शैव आगमांनी वर्णन केलेल्या अष्टभैरवांपैकी एक असलेला कालभैरव ही तांत्रिक देवता मानली जाते. कोशकारांनुसार भैरव याचा अर्थ भीषण असा आहे. त्याचा एक अर्थ भयापासून रक्षण करणारा, असा असल्याचे सांगण्यात येते. भैरव हे शिवाचेच उग्र व भीषण रूप आहे. कालभैरवास काशीचा कोतवाल असेही म्हटले जाते. पापभक्षण, आमर्दक व काळराज ही त्याचीच नावे आहेत. असा हा कालभैरव प्राचीन वारसा लाभलेल्या खारेपाटणचे आणि आजूबाजूच्या ७२ खेड्यांचे ग्रामदैवत आहे. येथे त्याचे भव्य आणि सुंदर असे मंदिर आहे.
प्रसिद्ध इतिहास संशोधक त्र्यं. शं. शेजवलकर यांच्यानुसार खारेपाटण या गावाचे प्राचीन नाव वलिपट्टण होते. बलिपत्तन या नावानेही ते ओळखले जाते. या गावाचा इतिहास असा आहे की दक्षिण कोकणात शिलाहार राजवंशाची स्थापना करणाऱ्या सणफुल्ल याचा पुत्र धम्मियर याने इ.स. ७८५ ते ८२० या काळात हे शहर वसवले. ही त्याची राजधानी होती. राजधानीच्या रक्षणासाठी या ठिकाणी किल्लाही बांधण्यात आला होता. इ.स. १६६० मध्ये छत्रपती शिवरायांनी खारेपाटण जिंकून घेतले होते. विजयदुर्ग खाडीकाठी वसलेले हे गाव म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उत्तरेकडील प्रवेशद्वार मानले जाते. येथील घोडेपाथर व्यापारी बंदरातून बावडा, फोंडाघाटमार्गे देशावर मालाची निर्यात केली जात असे. असे सांगितले जाते की बंदरातील माल नेण्यासाठी तळकोकणातील असंख्य बैलगाड्या येथे थांबलेल्या असत.
आज या गावाच्या मध्यातून मुंबई–गोवा महामार्ग जातो. या महामार्गावरून मुंबईहून येताना खारेपाटण येथे उजव्या बाजूस श्री काळभैरव मंदिराची दिशादर्शक कमान दिसू लागते. महामार्गावरून पुढे साधारणतः एक किमी अंतरावर मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. रुंद आणि कोरीव काम केलेले स्तंभ, त्यावर दोन्ही बाजूंस लहान बैठ्या मंदिरासारख्या दोन देवळ्या, त्यांवर बसके शिखर व त्यावर कळस, मध्यभागी कमानीने जोडलेले तीन–तीन खांब असलेली छत्री, तिच्या दोन्ही बाजूंस नंदीशिल्पे असे हे भव्य प्रवेशद्वार आहे. येथून थेट मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. पुढे काही पावलांवरच काळभैरवाचे दक्षिणमुखी मंदिर आहे.
हे मंदिर त्रिदल वा त्रिकूट स्वरूपाचे आहे. म्हणजे त्यास तीन गर्भगृहे आहेत. त्यासमोर सभामंडप आणि दर्शनमंडप अशी या मंदिराची रचना आहे. संपूर्ण मंदिर काही फूट उंचीच्या अधिष्ठानावर उभारलेले आहे. मंदिरासमोर एका आयताकृती चौथऱ्यावर दोन दीपस्तंभ आहेत. त्यातील एक सात स्तरीय व दुसरा सहा स्तरीय आहे. या चौथऱ्याच्या शेजारीच छोटे तुळशी वृंदावन आहे. दीपस्तंभांजवळून सात पायऱ्या चढून मंदिराच्या दर्शनमंडपात प्रवेश होतो. हा दर्शनमंडप खुल्या स्वरूपाचा असून समोरील बाजूस त्याला चार स्तंभ आहेत. या दर्शनमंडपास अर्धवर्तुळाकार छत आहे व त्यावर दोन्ही बाजूंना गरुडप्रतिमा व मध्यभागी गणेशमूर्ती आहे.
येथील सभामंडपाचे प्रवेशद्वार लाकडी व कमानीकृती आहे. त्यावर बारीक नक्षीकाम आहे. सभामंडपाच्या भिंतीपासून आत काही अंतरावर सहा रुंद स्तंभ आहेत. या स्तंभांच्या तळाच्या भागात कमळांची नक्षी कोरलेली आहे. मधला भाग षटकोनी व त्यावर छताकडील भागावरही कमळाची नक्षी आहे. त्यावर दोन्ही स्तंभांना जोडलेली कमान आहे. या प्रत्येक खांबाच्या वरील म्हणजे कमळाच्या नक्षीवरील भागात श्री संहार भैरव, श्री असितांग भैरव, श्री भीषण भैरव, श्री उन्मत्त भैरव, श्री चंड भैरव व श्री रु रु भैरव यांच्या त्यांच्या वाहनांसह मूर्ती आहेत.
सभामंडपाच्या पुढील बाजूस प्रदक्षिणामार्ग सोडून तीन गर्भगृहे आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराप्रमाणे याही गर्भगृहांवर लाकडी कोरीव काम आहे. त्यावरील भागात भिंतीवर शिवशंकराच्या पौराणिक कथेवर आधारित असे भव्य उठावशिल्प कोरलेले आहे. त्यात तांडवनृत्य करणारे उग्रवदन चतुर्भुज महादेवाचे मुख्य उठावशिल्प आहे. त्याच्या एका बाजूस शिवपिंडीस आलिंगन देणारे बालक आणि दुसऱ्या बाजूस हातात लोहदंड आणि पाश तसेच एक पाय उंचावलेल्या अवस्थेतील भैरव असे हे शिल्प आहे.
मंदिराच्या मध्यभागी असलेल्या गर्भगृहात काळभैरवनाथाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. ही मूर्ती कमळफुलात उभी आहे. मूर्तीच्या एका हातात खड्ग आहे. गळ्यात नरमुंडमाला व मस्तकी मुकुट आहे. मूर्तीच्या पायाशी एका बाजूस शंख तर दुसऱ्या बाजूस तुतारी फुंकणाऱ्या सेवकांच्या प्रतिमा आहेत.
काळभैरवाविषयी अशी पौराणिक कथा आहे की भगवान शंकराच्या क्रोधातून मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीस कालभैरवाची व्युत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाने एकदा शंकराचा अपमान केला. त्यामुळे शंकर क्रोधीत झाला आणि त्या क्रोधाग्नीतून काळ्या रंगाचा भैरव जन्मला व त्याने ब्रह्माचे शिवनिंदा करणारे मस्तक तोडले. मात्र त्याच्या हातून हे ब्रह्महत्येचे पाप झाले. सर्व तीर्थांना जाऊनही त्याचे पापक्षालन झाले नाही. अखेरीस काशी येथे त्याला पापमुक्ती मिळाली आणि त्याने ब्रह्माचे मस्तक तेथे ठेवले. कालभैरवाने ब्रह्माचे मस्तक जेथे ठेवले त्या स्थानास कपालमोचनतीर्थ असे म्हणतात. कालिकापुराणात अशी कथा सांगण्यात येते की पार्वतीच्या शापाने महाकाल हा गण भैरवाच्या रूपाने जन्मला. त्याचा जन्म रात्रीच्या चौथ्या प्रहरी झाला. कार्तिक वद्य अष्टमीस भैरवजयंती हे काम्यव्रत केले जाते.
या काळभैरवनाथांच्या गर्भगृहाच्या उजव्या बाजूला असलेल्या गर्भगृहात श्रीगणेश व शंकराची पिंडी, तसेच डाव्या बाजूला देवी जोगेश्वरीची मूर्ती आहे. गर्भगृहाला प्रदक्षिणा मार्ग असून गर्भगृहाच्या मागच्या बाजूनेही (उत्तर दिशेने) मंदिरात येण्यासाठी प्रवेशद्वार आहे. याशिवाय या मंदिराच्या सभामंडपातून पूर्व व पश्चिम दिशेसही प्रवेशद्वारे आहेत.
या ठिकाणी माघ शुद्ध पंचमी व षष्ठीला कालभैरवाची मोठी यात्रा भरते. हजारो भाविक यावेळी येथे दर्शनास येतात. भैरवामुळे भूतबाधा आणि सर्पदंश वगैरेंचा प्रभाव नष्ट होतो, अशी लोकश्रद्धा आहे. दरवर्षी ११ मे या दिवशी या मंदिराचा वर्धापन दिनही साजरा केला जातो. श्रावण महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी सकाळी ८ वाजता काळभैरवाला अभिषेक घातला जातो. या दिवशी दुपारी १ वाजता आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी कार्तिक वद्य प्रतिपदा ते दशमीपर्यंत कालभैरव जन्मोत्सव सोहळा होतो. या सोहळ्यासही असंख्य भाविक उपस्थित असतात.