अर्नाळा किल्ला, ता. वसई, जि. पालघर

पालघर जिल्ह्यातील वसई किल्ल्याच्या खालोखाल अतिशय बळकट समजल्या जाणाऱ्या अर्नाळा या जलदुर्गावर असलेले कालिका मातेचे पेशवेकालीन मंदिर हे जिल्ह्यातील प्राचीन मंदिरांपैकी एक प्रसिद्ध मंदिर आहे. वैतरणा नदीच्या मुखावर व किनाऱ्यापासून साधारणतः २५० मीटर आत समुद्रात बांधलेल्या जलदुर्गात वसलेली ही देवी तालुक्यातील कोळी बांधवांसह हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. जागृत व नवसाला पावणारी देवी, असा लौकिक असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक अर्नाळा किल्ल्यावर येतात.

मुघल, पोर्तुगीज, पेशवे आणि इंग्रज राजवटीतील अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला अर्नाळा किल्ला जलदुर्ग तसेच जंजिरे अर्नाळा म्हणूनही ओळखला जातो. गुजरातचा सुलतान महम्मद बेगडा याने इ.स. १५१६ मध्ये अर्नाळा बेटावर हा गढीवजा किल्ला बांधला. इ.स. १५३० च्या सुमारास तो पोर्तुगीजांनी जिंकून घेतला. त्यावेळी आतील वास्तूंना घुमट व कमानी होत्या. पोर्तुगीजांनी त्या पाडून टाकल्या व ७०० मीटर लांबीचा व गोलाकार बुरुजांचा लंब चौकोनाकृती किल्ला बांधून त्यावर संरक्षणासाठी सैन्याची तुकडी ठेवली. चिमाजी अप्पांनी इ.स. १७३८ मध्ये वसईचा किल्ला जिंकून

घेतला. त्याआधी म्हणजे इ.स. १७३७ मध्ये साष्टी बेटावरील मराठ्यांच्या स्वारीच्या वेळी शंकराजी केशव याने हा अर्नाळा किल्ला पोर्तुगीजांकडून फारशी चकमक न होता जिंकून घेतला होता. शंकराजी केशवाने श्रीमंत चिमाजी अप्पा यांना १३ एप्रिल १७३७ रोजी पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की ‘कालि अर्नालियाहून आलों. अर्नाळा बहुत युक्तीनें जाऊन घेतलें.’ या किल्ल्याच्या उत्तरेकडील दरवाजावर एक मराठी शिलालेख आहे. त्यात हा किल्ला पहिला बाजीराव पेशवा याच्या कारकिर्दीत बाजी तुळाजी या दुर्गस्थापत्य विशारदाने शके १६५९ मध्ये (इ.स. १७३७) पुन्हा नव्याने बांधला, असा उल्लेख आहे. शंकराजी केशव याने बाजीराव बेलोसे व चिंतामण शिवदेव यांच्या हाताखाली तीन-चारशे माणसे ठेवून या किल्ल्यास बळकटी देण्याचे काम केले. याच्या बांधकामाचा मुहूर्त आगाशी येथील ज्योतिषी गिरधर जोशी यांनी काढून दिला होता. आकार आणि मजबुतीमध्ये उत्तर कोकणातील किल्ल्यांमध्ये याचा वसई किल्ल्याखालोखाल क्रमांक लागतो.

एका आख्यायिकेनुसार, या किल्ल्यासाठी खोदकाम सुरू असताना येथे कालिका आणि शीतला देवीच्या मूर्ती सापडल्या. त्याच सुमारास देवीने पेशव्यांच्या एका अधिकाऱ्याला दृष्टांत दिला की येथे माझे स्थान आहे. या स्थानावर माझे मंदिर बांधावे व येथून पुढे किल्ल्याचे बांधकाम करावे. त्यानुसार पेशव्यांनी इ.स. १७३७ मध्ये लहानसे कौलारू मंदिर बांधून त्यात देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. इ.स. १९७७ मध्ये येथील मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

विरार रेल्वे स्थानकापासून एसटी, महापालिका परिवहन बस किंवा रिक्षाने अर्नाळा येथे यावे लागते. तेथून फेरीबोटीतून अर्नाळा बेटावरील किल्ल्यात यावे लागते. समुद्रातील हे अंतर साधारणतः एक किमी आहे. ७०० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या किल्ल्याला तीन दरवाजे असून महादरवाजा उत्तराभिमुख आहे. पहिले बाजीराव पेशवे यांनी या दरवाजाचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख त्याच्या कमानीच्या मध्यभागी आहे. या कमानीवर आकर्षक नक्षीकाम असून दोन्ही बाजूंना सिंह व सोंडेत पुष्पमाला घेतलेले गजराज कोरलेले आहेत. या किल्ल्यात त्र्यंबकेश्वराचेही मंदिर आहे.

कालिका मातेच्या मंदिरासमोरील मोठ्या प्रांगणात पेव्हर ब्लॉकची फरसबंदी आहे. मंदिरासमोरील उंच चौथऱ्यावर देवीचे वाहन असलेल्या सिंहाच्या दोन मूर्ती आहेत व त्यामागे मोठा होमकुंड आहे. मंदिराबाहेर हनुमानाचे छोटे स्थान व बोटीच्या आकारातील तुळशी वृंदावन आहे. या हनुमानाच्या डोक्यावर सोनेरी मुकुट व त्याच्या तोंडावर मिशा आहेत. असे सांगितले जाते की या कालिका माता मंदिराचा पाया १९ फूट खोल आहे व तेथे गोड पाणी लागले होते. तीन मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह असे कालिका मातेच्या मंदिराचे स्वरूप आहे. पूर्व, उत्तर व दक्षिणेकडे या मंदिराला मुखमंडप आहेत. हे मुखमंडप खुल्या स्वरूपाचे असून त्यावर घुमटाकार छत आहेत.

येथील सभामंडपाच्या भिंतीवर विविध पौराणिक उठावचित्रे (म्युरल्स) आहेत. त्यामध्ये भवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असल्याचे चित्र गर्भगृहाच्या प्रवेशभिंतीवर आहे. याशिवाय रणांगणावर अर्जुनाला उपदेश करताना कृष्ण, एका होडीतून श्रीराम, लक्ष्मण व सीतेला पैलतिरी नेणारा नावाडी, राधा-कृष्ण व शेषशाही विष्णू आणि लक्ष्मी या उठावचित्रांचा समावेश आहे. सभामंडपाच्या छतावर कोरीव काम व कलाकुसर आहे. त्यात पहिल्या रांगेत गोलाकारामध्ये टिपऱ्या खेळणाऱ्या गोप-गोपिकांची चित्रे आहेत. दुसऱ्या रांगेत मंगलकलश व तिसऱ्या रांगेत गजराज आहेत. टोकावर मध्यभागी कमलपुष्प कोरलेले आहेत. गर्भगृहात एका वज्रपीठावर तीन महिरपींमध्ये मध्यभागी चांदीचा मुखवटा असलेल्या वस्त्रालंकारित कालिका मातेची मूर्ती आहे. कालिका मातेच्या उजव्या बाजूला गणपती व डाव्या बाजूला शितला देवीची मूर्ती आहे. या मंदिराजवळच एकवीरा देवीचेही स्थान आहे.

कालिका मातेच्या कृपेमुळे गावात भरभराट आली, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. येथे देवीची नित्यपूजा होते. या मंदिरात हनुमान जयंतीसह विविध उत्सव उत्साहात साजरे होतात. शारदीय नवरात्रोत्सव हा येथील सर्वात मोठा उत्सव आहे. नवरात्रोत्सवादरम्यान परिसराला जत्रेचे स्वरूप येते. या काळात ५० हजारांहून अधिक भाविक येथे दर्शनासाठी येतात. उत्सवादरम्यान मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते. परिसरात पूजा-प्रसादाची विक्री करणाऱ्या दुकानांसह अनेक दुकाने लागतात. या कालावधीत आरती, देवीचा गोंधळ, गरबा, अष्टमीच्या दिवशी होम आदी कार्यक्रम होतात. या उत्सवादरम्यान कोळी बांधव पूजेची थाळी अर्पण करून देवीची पूजा करतात. ठाणे जिल्हा गॅझेटियरमधील माहितीनुसार पेशवे काळापासून या मंदिराला ९१ रुपये (तत्कालीन ९.२ पौंड) वर्षासन मिळत असे. मात्र इ.स. १८८२ मधील या गॅझेटियरमध्ये, त्याचप्रमाणे मराठी विश्वकोशातही हे मंदिर भवानी मातेचे असल्याची नोंद आहे. तसेच या किल्ल्यात त्र्यंबकेश्वराचे मंदिर, तसेच शाहअली आणि हाजीअली या दोन मुस्लिम फकिरांचे दर्गे असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

उपयुक्त माहिती

  • विरारपासून अर्नाळा जेट्टी ९ किमी, तर वसईपासून १९ किमी अंतरावर
  • ठाणे व मुंबईतून अर्नाळा येथे येण्यासाठी एसटीची सुविधा
  • जेट्टीपासून अर्नाळा बेटावर जाण्यासाठी दर १० ते १५ मिनिटांनी बोट सेवा उपलब्ध
  • खासगी वाहने जेट्टीपर्यंत येऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home