झोलाई देवी मंदिर,

गावतळे, ता. दापोली, जि. रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील गावतळे येथे झोलाई देवीचे जागृत स्थान आहे. ही देवी स्वयंभू नवसाला पावणारी म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की झोलाई देवी ही परिसरातील ८४ गावांची देवी आहे. या मंदिरात दर तीन वर्षांनी होणारा महिषासुरमर्दन हा उत्सव येथील महत्त्वाचा उत्सव मानला जातो. यावेळी मानाच्या बोकडाला सजवून त्याची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढून त्याला झोलाई मंदिरात आणला जातो. विधी झाल्यावर त्या बोकडाच्या मटणाचा प्रसाद मोठ्या श्रद्धेने संपूर्ण गावाला वाटला जातो.

साधारणतः सतराव्या शतकातील झोलाई देवीचे हे मंदिर गावतळे गावाच्या बाहेरील वनराईत स्थित आहे. असे सांगितले जाते की गावावर येणारे संकट वा आपत्ती बाहेरच थोपवून ठेवण्यासाठी गावावर कृपादृष्टी राहावी म्हणून झोलाई देवी गावाच्या सीमेवर वास्तव्य करून आहे. मुघल राजवटीत राज्यातील देवदेवतांची वाताहत विटंबना होत होती. आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिराची विटंबना होऊ नये म्हणून हे मंदिर लोकवस्तीपासून दूर दुर्गम परिसरात बांधले असावे, अशी शक्यताही येथील ग्रामस्थ व्यक्त करतात. या परिसरात पूर्वी वाघांचा वावर होता, त्यामुळे दहशत असली तरी वाघांबद्दल येथील ग्रामस्थांमध्ये श्रद्धाही आहे. झोलाई मंदिर परिसरात एक वाघजाई देवीचे मंदिर आहे. असे सांगितले जाते की या मंदिराच्या पायरीवर नेहमी वाघ येऊन बसत असत ; परंतु वाघांनी कधीही गावातील गुरे पाळीव प्राण्यांची शिकार केलेली नाही.

सन २००५ मध्ये पुरातन जीर्ण झालेल्या झोलाई मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यावेळी एकसंध प्राचीन दगडी कोरीव खांब तसेच ठेवून मूळ ढाचा बदलता मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले. या मंदिराची रचना सभामंडप, गर्भगृह प्रदक्षिणा मार्ग अशी आहे. मंदिराच्या गर्भगृहात देवी झोलाईची अखंड पाषाणातील सुंदर मूर्ती आहे. ही मूर्ती बैठी वराहावर आरूढ आहे. याच गर्भगृहात चोडकरीण देवीचीही मूर्ती आहे. अशी आख्यायिका आहे की चोडकरीण देवी पूर्वी गावकऱ्यांना खूप त्रास देत असे. त्यामुळेच झोलाई देवीने तिला आपल्या देखरेखीखाली ठेवले आहे.

झोलाई देवी मंदिर परिसरात वाघजाई, भैरवनाथ, मानाई, चमकाई, वळजाई, नवलाई, काळकाई या देवतांची मंदिरे आहेत. यातील सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिरांची पूर्वीचीच रचना कायम ठेवण्यात आलेली आहे. मंदिर परिसरात एक मोठा तलाव आहे. या तलावातील पाणी स्वच्छ चवदार असून ते बारमाही भरलेले असते. या तलावात फार पूर्वीपासून मगरींचा वावर आहे, मात्र आजपर्यंत कधीही येथील मगरींनी पाळीव जनावरांवर किंवा गावकऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडलेली नाही. या मगरी कधीतरी तलावाबाहेरील गवतात विसावलेल्या असतात, त्यावेळी त्यांचे दर्शन होते. या तलावाच्या बाजूला पायवाटेजवळ एककासारणीचा चोंडाप्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की पूर्वी एक कासारीण येथून जाताना झोलाई देवीसाठी मोठ्या श्रद्धेने या चोंड्यात बांगड्या ठेवत असे, त्यामुळेच हे ठिकाणकासारणीचा चोंडानावाने प्रसिद्ध आहे. या गावात असे अनेक तलाव असल्यामुळे गावाचे नावगावतळेपडल्याचे बोलले जाते.

झोलाई मंदिरात महिषासुरमर्दन, वाघ बारशी, होळी, नवरात्र पालेजत्रा यांसारखे उत्सव साजरे होतात. महिषासुरमर्दन हा उत्सव दर तीन वर्षांतून एकदा साजरा केला जातो. यावेळी मानाच्या बोकडाची मिरवणूक काढत त्याला झोलाई मंदिरात आणतात. नंतर त्या बोकडाचा बळी देऊन त्याचे मुंडके खूर देवीला अर्पण करून ठरलेल्या ठिकाणी पुरतात. बोकडाच्या मटणाचा प्रसाद करून सर्व गावाला वाटण्यात येतोया प्रसादासाठी लागणाऱ्या भाकऱ्या गावातून गोळा केलेल्या तांदळांपासून बनविल्या जातात.

वाघ बारशी हा पारंपरिक कार्यक्रम वाघाला गावातून हद्दपार करण्यासाठी असतो. गावातील दुष्ट शक्ती हद्दपार करणे, ही या कार्यक्रमामागची कल्पना आहे. गावातीलच एका व्यक्तीला वाघ बनवून त्याच्यावर शेण दगड फेकून त्याला गावाच्या सीमेबाहेर हाकलून लावले जाते. त्यानंतर वाघ हद्दपार झाल्याच्या आनंदात आधीच गावातील शेतांतून पडलेले भाताचे धान्य गोळा करून रानातच चूल पेटवून त्याची खीर केली जाते ती आपसात वाटली जाते.

झोलाई मंदिरात साजरा होणारा आणखी एक महत्त्वाचा सण म्हणजे पालेजत्रा (शेताचा संरक्षक मानला जाणाऱ्या देवाची जत्रा.) हा गावातील शेतकऱ्यांचा प्रमुख सण असतो. भातलावणीस सुरुवात करण्याआधी तो साजरा केला जातो. या सणानंतर गावात भातलावणीस सुरुवात होते.

या शिवाय दर तीन वर्षांतून नवरात्रोत्सवात झोलाई देवी मंदिरात पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम होतो. पूर्वापार प्रथेनुसार पश्चिम महाराष्ट्रातील ठरलेले गोंधळी या कार्यक्रमासाठी झोलाई मंदिरात येतात. झोलाई देवस्थान हे जागृत देवस्थान मानले जाते. त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी येथे राज्यभरातून भाविक येत असतात.

उपयुक्त माहिती:

  • दापोलीपासून १७ किमी, तर रत्नागिरीपासून १३५ किमी अंतरावर
  • दापोलीपासून गावात एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात न्याहरीची व्यवस्था आहे, निवासाची नाही
Back To Home