काळभैरव / नाथ मंदिर

मेडद, ता. माळशिरस, जि. सोलापूर

माळशिरस तालुक्यातील मेडद गाव हे धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे गाव गणले जाते. या गावात वसलेले काळभैरव मंदिर हे पुरातन वास्तुशिल्पाचे उत्तम उदाहरण आहे. काळभैरव हे भगवान शिवाचे एक उग्र रूप मानले जाते. ते काळ म्हणजेच ‘समय’ आणि भैरव म्हणजे ‘भयंकर रक्षक’ या संकल्पनेचे प्रतीक आहेत. ग्रामसंरक्षक देवता असलेल्या काळभैरवाच्या येथील मंदिरात दरवर्षी हजारो भक्त दर्शनासाठी येतात. येथे चैत्रात काळभैरवाची मोठी यात्रा असते. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, तेलंगण, कर्नाटकातील भाविकही मोठ्या संख्येने या यात्रेस हजेरी लावतात.
काळभैरवास ‘काशीचा कोतवाल’ असेही म्हटले जाते. पापभक्षण, आमर्दक, काळराज ही त्याचीच नावे आहेत. काळभैरवाविषयी पौराणिक कथा अशी की भगवान शंकराच्या क्रोधातून मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीस काळभैरवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाने एकदा शंकराचा अपमान केला. त्यामुळे शंकर क्रोधीत झाला आणि त्या क्रोधाग्नीतून काळ्या रंगाचा भैरव जन्मला व त्याने ब्रह्माचे शिवनिंदा करणारे मस्तक तोडले. त्यामुळे त्याच्या हातून हे ब्रह्महत्येचे पाप झाले. सर्व तीर्थांना जाऊनही त्याचे पापक्षालन झाले नाही. अखेरीस काशी येथे त्याला पापमुक्ती मिळाली आणि त्याने ब्रह्माचे मस्तक तेथे ठेवले. कालभैरवाने ब्रह्माचे मस्तक जेथे ठेवले त्या स्थानास कपालमोचनतीर्थ म्हणतात. कालिकापुराणातील कथेनुसार पार्वतीच्या शापाने महाकाल हा गण भैरवाच्या रूपाने जन्मला.
महाराष्ट्रासह उत्तर भारतात काळभैरवाची अनेक मंदिरे आहेत. मेडद येथील काळभैरव मंदिराची उभारणी ३०० ते ४०० वर्षांपूर्वी झाली असल्याचे सांगण्यात येते. मेडद गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी हे मंदिर स्थित आहे. गावाचे ग्रामदैवत असलेले हे मंदिर नाथ मंदिर म्हणूनही प्रसिद्ध आहे. या मंदिर परिसरात अनेक वैशिष्ट्यपूर्ण विरगळशिल्पे आहेत. विरगळ शिल्पातील चार भागांपैकी पहिल्या भागात विराला आलेले हौतात्म्य व तो वीर महादेवाची पुजा करतानाचे शिल्पकाम असते. त्यानंतरच्या दुसऱ्या भागात वीरमरण आलेल्या वीराला स्वर्गाकडे नेण्यासाठी आलेल्या अप्सरा असतात. तिसऱ्या भागात त्या विराला कोणत्या प्रकारच्या लढाईत विरगती प्राप्त झाली आहे ते दाखविलेले असते. साधारणतः चौथ्या व शेवटच्या भागात विरगती प्राप्त झालेल्या विराचे शव कोरलेले असते. परंतु येथील वेगळेपण असे की या परिसरातील सर्व विरगळींमध्ये खालील भागांत प्राण्यांची शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरील चौथऱ्यावर अशी अनेक विरगळशिल्पे आहेत.
एका उंच चौथऱ्यावर हे मंदिर स्थित आहे. सहा ते सात पायऱ्या चढून मंदिराच्या फरसबंदी प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणातून आणखी दहा पायऱ्या चढून मंदिराच्या तटबंदीत असलेल्या प्रवेशद्वाराजवळ जाता येते. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला असलेल्या तटबंदीत महिरपी देवळ्यांमध्ये विविध देवतांची चित्रे रंगविलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला स्तंभ व त्यावर महिरपी कमान आहे. स्तंभांच्या शेजारी द्वारपाल चित्रे रंगविलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या उजवीकडे एक मोठा त्रिशुळ व वरच्या बाजूला कमळाच्या नक्षीत घुमटाकार शिखर आहे. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूला तटबंदीच्या शेजारी दीपस्तंभ, तुलसी वृंदावन व काही प्राचीन पाषाणी मूर्ती आहेत. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या सभामंडात प्रवेश होतो. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. खुल्या स्वरूपाच्या सभामंडपात बाजूने चौकोनी स्तंभ आहेत व ते एकमेकांशी महिरपी कमानीने जोडलेले आहेत. सभामंडपाच्या पुढे अंतराळ व त्यात प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या स्तंभशाखेच्या खालील बाजूला द्वारपाल शिल्पे आहेत. गर्भगृहाच्या बाह्य भिंतींवर नक्षीकाम व कलाकुसर केलेली आहे. गर्भगृहात वज्रपिठावर काळभैरवनाथ व जोगेश्वरी देवी यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. या मूर्तींवर विविध अलंकार व वस्त्रे कोरलेली आहेत. वज्रपिठाच्या खालील बाजूला काळभैरव व जोगेश्वरी देवी यांचे स्वयंभू पाषाण आहेत. गर्भगृहावर अनेक शिखरांच्या प्रतिकृती असलेले एक मुख्य शिखर आहे. शिखराच्या अग्रभागी आमलक व कळस आहे.
दरवर्षी येथे चैत्र महिन्यात दोन दिवसांची मोठी यात्रा असते. या यात्रेत गजीढोल नृत्य सादर केले जाते. कुळाचार व नवसफेडीसाठी येथे गजीढोल घालण्याची प्रथा आहे. गावावर संकटे येऊ नयेत, पाऊस चांगला पडून चांगली पिके यावीत तसेच देवतेचा गावावर कोप होऊ नये यासाठी गजीढोल व गजीनृत्याचे आयोजन केले जाते. या नृत्यात मोठे ढोल वाजवून त्यावर वर्तुळाकार नृत्य केले जाते. नृत्य करणाऱ्याला गजी आणि ढोल वाजवणाऱ्याला ढोल्या म्हणतात. यामुळे हे नृत्य गजीढोल म्हणून प्रसिद्ध आहे. यात्रेदरम्यान मंदिरात भजन, कीर्तन, पालखी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन होते. यात्रेच्या दिवशी संध्याकाळी पालखी निघते. या यात्रेदरम्यान कुस्ती स्पर्धा, तमाशा, भारूड आदी कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते. दर रविवारी रात्री ९ वाजता मंदिरात धुपारती होते. या धुपारतीसाठी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील शेकडो भाविक उपस्थित असतात. या धुपारतीनंतर ग्रामस्थांकडून गजीढोल नृत्याचा सराव केला जातो.

उपयुक्त माहिती

  • माळशिरस येथून ६ किमी, तर नातेपुते येथून १६ किमी अंतरावर
  • माळशिरस व नातेपुते येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : नामदेव शेगर, पुजारी, मो. ९५०३८८८२३५, ९०११६४२३२५
Back To Home