जीवदानी मंदिर

विरार, ता. वसई, जि. पालघर

वसई तालुक्यातील विरारजवळील डोंगरावर स्थित असलेल्या जीवदानी देवीचे स्थान हे राज्यातील प्रमुख व मोठ्या देवस्थानांपैकी एक आहे. असे सांगितले जाते की वनवासात असताना पांडवांनी येथील गुहेत देवीची प्रतिष्ठापना केली होती. ही देवी ५१ शक्तिपीठांपैकी एक मानली जाते. समुद्रसपाटीपासून सुमारे ९०० फूट उंचावर वसलेली ही देवी विरारची ग्रामदेवता तसेच ठाणे व पालघर जिल्ह्यातील अनेक आदिवासी, कोळी, आगरी समाजाची कुलदेवता आहे. ही जागृत देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

या मंदिरासंबंधीची एक पौराणिक आख्यायिका पांडवांशी संबंधित आहे. पांडव हे वनवासात असताना शूर्पारक म्हणजे (आताचे नालासोपारा) येथे आले होते. महाभारताच्या वनपर्वातील तीर्थयात्रापर्वामध्ये याचा उल्लेख आहे. त्यात म्हटले आहे, की ‘स तानि तीर्थानि च सागरस्य पुण्यानि चान्यानि बहूनि राजन्। क्रमेण गच्छन् परिपूर्णकामः शूर्पारकं पुण्यतमं ददर्श।। (अध्याय ११८, श्लोक ८)’ याचा अर्थ असा की ‘समुद्रसंबंधी तसेच अन्य बऱ्याचशा पुण्यतीर्थांना एकेक करून भेट दिल्यानंतर पूर्णकाम राजा युधिष्ठिर याने पुण्यमय शूर्पारक तीर्थाचे दर्शन केले.’ पांडव केवळ शूर्पारकातच थांबले नाहीत, तर त्यांनी या परिसरातील अनेक तीर्थांनाही भेट दिली. (तीर्थेषु सर्वेषु परिप्लुताङ्ग पुनः स शूर्पारकमाजगाम।। वनपर्व, ११८.१४) या तीर्थांमध्ये वैतरणा नदीचा उल्लेख आहे. महाभारतामधील वनपर्वात असा

उल्लेख आहे की ‘ततस्त्रिविष्टपं गच्छेत् त्रिषु लोकेषु विश्रुतम् । तत्र वैतरणी पुण्या नदी पापप्रणाशिनी।।’ (वनपर्व, ८३.८४) याचा अर्थ असा की ‘त्यानंतर तिन्ही लोकांत विख्यात अशा त्रिवष्टपतीर्थास (लोकांनी) जावे. तेथे वैतरणी ही पापनाशिनी नदी आहे.’ या पापनाशिनी नदीच्या काठावर पांडव विश्रांतीसाठी थांबले होते. त्या वेळी त्यांनी विरारजवळील या डोंगरातील गुहेमध्ये जीवदानी देवीची प्रतिष्ठापना केली. पांडवांचा संबंध परंपरेने प्राचीन गुहांशी जोडला जात असल्याने या आख्यायिकेचा उगम झाल्याचे स्पष्ट आहे.

या मंदिराविषयी आणखी एक आख्यायिका सांगण्यात येते. ‘रुमिनेशन्स – द ॲँड्रियन जर्नल ऑफ लिटरेचर २०१७’मधील ‘सँड इन अवर हँड्स’ या डॉ. दीपा मुर्डेश्वर-कात्रे यांच्या संशोधन निबंधात जी नोंद आहे ती अशी की फार फार वर्षांपूर्वी या डोंगराखालील एका खेड्यामधील शेतकऱ्याच्या जमिनीत एक गाय रोज चरण्यासाठी येत असे. सकाळपासून सायंकाळपर्यंत येथे थांबून ती गाय डोंगरावर जात असे. एकदा त्या शेतकऱ्याने त्या गायीचा पाठलाग केला. डोंगरावरील एका सपाट जागेवर जाऊन ती गाय थांबली. अचानक तेथे एक तेजस्वी स्त्री प्रकट झाली. तीच या गायीची मालकीण असेल, असे समजून त्या शेतकऱ्याने तिच्याकडे गायीच्या चाऱ्याचे पैसे मागितले. ती स्त्री त्याच्या हातात पैसे ठेवणार एवढ्यात त्या शेतकऱ्याने तिला सांगितले की मी अस्पृश्य आहे. त्याबरोबर ती स्त्री तेथून अदृश्य झाली. त्या गायीने मोठ्याने हंबरडा फोडला आणि खालील दरीत उडी मारली. नंतर तेथे त्या देवतेचे मंदिर बांधण्यात आले आणि गायीने दिलेल्या बलिदानाची स्मृती म्हणून या देवीला जीवदानी म्हणजे जी प्राण देते ती असे संबोधण्यात येऊ लागले.

जीवदानी मंदिराचा इतिहास असा सांगण्यात येतो की येथील मंदिर सतराव्या शतकात उभारण्यात आले. पूर्वी हे मंदिर खूप लहान होते. तसेच पायऱ्याही उंच व चढणीच्या होत्या. त्यात कालांतराने सुधारणा करण्यात आल्या. वेळोवेळी झालेल्या जीर्णोद्धारानंतर आताचे देवीचे भव्य मंदिर आकारास आले. विरारच्या पूर्वेकडे असलेल्या या डोंगरावर कुठूनही नजर टाकल्यास जीवदानी मंदिराची सात मजली भव्य इमारत लक्ष वेधून घेते. डोंगराच्या पायथ्याशी फुले-प्रसाद व पूजा साहित्य विक्रीची शेकडो दुकाने आहेत. येथून मंदिरात येण्यासाठी सुमारे १४०० पायऱ्या चढाव्या लागतात. पूर्वी या पायऱ्या कच्च्या व दगडी होत्या. आता गडाच्या पायथ्यापासून सिमेंट काँक्रीटच्या पायऱ्या बनवण्यात आल्या आहेत. अलीकडेच भाविकांच्या सुविधेसाठी फनिक्युलर (केबलच्या साह्याने धावणाऱ्या) ट्रेनची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यातून पाच मिनिटांहूनही कमी कालावधीत पायथ्यापासून मंदिरात येता येते. या दोन मार्गांशिवाय अनेक भाविक पाचपायरी या जुन्या मार्गानेही मंदिरात येतात.

पायरी मार्गाच्या सुरुवातीला मंदिराची प्रवेशकमान आहे. पायऱ्या चढताना भाविकांना ऊन-पावसाचा त्रास होऊ नये म्हणून त्यावर छत टाकण्यात आलेले आहे. काही पायऱ्या चढून आल्यावर पायऱ्यांच्या मध्यभागी देवीची प्रतिमा आहे. पायरी मार्गावरही ठिकठिकाणी फुले-प्रसादाची दुकाने आहेत. पायऱ्या संपून मंदिराजवळ आल्यावर एका मोठ्या शिळेवर भाविकांनी चिकटवलेली नाणी दिसतात. या शिळेला नाणे चिकटले तर मनातील इच्छा पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या शिळेजवळ कालभैरवाचे मंदिर आहे. येथून काही अंतरावर महाकाली तसेच गणपतीचे मंदिर आहे. जीवदानी देवी मंदिराच्या गर्भगृहासमोर मोठा सभामंडप आहे. मंदिराचे गर्भगृह सुमारे सहा फूट उंच पाषाणात खोदलेले आहे. वणी येथील सप्तशृंगी गडाप्रमाणे ही देवी डोंगराच्या कड्याला लागून कपारीतच वसलेली आहे. ‘आदिशक्तीचे विश्वस्वरूप अर्थात देवीकोश’ या प्रल्हाद कृष्ण प्रभुदेसाई यांच्या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडात दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी या मंदिरामध्ये देवीची मूर्ती नव्हती. कारण ती या ठिकाणी अंतर्धान पावलेली आहे. एक लहानसा तांदळा तेथे होता व भाविक त्याचेच पूजन करीत. भूमीमध्ये असलेल्या एक छिद्रातून देवीला अर्पण करावयाचा पै-पैसा आत टाकत. २३ फेब्रुवारी १९५६ मध्ये जीवदानी मंदिर ट्रस्टची स्थापना करण्यात आली. त्यावर्षीच येथे दगडात कोरलेल्या नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. उभ्या असलेल्या देवीच्या मुखावर सुवर्णमुकुट आहे. तिच्या डाव्या हातात कमलपुष्प व उजवा हात आशीर्वाद मुद्रेत आहे. मूर्तीच्या बाजूला त्रिशूळ आहे. मंदिराच्या गर्भगृहाला लागून १२ फूट खोल, अरुंद अशी श्रीकृष्ण गुहा आहे. देवीच्या मागे असलेल्या खडकात एक छोटे भोक असल्याचे सांगितले जाते. या भोकात नाणे टाकले असता ते कोठे जाते, ते समजत नाही. मात्र ते गडगडत गेल्याचा आवाज येतो, असे भाविकांचे म्हणणे आहे.

दररोज पहाटे चार वाजल्यापासून भाविकांना या देवीचे दर्शन घेता येते. सकाळी ५.३० वाजता काकड आरती होते. त्यानंतर देवीला अभिषेक घालून साजशृंगार केला जातो. दुपारी १२ तसेच सायंकाळी ७.३० वाजता देवीची आरती होते. नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या जीवदानीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येथे येतात. नवरात्रोत्सव तसेच अन्य उत्सवांदरम्यान येथे भाविकांची गर्दी असते. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर ट्रस्टतर्फे विविध उपक्रम राबवले जातात. मंदिराच्या डाव्या दिशेकडील डोंगरावर गाय व वासरू यांच्या मूर्ती आहेत. असे सांगितले जाते की पूर्वी एक गाय दररोज देवीच्या दर्शनासाठी येत असे, तिचे हे प्रतीक आहे. या स्थानाला गायगोठा म्हणूनही ओळखले जाते. नजीक असलेल्या एका कुंडात भाविक नाणी टाकतात. या कुंडाच्या वरच्या बाजूस असलेल्या कपारीत मानकुंड देवीची मूर्ती आहे. या कुंडाजवळील चौकोनाकृती गुहेत वाघोची मूर्ती आहे. हा वाघ देवीच्या दर्शनासाठी येत असे, अशीही आख्यायिका आहे.

उपयुक्त माहिती

  • विरार रेल्वे स्थानकापासून ३ किमी अंतरावर
  • मुंबई, ठाणे व पालघर येथून विरारसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दू: ०२५० २५२३६९८, २५२३३९८
Back To Home