रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यामुळेच या भागात शेकडो वर्षांपूर्वीची अनेक मंदिरे आजही दिमाखात उभी आहे. इतर मंदिरांप्रमाणेच पंचक्रोशीचे श्रद्धास्थान म्हणजे येथील प्राचीन जीवनेश्वर मंदिर. ते शंकराचे स्वयंभू स्थान मानले जाते. श्रीवर्धन शहराकडून दिवेआगरकडे जाताना तीन किलोमीटर अंतरावर जीवना बंदर आहे. पूर्वीच्या काळी ते जलवाहतुकीचे मोठे केंद्र होते. त्यावरूनच या मंदिरास ‘जीवनेश्वर‘ नाव पडल्याचे सांगतात. या मंदिरातील लाकडी स्तंभांवरील अत्यंत बारकाईने केलेले कोरीव नक्षीकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे.
असे सांगितले जाते की जीवनेश्वर मंदिर सुमारे ७०० ते ८०० वर्षांपूर्वीचे आहे. येथील जीवना बंदरातून प्राचीन काळी व्यापार चालत असे. मंदिराची आख्यायिका अशी की अनेक वर्षांपूर्वी या भागात शेत नांगरत असताना एका शेतकऱ्याच्या नांगराचा फाळ जमिनीत रुतून बसला. तो काही केल्या निघेना. तेव्हा शेतकऱ्याने त्या ठिकाणची जमीन खोदून पहिली असता तेथे शिवपिंड सापडली. नांगराचा फाळ लागल्याने शिवपिंडीतून रक्त वाहू लागले होते. हा देवाचा चमत्कार आहे, असे समजून ग्रामस्थांनी तेथेच शिवपिंडीची प्रतिष्ठापना करून छोटे मंदिर बांधले. पुढे या लहान मंदिरापुढे अंतराळ व कालांतराने सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले. १९७७ साली या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आहे.
श्रीवर्धन ते जीवना बंदर या रस्त्यालगत शहराच्या गजबजाटापासून दूर, प्रशस्त परिसरात आणि आल्हाददायक वातावरणात हे मंदिर आहे. मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीत स्वागतकमान आहे. दोन्ही बाजूस चौकोनी स्तंभ व त्यावरील सज्जावर बाशिंगी महिरप, असे या कमानीचे स्वरूप आहे. स्तंभांना लागून भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. कमानीतून आत आल्यावर पायवाटेच्या दोन्ही बाजूस असलेली प्रांगणातील उद्याने लक्ष वेधून घेतात. या उद्यानांत शोभेच्या झाडांसोबतच विविध औषधी वनस्पती आहेत. प्रांगणातून मंदिराकडे जाणाऱ्या पायवाटेवर दुसरी स्वागतकमान आहे. दोन्ही बाजूस चौकोनी स्तंभ, त्यावरील तुळईवर बाशिंग व स्तंभांच्या बाजुला अर्धकमानीने जोडलेले अर्धस्तंभ आहेत. येथून मंदिराकडे जाणाऱ्या पायवाटेवर भाविकांसाठी आसनांची व्यवस्था आहे. पुढे उजव्या बाजूला पिंपळ वृक्षाभोवती जांभ्या दगडात बांधलेला पार आहे. या पारावर मारुतीचे लहानसे मंदिर आहे. मंदिरासमोर कोरीव पाषाणात बांधलेली पुष्करणी आहे व त्यात आत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत.
श्रीवर्धनमधील अनेक मंदिरांप्रमाणे जीवनेश्वर मंदिरही कौलारू घरासारखे दिसते. मंदिरासमोर तुलसी वृंदावन, दोन दीपमाळा व दोन विहिरी आहेत. त्यापैकी एका विहिरीचे पाणी केवळ पूजाविधीकरीता वापरले जाते. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ विशालकाय नंदी आहे. पुढे कौलारू छत असलेला सभामंडप आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. याच कक्षासनांमध्ये सभामंडपाच्या बाह्य बाजूस असलेले १२ चौकोनी स्तंभ उभारलेले आहेत. या स्तंभांवर कणी व त्यावरील लाकडी तुळयांवर मंदिराचे कौलारू छत आहे. छताला पितळी घंटा टांगलेल्या आहेत.
सभामंडपातील लाकडी स्तंभांवरील अप्रतिम कलाकुसर आहे. फणा काढलेला नाग व त्याची शेपटी तोंडात पकडलेले मुंगूस; विविध देव–देवता व योद्धे; तसेच हत्ती, उंट, घोडे, मोर व पोपट असे प्राणी व पक्षी या कोरीव कामात पाहायला मिळतात. स्थानिकांच्या मते हे स्तंभ मुळचे श्रीवर्धनमधील श्रीमंत भट–पेशवे यांच्या घराचे होते. छत्रपती शाहू महाराजांचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांचे श्रीवर्धन हे जन्मगाव. त्यांच्या घराण्याकडे श्रीवर्धन व आजूबाजूच्या गावांची देशमुखी होती. येथे बाळाजी विश्वनाथ यांचा मोठा वाडा होता. तो मोडल्यानंतर त्यातील खांब जीवनेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी येथे वापरण्यात आले. त्यानिमित्ताने पेशवे घराण्याची ही कलायुक्त आठवण येथे जतन करण्यात आलेली आहे.
पुढे अंतराळास समोरील बाजूला तीन प्रवेशद्वारे आहेत. सभामंडपापेक्षा उंचावर असलेल्या अंतराळाच्या प्रवेशद्वारासमोर तीन पायऱ्या आहेत. मधल्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल शिल्पे आहेत. लाकडी प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. अंतराळात प्रवेशद्वारासमोर एका चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. अंतराळात प्रत्येकी चार नक्षीदार लाकडी स्तंभांच्या दोन रांगा आहेत. लाकडी स्तंभ पाषाणी स्तंभपादांवर उभे आहेत. यापैकी काही स्तंभांवर नागाची शेपटी धरलेले मुंगूस कोरलेले आहेत तर काही स्तंभांवर गोवत्स धेनू कोरलेली आहे. काही स्तंभांवर शस्त्रधारी वीर, चक्र, योद्धे, पर्णलता व पुष्पलता नक्षी कोरलेल्या आढळतात. बंदिस्त स्वरूपाच्या अंतराळात हवा येण्यासाठी वातायने आहेत. अंतराळात गर्भगृहाच्या डाव्या बाजूला दर्शनी भिंतीस लागून असलेल्या मखरात गणेशाची मूर्ती आहे.
गर्भगृहाच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणेशशिल्प आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी पाच फूट लांबी व रुंदीची स्वयंभू शिवपिंडी आहे. येथील शिवपिंडीचे वेगळेपण असे की तिची शाळूंका चौकोनी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला तांब्याचा नाग आहे. या गर्भगृहात प्रवेश करण्यापूर्वी भाविकांनी सोवळे नेसणे बंधनकारक आहे. सोवळे नेसू न शकणाऱ्या भाविकांना अंतराळातून शिवपिंडीचे दर्शन घेता येते.
महाशिवरात्र हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यावेळी लघु रूद्र, भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात्रोत्सवाच्या वेळी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. श्रावणी सोमवार, पौर्णिमा, अमावस्या, प्रदोष आदी दिवशी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. दररोज सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत भाविकांना या मंदिरात जीवनेश्वर महादेवाचे दर्शन घेता येते.