कालिका देवी मंदिर

शिरूर कासार, ता. शिरूर कासार, जि. बीड

कालिका देवी ही शाक्तपंथीयांची प्रमुख देवता मानली जाते. ती तंत्रपंथाची आराध्य देवी असल्यामुळे तिला शक्ती व मृत्यूचे प्रतीक मानले जाते. करणी, मूठ, जारण आणि मारण यांची ही कारक देवता आहे. देवीचे रूप उग्र असले तरी ती भक्तांसाठी कनवाळू व कल्याणकारी आहे. कालिका मातेची देशभरात शेकडो मंदिरे असली, तरी त्यामध्ये काशी, कलकत्ता आणि उज्जैन येथील प्राचीन मंदिरे विशेष प्रसिद्ध आहेत. कालिका मातेचे असेच एक प्रसिद्ध मंदिर बीड जिल्ह्यातील शिरूर कासार या तालुक्याच्या ठिकाणी आहे. येथील हे जागृत स्थान नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

पौराणिक आख्यायिकांनुसार, कालिका हे महाकाली देवीचे स्वरूप आहे. ‘कालिका पुराणा’मध्ये महामायेच्या कुशीतून कालिका देवीचा जन्म झाला असा उल्लेख आढळतो. महाभारतातील संदर्भानुसार, कालिका ही दक्षप्रजापतीची कन्या व कश्यप ऋषींची पत्नी आहे. ‘देवी माहात्म्या’त असे म्हटले आहे की, मूळ प्रकृती आदिमाया भगवती महालक्ष्मीने तमोगुणांपासून महाकाली आणि सत्त्वगुणांपासून महासरस्वती ही दोन रूपे निर्माण केली. यानंतर महालक्ष्मीने महाकाली व महासरस्वती यांना आपापल्या गुणांनी योग्य अशा स्त्री-पुरुषांची एकेक जोडी उत्पन्न करण्यास सांगितले. त्यातून पुढे विश्वाची व सृष्टीची निर्मिती झाली. अशा प्रकारे महाकाली ही जशी संहारिणी आहे, तशीच ती विश्वजननी व विश्वपोषिणीदेखील आहे.

सिंधफणा नदीच्या तीरावर वसलेले हेमाडपंती स्थापत्यशैलीतील हे मंदिर सुमारे ९०० वर्षे प्राचीन आहे. हे मंदिर अकराव्या शतकातील यादवकालीन असल्याचे सांगितले जाते. मंदिराबाबत आख्यायिका अशी की प्राचीन काळी भाविकांच्या महाप्रसादासाठी लागणारी सोन्या-चांदीची भांडी सिंधफणा नदीपात्रातून वर येत असत. भाविक आपले कार्य उरकल्यावर ही भांडी पुन्हा नदीपात्रात सोडून देत; परंतु एकदा एका भाविकाकडून चूक घडली. त्याने नदीपात्रातून मिळालेला सोन्याचा डाव आपल्या घरी नेला आणि तेव्हापासून नदीतून भांडी निघणे बंद झाले.

मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर भव्य स्वागतकमान आहे. मंदिराभोवती असलेल्या भक्कम तटबंदीत समोर व मागील बाजूस अशी दोन प्रवेशद्वारे आहेत. दोन्ही प्रवेशद्वारे रस्त्यापेक्षा सुमारे आठ फूट उंचावर असल्यामुळे त्यांना पायऱ्या आहेत. प्रवेशद्वारास लाकडी द्वारशाखा व झडपा आहेत. मंदिराच्या फरसबंदी प्रांगणात तटबंदीलगत तुळशीवृंदावन उभारलेले आहे. मंदिरासमोर सुमारे पाच फूट उंच चौथऱ्यावर अष्टकोनी दीपमाळ आहे. प्रांगणात मंदिरासमोर एक यज्ञकुंड आहे.

प्रांगणात तटबंदीला लागून सेवेकऱ्यांची व पुजाऱ्यांची निवासस्थाने, देवस्थानचे कार्यालय, भक्त निवास, सांस्कृतिक कार्यासाठी व्यासपीठ व इतर वास्तू आहेत. प्रांगणात लोखंडी स्तंभांवर पत्र्याचे छत असल्याने भाविकांचे ऊन-पावसापासून संरक्षण होते. मंदिराच्या मागील बाजूस नदीतटावर नव्याने घाट बांधण्यात आला आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. मूळ हेमाडपंती दगडी बांधकाम असलेल्या गर्भगृहाला जोडून अंतराळ व सभामंडपाचे बांधकाम नव्याने करण्यात आले आहे. सभामंडपाचे व अंतराळाचे बांधकाम सिमेंट-काँक्रीट वापरून आधुनिक स्थापत्यशैलीत केलेले आहे.

सभामंडपाचे प्रवेशद्वार प्रांगणापेक्षा उंचावर असून येथे प्रवेशद्वारास पाच पायऱ्या आहेत. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपाभोवती गोलाकार स्तंभ आहेत. पुढे अंतराळ आहे, ज्याच्या डाव्या व उजव्या बाजूला प्रदक्षिणामार्गावर दरवाजे आहेत. अंतराळाच्या दर्शनी भिंतीवर काचेची मीनाकरी केलेली दिसते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर अंतराळात एका चौथऱ्यावर देवीचे वाहन असलेला पितळी सिंह आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास पर्णशाखा, पुष्पशाखा व स्तंभशाखा असून ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे. तोरणात शिखरशिल्पे आहेत. गर्भगृहात वज्रपीठावर कालिका देवीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती विराजमान आहे. विविध वस्त्रे व अलंकार ल्यालेल्या या देवीच्या डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. मूर्तीच्या मागील चांदीच्या प्रभावळीत व्यालतोरण व वर कीर्तिमुख आहे. प्रभावळीवर चांदीचे शंख, चक्र व धर्मध्वज आहेत. वज्रपीठाखाली भिंतीलगत देवीची मूळ शेंदूरचर्चित पाषाण मूर्ती आहे. अंतराळाच्या बाह्यबाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या मागील बाजूला बाह्यभिंतीत खाली व वर अशी दोन देवकोष्ठके आहेत. गर्भगृहाच्या शीर्षभागी पाच थरांचे अष्टकोनी शिखर असून त्याच्या प्रत्येक थरात आठ देवकोष्ठके व त्यात देवमूर्ती आहेत. शिखराच्या शीर्षभागी आमलक व कळस आहे.

शारदीय नवरात्री हा येथील मुख्य वार्षिक उत्सव आहे. यावेळी दहा दिवस व्रतस्थ राहणाऱ्या भाविकांच्या फराळाची सोय देवस्थानमार्फत केली जाते. मंदिरात फाल्गुन अमावस्येला ‘नव्याची अमावस्या’ साजरी केली जाते. यावेळी देवीला नव्या गव्हाच्या पोळ्या व गूळ अर्पण केला जातो. चैत्र अमावस्येला ‘जुन्याची अमावस्या’ साजरी केली जाते. चैत्र शुद्ध अष्टमी व दसऱ्याला देवीचे ‘सोंग’ काढले जाते. देवीचे पुजारी गिरी यांच्या निवासस्थानातून शेंदूर टिळक लावून आणि साडी नेसलेले भगत सोंगाच्या वाघावर स्वार होतात. सोबत वाघ्या-मुरळी, देवीचे मुरारी, भाविक आणि वादक नाचत-गात देवीचे सोंग शहरातील गांधी चौकापर्यंत आणतात. सोंग उत्सव पाहण्यासाठी जिल्ह्यातील शेकडो भाविक उपस्थित असतात. सोंग सवारीची परंपरा दीडशे वर्षांपासून सुरू असल्याचे येथील पुजारी सांगतात.

दसरा, चैत्र शुद्ध अष्टमी, फाल्गुन अमावस्या आणि चैत्र अमावस्या असे वर्षातून चार वेळा देवीचा पालखी सोहळा साजरा केला जातो. सर्व उत्सवांच्या वेळी राक्षसभवन येथून पवित्र तीर्थ आणून देवीचा अभिषेक केला जातो. मिरवणुकीत सनई-चौघडे, ताशा-रब्बानी, शिंगाडे आदी पारंपरिक वाद्ये वाजवली जातात. मिरवणुकीत दिवट्या व काकडे पेटवून राळ उधळली जाते. मंगळवार, शुक्रवार, अष्टमी, पौर्णिमा व अमावस्या आदी दिवशी मंदिरात भाविकांची विशेष गर्दी असते.

उपयुक्त माहिती:

  • शिरूर कासार बस स्थानकापासून १.५ किमी अंतरावर
  • बीड येथून ४१ किमी अंतरावर
  • बीड जिल्ह्यातील अनेक शहरांतून शिरूर कासारसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९९२२७७००९८

कालिका देवी मंदिर

शिरूर कसार, ताल. शिरूर कसार, जिला. बीड

Back To Home