कोकणातील अनेक समुद्र किनाऱ्यांमधील रत्नागिरीजवळील भाटये किनारा पर्यटकांच्या विशेष पसंतीचा आहे. सुंदर, शांत व मनाला प्रसन्न करणाऱे येथील निसर्गसौंदर्य पर्यटकांना भावते. येथील वाळू शुभ्र पांढऱ्या रंगाची असल्याने समुद्राचे पाणी अगदी नितळ दिसते. पर्यटकांसोबतच हा परिसर येथील ‘प्रति गणपतीपुळे’ समजल्या जाणाऱ्या झरी विनायक मंदिरामुळे हजारो भाविकांचेही श्रद्धास्थान आहे. जमिनीखालून वाहून येणाऱ्या झऱ्यांच्या वर देवाचे स्थान असल्याने हे मंदिर ‘झरी विनायक’ म्हणून प्रसिद्ध आहे.
रत्नागिरी शहराच्या सीमेवर पावसकडे जाणाऱ्या रस्त्यालगत झरी विनायक हे गणपतीचे सुंदर व छोटेखानी मंदिर प्रसिद्ध आहे. इ. स. १९३० पासून हे मंदिर येथे असल्याचे सांगितले जाते. रस्त्यालगत असणाऱ्या जांभ्या दगडाच्या कमानीवजा प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात प्रवेश होतो. किनाऱ्याला लागून असणाऱ्या या मंदिर परिसराचे डांबरीकरण करण्यात आले आहे. येथे भाविकांच्या सुविधेसाठी पत्र्याचे शेड टाकून त्याखाली दोन सभामंडप बनविण्यात आलेले आहेत. सभामंडपापासून पुढे गेल्यावर समोर एका चौथऱ्यावर लाडू हातात घेतलेल्या मूषकराजाची पंचधातूपासून बनविलेली सुबक मूर्ती दिसते. या मूषकराजाच्या कानात आपल्या इच्छा व्यक्त केल्यास येथील झरी विनायक त्या पूर्ण करतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
झरी विनायक मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक पाण्याचे कुंड आहे. या कुंडात विविधरंगी मासे व कासवे आहेत. डोंगरातून वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी मंदिराखालून येऊन या कुंडामध्ये असलेल्या गोमुखातून बाराही महिने वाहत असते. विशेष म्हणजे या मंदिराला लागून समुद्र असला तरी झऱ्याचे पाणी मात्र गोड आहे. येथील छोटेखानी मंदिरात प्रवेश केल्यावर मुख्य गर्भगृहात तीन मीटर लांब आणि एक मीटर उंच काळ्या पाषाणाच्या शिळेवर ६० सें.मी. उंचीची स्वयंभू गणपतीची मूर्ती दिसते. गणपतीच्या चार हातांत शंख, चक्र, गदा व पद्म अशी विष्णूसारखी आयुधे आहेत. असे सांगितले जाते की स्वतः श्रीविनायकाने दृष्टांत दिल्याप्रमाणे येथील एका गणेशभक्त महिलेने या मंदिराची स्थापना केलेली आहे. मुख्य गर्भगृहाच्या बाजूने पायऱ्यांवरून भाविकांसाठी प्रदक्षिणा मार्ग तयार करण्यात आला आहे. या मंदिरात गणेश जयंती, माघी तसेच भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.
झरी विनायक मंदिरापासून काही अंतरावर असणारा रत्नागिरीतील वीर विघ्नेश हा अठरा हातांचा गणपतीही प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की महाराष्ट्रात १८ हात असलेली ही एकमेव गणेशमूर्ती आहे. रत्नागिरी बस स्थानकापासून पायी पाच मिनिटांवर हे मंदिर आहे. जोशी कुटुंबाचे हे खासगी मंदिर असले तरी रत्नागिरीकरांचे ते श्रद्धास्थान आहे. येथील वीर विघ्नेशाची मूर्ती महालक्ष्मी व गणपती असे एकत्रित रूप आहे. त्यामुळे महालक्ष्मीचे १६ हात व गणपतीचे चार हात असे मिळून २० हात या मूर्तीला आहेत़; परंतु या दोघांचे दोन हात एकत्रच असल्यामुळे ते दिसत नाहीत. म्हणून हा गणपती अठरा हातांचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. १९६७ साली ज्येष्ठ वद्य अष्टमीला येथील विनायक कृष्ण जोशी या गणेशभक्ताने जयपूरहून ही मूर्ती एक हजार रुपयांत बनवून आणली व घरालगत मंदिर बांधून त्यात या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती.
मंदिराच्या गर्भगृहात चांदीच्या मखरात वीर विघ्नेशाची मूर्ती आहे. मूर्तीची सोंड सरळ खाली आलेली असून खालचा भाग उजवीकडे वळलेला आहे. शुभ्र संगमरवरी असलेल्या या मूर्तीमध्ये १८ हात स्पष्ट दिसतात. मूर्तीच्या खाली मूषक व सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सिंह आहेत. या मंदिरातील मोठा उत्सव मार्गशीर्षात होतो. मार्गशीर्ष विनायकी चतुर्थीला दुपारी १२.३९ वाजता गजाननाला पाळण्यात घालून हा उत्सव साजरा केला जातो. यावेळी एक हजार तळणीचे (तळलेले) मोदक, एक हजार दुर्वा, एक हजार शमी, एक हजार तीळ व एक हजार तांदूळ गणपतीला अर्पण करून एक हजार आवर्तने केली जातात. असे सांगितले जाते की अष्टमहासिद्धी प्राप्त करण्यासाठी आठ रंगांमध्ये या गणपतीची मूर्ती करून मंदिरात अनुष्ठान केल्यास सिद्धी प्राप्त होतात. याशिवाय ब्रह्मविद्याप्राप्ती, भूतपिशाच्च बाधा निरसन आणि वंशवृद्धीसाठी वीर विघ्नेशाची उपासना केल्यास फायदा होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.