अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले ज्येष्ठराज गणपती मंदिर हे सातारा शहराचे ग्रामदैवत मानले जाते. सुमारे २५ हजार किलो वजनाची पाषाणातील एकसंध असलेली ही मूर्ती ११ फूट उंच, तर साडेसहा फूट रुंद आहे. त्यामुळे त्याला ढोल्या गणपती असे नामाभिधान प्राप्त झाले आहे. शिलाहार वंशातील राजा भोज यांनी या मंदिराची निर्मिती केली असून कोणत्याही मंगलकार्यास सुरुवात करण्यापूर्वी या गणपतीला पहिली अक्षता ठेवण्याची प्रथा येथे प्राचीन काळापासून पाळली जाते.
सातारा राजवाड्यापासून यादव गोपाळ पेठेकडून, समर्थ मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर, अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी, एका चढावावर ज्येष्ठराज गणपती मंदिर आहे. मंदिराकडे पाहिल्यावर यातील गणेशाची मूर्ती एखाद्या घरात स्थापन केल्यासारखी वाटते. या मंदिराला शिखर नसून वर सर्वसाधारण घराप्रमाणे कौलारू रचना आहे. मुघलकालात या भागात सतत युद्ध होत असल्याने मूर्तीभंजकांकडून ज्येष्ठराजाचे पावित्र्य नष्ट होऊ नये, याचा विचार करूनच मंदिर शिखरविरहित ठेवण्यात आले असावे. आजही हे मंदिर त्याच स्थितीत पाहायला मिळते. ऐतिहासिक नोंदींनुसार, छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत त्यांच्या रंगमहाल वाड्यातून व अदालत वाड्यातून या गणपती मंदिराकडे येण्यासाठी डोंगरांतून स्वतंत्र वाट तयार करण्यात आली होती.
ज्येष्ठराज मंदिरातील गणेशाची मूर्ती एकसंध पाषाणाची व शेंदूरचर्चित असून ती ११ फूट उंच व ६.५ फूट रुंदीची आहे. या गणेशाचे ध्यान काहीसे उग्र असून एका बाजूला नजर आहे, असे भासते. सोंड उजवीकडे वळलेली असून गणपतीचे पोट फारच मोठे आहे. मूर्तीच्या डोळ्यांच्या ठिकाणी १९३० साली मणी बसविण्यात आलेले होते. गणपतीच्या भाळावर पंचमुखी नाग आहे. मूर्ती चतुर्भुज असून उजवीकडील एका हातात कमळ, तर दुसऱ्या हातात मोदक आहे; तर डावीकडील एका हातात परशू असून दुसरा हात आशीर्वाद देतानाचा आहे. सोंडेने उजव्या हातातील मोदक उचलतो आहे, असे मूर्तीचे स्वरूप आहे. गणपतीच्या मागच्या बाजूच्या मखरावर श्रीविष्णू विराजमान आहेत. त्यांच्या मस्तकावरही नागाने आपला फणा उभारलेला आहे. गणपतीची ही मूर्ती काहीशी आक्रमक, आडदांड व लंबोदर असल्याने सातारच्या ग्रामस्थांनी त्याचे ढोल्या असे नामाभिधान केले होते. हेच नाव आज रूढ आहे.
या गणपतीबाबत असे सांगितले जाते की या मूर्तीला शेकडो वर्षांपासून शेंदूर फासण्यात येत होता. त्यामुळे दिवसेंदिवस मूर्तीचा आकार वाढत चालला होता व ती आणखी भव्य दिसू लागली होती. कालांतराने शेंदूरलेपनाचा जाड थर निखळू लागला. गणपतीच्या अभिषेकाचे पाणी मूर्तीभोवती असलेल्या शेंदूर पुटाच्या आतल्या बाजूस झिरपू लागले. आतील पाण्याचा साठा वाढताच गणपतीच्या बेंबीजवळ, ज्याठिकाणी शेंदुराचा थर कमी होता तिथे पाणी जमा झाले व ओघळू लागले. १९३४ साली काशिनाथ सहस्रबुद्धे यांनी या मूर्तीवरील सात ते आठ इंचांचा शेंदुराचा थर वेगळा केला. हा शेंदूर १४ बैलगाड्यांतून वाहून नेण्यात आला होता. तेव्हा या गणपतीच्या मूळ मूर्तीचे भाविकांना दर्शन झाले. ज्या शिळेपासून ही अखंड गणपतीची मूर्ती बनविण्यात आली तशी शिळा आज दुर्मिळ आहे. कारण या शिळेवर कोणताही घण चालत नाही, तिला घासून आकारा आणावा लागतो.
सातारच्या छत्रपती राजांकडून या मंदिरास दरसाल १५ रुपये वर्षासन मंजूर झाले होते. ही दरवर्षी मिळणारी १५ रुपयांची रक्कम आजही राज्य सरकारकडून या मंदिराला दिली जाते. दरवर्षी या मंदिरामध्ये माघी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. याशिवाय संकष्ट चतुर्थी, विनायकी चतुर्थी व अंगारकी चतुर्थीला येथे विविध कार्यक्रम होतात. यावेळी गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखविला जातो. या गणेशाची रेशमी सोवळ्यात पूजा केली जाते. सातारा व परिसरात असलेल्या अनेक जुन्या वाड्यांमध्ये या गणेशाची प्रतिकृती आढळते. त्यामुळे पूर्वीपासूनच या गणपतीची ख्याती आहे, हे लक्षात येते.