काळंबादेवी मंदिर

नांदगाव-वेसवी, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात बाणकोट किल्ल्यापासून काही मिनिटांच्या अंतरावर नांदगाववेसवी येथील काळंबादेवीचे मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील वैशिष्ट्य असे की शिमगोत्सवात या देवीची पालखी रत्नागिरी जिल्ह्याची वेस ओलांडून, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर मंदिरात, आपला भाऊ काळभैरव याला भेटण्यासाठी जाते आणि दहाव्या दिवशी ती येथे परत येते. या पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी होतात. येथील कायस्थ आणि सोनारांची कुलदैवत असलेली ही देवी कोळी समाजाची पाठराखीण समजली जाते.

श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वरजवळील बागमांडला येथून फेरी बोटीने सावित्री नदी ओलांडून वेसवी जेट्टीवर येता येते. माणगावहून आंबेत पूलमंडणगड या रस्तामार्गानेही येथे येता येते. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वेसवी गावातून मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग आहे. या मार्गावर चढावानजीक दोन फाटे फुटतात. डावीकडील रस्ता दापोली, मंडणगडकडे, तर उजवीकडील रस्ता मंदिराकडे जातो. डोंगरातून नागमोडी रस्त्यावरून निसर्गसमृद्ध परिसर न्याहळत आपण काळंबादेवी मंदिरापर्यंत पोहचतो. प्रसिद्ध बाणकोट किल्ल्यापासून एक किमी अंतरावर हे मंदिर आहे. मंदिराचे आकर्षक शिखर लांबूनच नजरेस पडते.

असे सांगितले जाते की पूर्वी या देवीचे स्थान नजीकच्या हामदबा या ठिकाणी होते. तेथून ही देवी येथे आली. १८४२ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याची नोंद आहे. २०२० मध्ये झालेल्या जीर्णोद्धार नूतनीकरणात येथील पुरातन मूर्तींच्या जागी नवीन मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. येथील जुन्या मूर्ती मंदिराच्या मागील भागात जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. रस्त्यापासून काहीसे खाली हे दुमजली मंदिर आहे. खालच्या मजल्यावर धार्मिक विधींसाठी सभामंडप असून दुसऱ्या मजल्यावर हे मंदिर आहे. मंदिराच्या प्रांगणातून सुमारे २० पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावर असलेल्या मंदिराच्या दर्शनमंडपात प्रवेश होतो. दर्शनमंडप, सभामंडप गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. दर्शनमंडपात एका लहानशा चौथऱ्यावर कासवाची मूर्ती आहे. मंदिराचे प्रवेशद्वार लाकडी नक्षीदार असून द्वारपट्टीच्या ललाटबिंबावर श्रीगणेशाची मूर्ती आहे. येथील सभामंडप प्रशस्त आहे. या सभामंडपाच्या खिडक्यांमधून बाहेर पाहिले असता संपूर्ण बागमांडला जेट्टीपर्यंतचा समुद्र दिसतो.

येथील गर्भगृहात छोट्या चौथऱ्यावर महालक्ष्मी, बापदेव, काळंबादेवी, गावराखी, हरोबा, चांदविणकरीण आणि शेवराईकरीण अशा एकूण सात मूर्ती आहेत. सर्व मूर्ती काळ्या पाषाणातील आहेत. बापदेव हा देवीचा मालक असून हरोबा (हरिहरेश्वरचा काळभैरव) हा देवीचा भाऊ आणि इतर चौघी तिच्या बहिणी आहेत. बापदेव गावराखीच्या मध्ये असलेली काळंबादेवीची अश्वारूढ मूर्ती इतर मूर्तींपेक्षा थोडी उंच आहे. देवीच्या डोक्यावर मुकुट अंगावर अनेक अलंकार आहेत. काळ्या पाषाणातील मूर्तीवर सोनेरी रंगाचे वस्त्रालंकार असल्याने देवीचे सौंदर्य खुलून दिसते. असे सांगितले जाते की ही देवी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे रूप आहे. देवीच्या जुन्या मूर्तीच्या शिरावर कोल्हापूरच्या महालक्ष्मीप्रमाणे शिवलिंग आहे. देवीचा शिपाई असलेल्या चक्रण देवाचे स्थानही मंदिर परिसरात आहे. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरूनही समुद्राचे विहंगम दर्शन होते.

या मंदिरात नवरात्रोत्सव, देवदिवाळी (जत्रोत्सव), शिमगोत्सव हे तीन मोठे उत्सव होतात. देवदिवाळीला होणाऱ्या जत्रोत्सवादरम्यान नवस बोलण्यासाठी नवसपूर्तीसाठी हजारो भाविक येथे येतात. शिमगोत्सवात देवीची पालखी मंदिरातून बाहेर पडते. पंचक्रोशीत फिरल्यानंतर ही पालखी श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर मंदिरात नेली जाते. दहाव्या दिवशी पालखी पुन्हा येथे आणली जाते. या पालखी सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित असतात. तीन वर्षांतून एकदा या देवीचा गोंधळ मांडला जातो. मे महिन्यात होणाऱ्या या गोंधळालापांगीचा गोंधळम्हणतात. त्यावेळीही अनेक भाविक येथे उपस्थित असतात.

काळंबादेवी ही येथील सोनार, तसेच कायस्थ समाजाची कुलदैवत आहे. ही देवी कोळी समाजाचीही आराध्य दैवत आहे. दापोलीच्या हर्णे बंदरापासून रायगडमधील दिघी बंदरापर्यंत कोळी समाजाच्या ज्या बोटी समुद्रात जातात, त्या प्रत्येकीचा या देवीला मान असतो. या देवीचे १३ मानकरी आहेत. त्यात बारा बलुतेदारांच्या प्रतिनिधींचाही समावेश आहे. शिमगोत्सव तसेच देवदिवाळीनंतर येथे मानाचे विडे काढले जातात. देवीची सेवा केल्याबद्दलचा मान म्हणून या मानकऱ्यांना हे विडे दिले जातात.

सकाळी .३० ते सायंकाळी वाजेपर्यंत या मंदिरात भाविकांना दर्शन घेता येते. दुपारी १२ वाजेपर्यंत देवीला कळ्या (कौल) लावल्या जातात. दुपारनंतर देवी आपला भाऊ काळभैरवनाथ याच्या मदतीसाठी हरिहरेश्वरला जाते, अशी मान्यता आहे.

येथील बाणकोट किल्ला हा पर्यटक, तसेच इतिहास अभ्यासकांचेही आकर्षण आहे. बाणकोटजवळ असलेले वेळास हे गाव ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे. मार्चमध्ये येथे होणाऱ्या कासव महोत्सवाच्या वेळी हजारो पर्यटक येतात. नाना फडणीस यांचे मूळ गाव असलेल्या वेळासमध्ये रामेश्वर, दुर्गादेवी आणि कालभैरव यांची सुंदर मंदिरेही आहेत.

उपयुक्त माहिती:

  • मंडणगडपासून ३१ किमी, तर रत्नागिरीपासून १८९ किमी अंतरावर
  • मंडणगड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : दत्ताराम खाडे, पुजारी, मो. ८०१०४६७०५२
Back To Home